समजत:

नातेसंबंधात आपण काय बोलतोय? व काय करतोय? यांपेक्षा आपण स्वतःला कोण समजत आहोत? व काय कामाचे समजत आहोत? याला जास्त महत्त्वाचे मानायला शिकूया.

आवडणे:

आपण स्वतः स्वतःला आवडणे म्हणजे आपल्याला स्वतःबद्दल जास्तीत जास्त माहिती असणे, आपले स्वतःवर नियंत्रण आणि मालकीहक्क असणे; इतरांवर नव्हे, हे समजून घ्यायला शिकूया.

मूल्यांकन:

आपल्यासाठी महत्त्वाचे असणारे काम संख्यात्मक व गुणात्मक रितीने व निर्धारित वेळेत पूर्ण झाले आहे की नाही? याचे मूल्यांकन कसे करायचे हे अगोदरच ठरवायला शिकूया.

लक्ष:

इतरांवर कामाची जबाबदारी सोपवताना आपण त्यांच्या काम करण्याच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्या कामाच्या अपेक्षित व इच्छित परिणामांवर करायला शिकूया.

विचार:

विचार करायचाच असेल तर नातेसंबंध, तत्वं, मूल्यं व संभाव्य परिणाम यांचा प्रथम करायला शिकूया, त्यानंतर वेळेचा, वेळापत्रकांचा आणि कार्यक्षमतेचा करायला शिकूया.

लक्ष:

आपल्या निराशा अपेक्षांमधून येतात, अपेक्षा आपल्या मनातील स्व:प्रतिमेतून येतात, स्व:प्रतिमा आपल्या तत्वांतून व मुल्यांतून येतात म्हणून आपल्या सर्वात खोल मूल्यांवर नेहमी लक्ष द्यायला शिकूया.

महत्वाचं:

“अरेरे! मला याचं महत्त्व अगोदर माहीत असतं तर बरं झालं असतं” असं नंतर म्हणण्यापेक्षा, खरोखर महत्वाचं काय आहे? हे शोधण्यासाठी थोडा वेळ काढायला शिकूया.

भरपाई:

आरोग्य, कुटुंब, व्यवसाय, नोकरी, मैत्री किंवा वैयक्तीक विकास यांपैकी कोणत्याही एका क्षेत्रातील कितीही मोठे यश दुसऱ्याची थोडीसुध्दा भरपाई करु शकणार नाही.

मेळ:

आपले दृष्टीकोन आणि आपल्या भूमिका, आपल्या लघु व दिर्घ टप्प्यांतील वैयक्तिक ध्येयांशी व उद्दिष्टांशी, एकवाक्यता व मेळ साधू शकतील असे, निवडून ठेवायला शिकूया.

जबाबदारी:

पूर्णपणे इतरांनी किंवा बाहेरून थोपवलेले वेळापत्रक व शिस्तींची नियमावली असल्यास, चांगल्या किंवा वाईट परिणामांची जबाबदारी घेण्यास आपले मन तयार होत नसते.