मनापासून बोललेलं मनालाच समजेल, ह्रदयापासून बोललेलं ह्रदयालाच समजेल व तर्कापासून बोललेलं तर्कालाच समजेल, समोरचा व आपण कोणत्या पातळीवरून बोलतोय ते शोधायला शिकूया.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
परिणाम:
जास्त प्रभावी बनण्यासाठी प्रत्येक संधी व जबाबदारी यांमधील संभाव्य आर्थिक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक परिणाम सुरूवातीपासूनच माहीत करून घ्यायला शिकूया.
जबाबदार:
काम कसे करावे? हे सांगण्याऐवजी, काय काम करायचे? व कोणती तत्वे व नियम पाळायचे? हे सांगावे लागते, ते जबाबदार, अग्रक्रमी व स्वनियंत्रित आहेत असे समजूया.
हिंमतवान:
इतरांच्या धारणांना व विचारांना प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांपेक्षा स्वतःच्या धारणांना व विचारांना प्रश्नचिन्ह लावून तपासून बघणारेच खरे हिंमतवान असू शकतात, तसे बनायला शिकूया.
प्रगल्भ:
धमक आहे पण समज नाही किंवा समज आहे पण धमक नाही, या अवस्थांऐवजी धमक आणि समज यांमधील समतोल व संतुलन साधायला अर्थात प्रगल्भ व्हायला शिकूया.
अर्थ:
शब्दांना किंवा वाक्यांना तेव्हाच अर्थ प्राप्त होतो जेव्हा आपण स्वतःला आणि इतरांना दिल्यावर ते शब्द किंवा वाक्य मनापासून पाळायला व जगायला शिकतो.
किंमत:
आपली स्वतःची किंमत जर इतर मोठया किंवा छोटया लोकांबरोबर तुलना करून ठरत असेल तर, बाह्य गोष्टींना आपण अवास्तव महत्त्व देतो आहोत असे समजूया.
मूलभूत गरज:
भावनिक व वैचारिक गुणदोषांसहीत विना अपेक्षा व विना शर्त स्वीकारले जाणे, ही आपली सर्वांची मूलभूत गरज आहे, स्वतःसहीत सर्वांची ही गरज पूर्ण करायला शिकूया.
सापळा:
एखाद्याशी तुलना करून किंवा एखाद्याची अपेक्षा पूर्ण करून मिळणारे प्रेम व आधार हा आपल्या स्वतःसाठीच एक सापळा ठरू शकतो, हे समजून घ्यायला शिकूया.
पर्याय:
मोठ्या मनाचे होण्यासाठी जेव्हा आपल्याजवळ एकच किंवा दोनच पर्याय असतात, तेव्हा अजून तीन किंवा चार पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न करायला शिकूयात.