सत्य:

कोणत्याही घटनेचे विश्लेषण करताना, जे विचार व समज आपण सत्य असे मानतो व निवडतो, तेच आपल्या भावना, वागणं, बोलणं व त्यांचे परिणाम ठरवून टाकतात.

आपल्यामुळे:

आपल्याला आवडो अथवा न आवडो, पटो अथवा न पटो, आपण आज जे, जसे व जिथे आहोत, ते केवळ आपल्यामुळे, इतर कोणामुळे किंवा कशामुळे नव्हे.

हिस्सा:

प्रगतीच्या व यशाच्या योग्य मार्गावर राहण्यासाठी, कोणत्याही प्रसंगात किंवा घटनेत, आपण आपल्या स्वतःच्या जबाबदारीचा हिस्सा शोधायला व स्वीकारायला शिकूया.

विशेषणे:

आपल्याला चांगल्या किंवा वाईट वाटलेल्या घटनेच्या वर्णनातील अतिरंजित व टोकाची विशेषणे व क्रियाविशेषणे यांना पर्याय म्हणून अल्परंजित व मध्यम विशेषणे निवडायला शिकूया.

हट्ट:

एखादा प्रसंग जो आपल्या समोर घडला आहे, जसा आपल्याला दिसला व वाटला तसाच इतरांनाही दिसावा व वाटावा, असा हट्ट धरणे सोडूयात आणि होणारा मनस्ताप टाळायला शिकूयात.

रूप:

समोरच्या समस्येला आपण आपल्या मनात जसे रूप देतो, तसे आपला मेंदू व शरीर त्याला प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देतात, खरोखर समस्या काय आहे? त्यानुसार नव्हे, हे समजून घेऊया.

तटस्थ:

आपल्या स्वतःच्या अनुभवांकडे काही वेळ तटस्थ होऊन पाहता आले तर, आपले ताकदीचे व कमजोरीचे मुद्दे आपल्या लक्षात येतात म्हणून, काही वेळ तटस्थ व्हायला शिकूया.

तपासून:

दररोजच्या जीवनात आपण स्वीकार केलेले विचार, दृष्टिकोन व जगण्याचे फंडे काही ठराविक व्यावहारिक, तार्किक व काल्पनिक कसोट्या वापरून तपासून घ्यायला शिकूया.

चाळायला:

आपले अनुभव आपल्याला काही शहाणपण किंवा बोध शिकवून जातात की काहीही न शिकवता तेच तेच अनुभव पुनःपुन्हा वाट्याला आणतात, याबद्दल जागृत होऊन स्वतःचे आयुष्य चाळायला शिकूया.