जीवनातील ज्या अपरिहार्य व स्वाभाविक गोष्टी आपण स्विकारू शकत नाही, त्यांचा गपगुमान व बिनबोभाट स्विकार हाच आनंदी व सुखी जीवनाचा आधार.
आस्तिक:
आपल्या शारीरिक अस्तित्वाचं नातं आपल्या अंतर्मनाशी, अंत:करणाशी व त्यात वास करणाऱ्या परमात्म्याशी जोडण्याचा प्रयत्न करणारा माणूस आस्तिक असतो. बाकी सगळे नास्तिक.
दर्जा:
“शारीरिक श्रम करणे म्हणजे दर्जा घसरणे” अशा घातक समजूतींमधून पूर्णपणे बाहेर पडणे, म्हणजे आपल्या संपूर्ण जीवनाचा दर्जा सुधारणे.
सहज:
उपद्व्याप, कटकट, डोक्याला ताण, वेदना, विफलता का सहन करायची? याचं स्पष्ट उत्तर जर अगोदरपासूनच आपल्याजवळ असेल, तर आपल्याला त्या सर्व गोष्टी सहज व सोप्या वाटतील.
जाळ आणि धुर:
काय हवं? आणि काय नको? का हवं? आणि का नको? किती हवं? आणि कसं हवं? हे जर आपलं आपल्यालाच माहीत नसेल, तर जाळ आणि धुर संगच.
झोप:
झोपण्यापूर्वी व जाग आल्यावर, जो विचार आपल्या डोक्यात असतो, तो जर आपल्याला काय हवे आहे? याच्याशी संबंधित असेल तर; दुधात साखर.
स्व:प्रतिमा:
आपली “स्व:प्रतिमा” म्हणजे आपल्याला ज्या जबाबदाऱ्या, वस्तू, गोष्टी, व्यक्ती अथवा संधी आरामदायी वाटतात, त्या सर्वांची गोळाबेरीज.
प्रेम:
आपले अंतर्मन, स्म्रुती, डोके व ह्रदय प्रेमाने व करूणेने काठोकाठ भरून ठेवल्यास, आपल्यासाठी रागावणे, द्वेष करणे व डूख धरणे फार अवघड आहे.
समतोल:
“खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी” असं दोन्हीही टोकांकडे पळणाऱ्या आपल्या मनाला, समतोल राखायला शिकवणे आपल्याच फायद्याचे आहे.
बळी:
“कान पिळणारा बळी” असो की “बकरा बनणारा बळी” दोघेही खरे तर त्यांच्या त्यांच्या मनात सतत वसणाऱ्या “असुरक्षिततेचेच बळी” असतात.