जवळच्या नातेसंबंधात मतभेदांचा सामना करून, ते मान्य करून व संवाद साधून दोघांनाही मान्य होईल असा अपेक्षांचा एक संच निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला शिकूया.
Category: Uncategorized
मूळ:
“आपल्या अपेक्षा उघड आहेत, सामान्य आहेत, त्या सर्वांना माहिती आहेत, मान्य आहेत व सर्वजण त्या पाळणारही आहेत”, असे गृहित धरणे, हे आपल्या वादांचे मूळ असू शकते.
अपेक्षा:
आपल्या भूमिका आणि उद्दिष्टे यांबाबतीत आपल्या स्वतःकडूनच्या किंवा इतरांकडूनच्या अपेक्षा अस्पष्ट व परस्परविरोधी असतील, तर ताणतणाव अटळच आहे, हे समजून घेऊया.
हळवे:
आपण सर्वजण मनातून फार हळवे व संवेदनशील असतो, फक्त आपल्या प्रत्येकाच्या हळव्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, हे समजून घ्यायला शिकूया.
समान:
सर्वांशी समान प्रकारे वागायचे असेल प्रत्येकाशी वेगवेगळ्या पद्धतीने वागून व बोलून ते आपण करू शकतो कारण जितक्या व्यक्ती तितक्या समजूती व प्रकृती असतात, हे समजून घेऊया.
साजेसं:
आपल्याला अगोदर समजून घेऊन, मग त्या समजूतीला साजेसं आपल्याशी वागावं व बोलावं, असं जसं आपल्याला वाटतं, तसंच ते इतरांनाही वाटत असतं, हे समजून घ्यायला शिकूया.
जवळची:
एखादी व्यक्ती आपल्याला जवळची वाटते तेव्हा त्या व्यक्तीला महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी आपल्यालाही तितक्याच महत्वाच्या वाटू लागतात, म्हणून अशी व्यक्ती निवडण्यापूर्वी याचा पूर्ण विचार करूया.
वागवणे:
इतरांना माणसासारखे वागवणे! म्हणजे इतरांना काय हवं आहे? आणि त्यांना खरोखर कशाची गरज आहे? हे आपण न ठरवणे! तर त्याचं त्यांनाच ठरवू देणे! हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न करायला शिकूया.
जखमा:
आपल्या मनामध्ये काही ठसठसणाऱ्या, दुखऱ्या व जुनाट जखमा असतात, छोट्याशा धक्क्यानेही त्या आपल्याला पूनपुन्हा रक्तबंबाळ व विव्हळ करतात, त्या जखमा ओळखूया व बऱ्या करूया.
दुटप्पीपणा:
आपल्या वठवलेल्या पातळीवरील भूमिकांच्या वागण्याबोलण्यात आणि आपल्या स्वतःच्या असण्याच्या पातळीवरील भूमिकांच्या वागण्याबोलण्यात पडलेले अंतर म्हणजेच आपला दुटप्पीपणा.