आपल्या मनातील ज्या भावना व विचार आपण समजून उमजून न घेता नामंजूर करून टाकतो त्या दबल्या जातात व नंतर दुसऱ्या रुपात मुजोर बनून समोर येतात, हे समजून घ्यायला शिकूया.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
लुळे:
अडीअडचणीच्या काळात आपण आनंदी, हसरे, बळकट, दणकट व बिनधास्त असेलच पाहिजे ही अपेक्षा आपल्या क्षमतांना व ताकदींना लुळे करून टाकते, हे समजून घ्यायला शिकूया.
अनुभव:
आपले दैनंदिन अनुभव आनंदी बनवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे त्यातून ‘पर्याय नाही’ म्हणून नव्हे तर आपली ‘मर्जी, राजीखुशीे किंवा निवड’ म्हणून जाणे, हे समजून घ्यायला शिकूया.
भर:
सुखी, समाधानी किंवा यशस्वी लोकांमधील समान धागा म्हणजे परनियंत्रणात वेळ घालवण्यापेक्षा स्व:नियंत्रणावर दिला जाणारा जास्तीत जास्त भर, हे समजून घ्यायला शिकूया.
प्रवासी:
आयुष्यात कसलेही ध्येय नसणे, म्हणजे आपल्याला कोठे जायचे? व तेथेच का जायचे? हे माहीत नसलेला गोंधळलेला प्रवासी बनणे होय, हे समजून घ्यायला शिकूया.
वाहून:
कसलाही दीर्घकालीन स्वरूपाचा आजार झाला तरीही आजाराने ग्रस्त व पीडित न होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आनंददायी व अर्थपूर्ण अशा कामाप्रती स्वत:ला वाहून घेणे, हे समजून घ्यायला शिकूया.
दिशा:
फक्त बाह्य जगातील उलटसुलट प्रवाह पाहून बळजबरीने आपली दिशा ठरवण्यापेक्षा आपल्या अंतर्मनातील प्रवाह पाहून व जाणून घेऊन ठरवणे कधीही चांगले, हे समजून घ्यायला शिकूया.
टप्पा:
आत्तापर्यंत आपल्याला जे खूप खूप महत्वाचे व गरजेचे वाटले ते खरे तर तितके महत्वाचे नाही हे आपल्या लक्षात येणे म्हणजे आत्मविकासाचा एक टप्पा पार करणे, हे समजून घ्यायला शिकूया.
राख:
आपल्या मनातील टोकाचा द्वेष, जळफळाट आणि मत्सर नक्कीच राखरांगोळी करुन टाकतो पण ती राख इतरांच्या नाही तर आपल्याच स्वप्नांची व इच्छांची असते, हे समजून घ्यायला शिकूया.
तुलना:
आपल्याला तुलनाच कराविशी वाटत असेल तर मिळालेल्या परिणामांऐवजी किंवा फळाऐवजी त्या व्यक्तीने केलेले कष्ट, मोजलेली किंमत व दिलेला वेळ यांची करायला शिकूयात.