वादळात:

वादळात सापडल्यावर आपण स्वतःचे, इतरांचे व साधनसंपत्तीचे कमीत कमी नुकसान व्हावे म्हणून प्रयत्न करतो, आपल्या भावनिक वादात व वादळातही तोच प्रयत्न करायला शिकूया.

शोध:

आपण फक्त भावनेच्या किंवा रागाच्या भरातच बोलणे टाळायला शिकूया, भावनावश नसतानाही बोलायला शिकूया व त्यातूनच खऱ्याखुऱ्या स्व:चा शोध घ्यायला शिकूया.

पर्याय:

आपल्यासमोर जेव्हा एकच पर्याय असतो तेव्हा ‘ माझ्यापुढे दुसरा पर्याय नाही’ हे सत्य नसून ‘आपण ताणतणावात किंवा भावनावश’ आहोत, हे सत्य असते, हे समजून घ्यायला शिकूया.

विश्वास:

आत्मविकासाची व स्वःविस्ताराची स्वप्नं व ध्येयं आपण ठरवली असतील तर, त्याविरोधी विचारांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर दहा वेळा विचार करायला शिकूया.

तपासायला:

मनात अचानक आलेल्या कोणत्याही विचाराला योग्य किंवा बरोबर समजण्यापूर्वी त्याला आपण स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीवर घासून तपासायला सुरुवात करायला शिकूया.

सहमत:

‘जवळची अथवा दूरची कोणीही व्यक्ती जी आपल्या मताशी सहमत नाही, ती आपल्या विरोधातच असावी’, ह्या दुष्ट व तर्कट अंदाजापासून थोडं सावध रहायला शिकूया.

ब्रेक:

‘वाहने हळू चालवा’, अर्थात वाहनांना स्वयंचलित म्हणतात, पण ती तशी नसतात, ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक,’ अर्थात वाहने स्वमनःस्थितीचलित असतात, हे समजून घ्यायला शिकूया.

निवड:

आपल्या मनाला व आपल्याला ‘कसं वाटायला हवं?’ याची निवांत मनस्थितीत अगोदरच निवड करून ठेवल्यास ऐनवेळी आपण इतरत्र वाहवत जाणार नाही, हे समजून घ्यायला शिकूया.

अनुभव:

अनुभव म्हणजे हरघडीच्या व हरक्षणाच्या घडामोडींबद्दलचे आपले अक्रिय वाटणे नसून सक्रिय वाटून घेणे असून ती आपली वैयक्तिक आवड व निवड असते, हे समजून घ्यायला शिकूया.