एक स्व:प्रश्न- तंटामुक्तीसाठी:

एक स्व:प्रश्न- तंटामुक्तीसाठी:
छोट्या छोट्या आणि क्षुल्लक गोष्टींवरून खूप लोक वाद घालतात व भांडणही करतात. जर एखादी गोष्ट छोटी आणि क्षुल्लक असेल तर त्यावरून वाद व भांडण होणार नाही. वाद, भांडण व ताणतणाव यांचे कारण बनू शकणारी गोष्ट ही छोटी अथवा क्षुल्लक असू शकणार नाही. म्हणजे ज्या गोष्टींसाठी आपण वाद घालतो, टेन्शन घेतो, भांडण करतो किंवा अतीविचार करतो त्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात. आता आपल्या दैनंदिन जीवनात कोणकोणत्या गोष्टींवरून आपण वाद घालतो किंवा भांडणं करतो त्याची एक यादी बनवूया. ही आपली यादी नंबर एक.

आपल्याला आपल्या वैयक्तिक, वैवाहिक, सामाजिक व कौटुंबिक जीवनात खरोखरच काय काय हवे आहे? आपल्या आदर्श आयुष्यात कोणकोणत्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत? आपल्या आयुष्यात आपली स्वप्ने, आकांक्षा, ध्येये व उद्दिष्टे कोणकोणती आहेत? या प्रश्नांची उत्तरे शांतपणे शोधूया व त्याचीही एक यादी बनवून लिहून ठेऊया. ही आपली यादी नंबर दोन.

या दोन्ही याद्या बनवताना कमीत कमी सहा महिने कालावधीचा विचार व्हायला हवा. यानंतर या याद्या शेजारी शेजारी ठेवूया. या दोन याद्यांमध्ये समान असणाऱ्या गोष्टी एका स्वतंत्र पानावर लिहून काढूया. या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि आपण त्यासाठी आग्रही आहोत व आपले मतं मांडतो ही चांगली गोष्ट आहे. परंतु जर आपण वाद घालत असेल आणि भांडणं करत असेल तर मात्र आपल्याला नक्की कुठली गोष्ट महत्त्वाची आहे हे ठरवणं गरजेचं आहे. यासाठी पुन्हा एकदा यादी नंबर एक बनवूया.

यादी नंबर एकमधील ज्या गोष्टींचा समावेश आपण कधीही यादी नंबर दोनमध्ये करणार नाही त्या गोष्टी स्वतंत्र पानावर लिहून काढूया. या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीत परंतु तरीही आपण यावरून वाद घालत असतो व भांडणं करत असतो. आता जर आपल्याला हे समजले आहे की ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाचीच नाही तर मग वाद घालण्याचा प्रश्नच तयार होत नाही. एकदा ही गोष्ट आपल्या लक्षात आली की यापुढे कधीही वाद घालण्याचा किंवा भांडण करण्याचा प्रसंग आपल्यासमोर आल्यास, स्वतःलाच प्रामाणिकपणे प्रश्न विचारू की, ही जी गोष्ट मी बोलतोय किंवा करतोय ती खरोखरच महत्त्वाची आहे काय?

आश्चर्य म्हणजे नव्वद टक्के वेळा ही वाद व भाडणं होणारी गोष्ट महत्वाची नसते. अर्थात क्षुल्लक अथवा एकदम छोटीशी असते आणि ती गोष्ट न केल्यामुळे आपल्या वर्तमानावर किंवा भविष्यावर काहीही परिणाम होणार नसतो. असा एक प्रश्न विचारल्यामुळे आपली नव्वद टक्के वाद व भांडणं टाळली जातील. अर्थात आपण 90% ताणतणाव मुक्त होऊन जाऊ. म्हणून हा एक छोटासा प्रश्न वाद होण्याच्या प्रसंगाअगोदर स्वतःला नेहमीच विचारावा, ही गोष्ट, ही उक्ती, ही कृती करणं माझ्यासाठी खरोखरच महत्त्वाची आहे काय?

Leave a comment