आपण ज्या मार्गावरून चालत आहोत, तो आपण का निवडला आहे? आपल्याला प्रिय आहे म्हणून की जगरहाटी व जनरित आहे म्हणून, ते शोधूया.
दृष्टीपथावर:
आपल्या दृष्टीपथावर आपली लघुकालिन व दिर्घकालीन ध्येये अंथरूण ठेवूया, आपले लक्ष व ध्यान त्यांवर टिकवून ठेवण्याची काळजी घेऊया.
मनश्चक्षु:
आपल्या डोळ्यांना काय दिसते? त्यापेक्षा आपले मनश्चक्षु काय पाहतात? याचे उत्तर आपल्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे.
मनातल्या मनात:
आपण आपलं आयुष्य कसं जगणार? हे ठरवणारी एक प्रमुख गोष्ट म्हणजे आपण आपल्या मनातल्या मनात त्याबद्दल जे काही ठरवतो ती गोष्ट.
शिक्के:
आपण इतरांच्या कपाळावर व व्यक्तीमत्वावर मारलेले चांगले वाईट शिक्के, आपल्या मात्र मनावर कोरले जातात, याचे भान ठेवूया.
प्रश्न:
कोणतीही क्रुती सुरू करण्यापूर्वी स्वतःला विचारावा असा प्रश्न म्हणजे यापूर्वी केली आहे त्यापेक्षा चांगली क्रुती मी कशी करू शकेल?
आभासी:
आपल्या विचारांना विवेकभ्रष्ट व तर्कदुष्ट करणाऱ्या, भावनिक व वादळी घटना बऱ्याच वेळा काल्पनिक व आभासी असतात.
उगम:
आपल्या सर्व नकोशा व नकारात्मक भावनांचा उगम विवेकशून्य, अविवेकी, अवास्तव अथवा तर्कदुष्ट विचारांमधून होत असतो.
अडथळा:
‘इतरांची मदत घेण्यात कमीपणा वाटणे,’ ही भूमिका, आपल्या स्वावलंबी बनण्याच्या मार्गावरील प्रमुख अडथळा आहे.
गडबड:
इतरांना काहीतरी सिद्ध करून दाखवण्याच्या गडबडीत आपण स्वतःच्या आयुष्यात गडबड व गोंधळ तयार करतो.