इच्छापूर्ती- विश्वास व श्रद्धा:
एखादी गोष्ट करणे अशक्य आहे, असे जेव्हा आपल्याला वाटते, तेव्हा आपले मन, ही गोष्ट अशक्य का आहे? आणि अशक्य कशी आहे? यासंबंधीची कारणे व उदाहरणे आपल्या समोर प्रस्तुत करते व आपल्या वाक्याचे समर्थन करते. याउलट एखादी गोष्ट शक्य आहे, असे जेव्हा आपल्याला वाटते, तेव्हा तेच आपले मन ही गोष्ट शक्य का आहे? व शक्य कशी आहे? या संबंधीची कारणे व उदाहरणे आपल्यासमोर हजर करीत असते व आपल्या वाक्यांचे समर्थन करीत असते.
म्हणून मनाला काय वाटते याची चिंता करत बसण्याऐवजी आपल्याला काय वाटते याबद्दल विचार करावा. जर आपल्याला विश्वास आणि श्रद्धा असेल की आपण एखादी गोष्ट करू शकतो, तर आपलं मन आपला दोस्त बनून आपले विश्वास आणि श्रद्धा सिद्ध करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करते. म्हणून जर मनाला आपल्या बाजूने व आपल्यासाठी काम करायला लावायचे असेल तर आपले विश्वास आणि आपली श्रद्धा यावर नेहमी लक्ष ठेवले पाहिजे. आपण नेहमी हे का शक्य आहे? आणि हे कसे शक्य आहे? आणि हे शक्य करण्यासाठी आपण काय काय करू शकतो? अशा प्रकारचे प्रश्न स्वतःला विचारत राहिले पाहिजे. आपले मन आपल्यासाठी या प्रश्नांची उत्तरे सोडवायला आपल्याला मदत व मार्गदर्शन करते.
आपल्या इच्छा या आपला विश्वास आणि श्रद्धा यामधुन जन्म घेत असतात. आपला स्वतःवर व स्वतःच्या विचारांवर विश्वास असेल आणि आपली स्वतःवर व स्वतःच्या क्षमतांवर श्रद्धा असेल तर आपल्या इच्छा आपण स्वतःच पूर्ण करू शकतो. अशा प्रकारचा विश्वास व श्रद्धा असल्याने आपण प्रयत्नवादी, जबाबदार व कृतीप्रधान बनतो. परंतु जर आपला स्वतःवर विश्वास नसेल आणि आपली स्वतःवर श्रद्धा नसेल तर आपण आपल्या इच्छा परमेश्वराने पूर्ण कराव्यात, नशिबाने पूर्ण व्हाव्यात, कोणीतरी इतरांनी पूर्ण कराव्यात, काहीतरी जादू व्हावी आणि त्या पूर्ण व्हाव्यात अशी स्वप्ने पाहत बसतो. अशा प्रकारच्या विश्वास व श्रद्धा यामुळे आपण ईश्वरवादी, स्वप्नाळू व निष्क्रिय बनत जातो.
म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आपण आपले स्वतःचे विश्वास आणि आपल्या स्वतःच्या श्रद्धा नेहमी घासून-पुसून स्वच्छ करून ठेवल्या पाहिजेत. आपल्या विचारांमध्ये मी माझं काम, माझा अभ्यास, माझी ड्युटी, चांगल्या प्रकारे करू शकतो. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, मानसिक व आर्थिक गरजा पूर्ण करणे आपल्याला शक्य आहे, असा विश्वास व श्रद्धा बाळगली पाहिजे. माझ्या जीवनामध्ये आनंदी राहणे, प्रेमळ, क्षमाशील व दयावान रहाणे शक्य आहे, मनशांती मिळवणे शक्य आहे, असा विश्वास बाळगला पाहिजे. त्याचबरोबर सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगण्याची क्षमता माझ्याकडे आहे, अशी श्रद्धा आपली बाळगली पाहिजे. आपण दररोज आपल्या विचारांना घासूनपुसून सकारात्मक आणि विश्वास व श्रद्धा यांच्या कसोटीला उतरणारे अशा रूपांमध्ये बदलून घेतले पाहिजे. असे केल्यास आपले मन आपल्या बाजूने व आपल्यासाठी काम करायला लागेल व आपल्याला जे जे वाटतं व आपल्या ज्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्यासाठी अहोरात्र कामाला लागेल. आपलं मन आपला सर्वात चांगला दोस्त व इच्छापूर्ती कल्पवृक्ष बनेल.