सप्तरंगी:

एकांगी किंवा द्वीअंगी विचार करण्याऐवजी आपण जर सप्तरंगी विचार करायला शिकलो तर आपले जीवन लवकरच इंद्रधनुष्यासारखे सुंदर होत जाईल, हे समजून घ्यायला शिकूया.

अनुबंध:

विश्वास व प्रेम यांचा अनुबंध तयार करणे म्हणजे समोरच्याची समस्या ही खरी समस्या आहे व ती खरोखर महत्वाची आहे असे मानणे व त्याची एक माणूस म्हणून कदर करणे.

समस्या:

आपले नातेसंबंध घट्ट व सुद्रुढ करण्याची आणि परस्परपूरक सहकारी म्हणून काम करण्याची शक्ती आपल्याला आपल्या समस्यांमुळेच मिळू शकते म्हणून त्यांचे स्वागत करायला शिकूया.

निरपेक्ष प्रेम:

निरपेक्ष प्रेम करणे म्हणजे समोरच्याचं सगळंच अनिर्बंध चालू देणे नव्हे, तर त्याला सल्ला देता येणे, समजावून सांगता येणे, मर्यादा आणि सीमा आखून देता येणे.

परीक्षा:

आपल्या खऱ्या सचोटीची व प्रेमाची तोंडी परीक्षा म्हणजे आपला धीर, संयम, प्रेम व चांगुलपणा यांना खेचणारा व यांबाबतींत आपला अंत बघणारा आपला एखादा नातेवाईक किंवा शेजारी.

असत्य:

असत्य किंवा सचोटीचा अभाव म्हणजे फसवण्याच्या हेतूनं खोटं बोलणं किंवा अफवा पसरवणं आणि खालच्या पातळीवरचं अनादर किंवा मानहानी करणारं संभाषण किंवा वागणं.

प्रश्नचिन्ह:

आपण आपल्या प्रेमळ व दयाळू असण्यावर प्रश्नचिन्ह लावायला हवे जर आपण अधीर व बेचैन होत असू, जोरदार विरोधी प्रतिक्रिया देत असू किंवा द्वेषपूर्ण व दुष्टपणे वागत असू.

फायद्याचे:

“विश्वासास पात्र असणे” आणि “प्रामाणिक असणे” हे “फक्त प्रेमळ असण्या”पेक्षा श्रेष्ठ ठरते व दिर्घ काळात आपल्यासाठी व आपल्या नात्यांसाठी फायद्याचे ठरते, हे समजून घेऊया.

वाट लावणे:

आपल्या स्वतःवरच्या विश्वासाची वाट लावणे म्हणजे “खरेतर मी तुम्हाला हे सांगायला नको आहे, पण तुम्ही माझे जवळचे आहात म्हणून सांगतो..” असं वागणं; ते बदलायला शिकूया.

दुटप्पीपणा:

एखादी व्यक्ती समोर असताना त्याला गोड बोलणे व त्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दल वाईट बोलणे, नावे ठेवणे व त्याच्यावर टीकाटिप्पणी करणे, हा आपला दुटप्पीपणा आपण कमी करायला शिकूया.