सहनशक्तीची परिक्षा:
आपली गोड गोंडस मुलं ही आपल्या सहनशक्तीची दररोज परीक्षा घेतात. आपण कोणकोणत्या गोष्टी सहन करतो, आपण कोणकोणत्या गोष्टींच्या वेळी गप्प बसतो, आपण कोण कोणत्या गोष्टींकडे कानाडोळा करतो, आपण कोण कोणत्या गोष्टींना बिलकुलच किंमत देत नाही, आपण कोणकोणत्या गोष्टींबद्दल रागावतो किंवा घाबरतो हे सर्व मुले बारकाईने पहात व अनुभवत असतात. किती प्रमाणात राग? किती प्रमाणात भीती? आपण सहन करू शकतो याचा आपली मुलं दररोज अभ्यास करत असतात.
मुलं आपल्याला प्रश्न करतात, काही मागणी करतात, काही हट्ट करतात तेव्हा ते आपल्या मानसिकतेची व विचार पद्धतीची परीक्षा घेत असतात. यावेळी आपण त्यांच्याशी कशाप्रकारे वागतो आणि बोलतो हे ही मुलं निरीक्षण करत असतात आणि लक्षात ठेवत असतात. आपण कुठपर्यंत सहन करू शकतो, आपण किती पर्यंत वाकू शकतो, आपण किती पर्यंत ताणले जाऊ शकतो, याचाच आपली मुलं अंदाज घेत असतात. आपलं अवसान कुठपर्यंत टिकतं आणि कुठं संपून जातं, हे ही मुलं बारकाईने टिपत असतात.
आपण कोणकोणत्या गोष्टींना छान म्हणतो, चांगलं म्हणतो, अरे वा, मस्त, सुंदर असं म्हणतो, त्या गोष्टी मुले वारंवार करत राहतात. आपण कोणकोणत्या वाक्यांना, बोलण्याला हसून प्रतिसाद देतो, आपण कुठल्या वर्तनाला सहजवारी घेतो, आपण कोणकोणत्या वागण्याला सहन करतो कोणकोणते बोलणे आपण सहन करू शकतो, कीती थापा व खोटं बोलणं आपण सहन करतो हे पहात पहात मुलं आपलीच परिक्षा घेत असतात. नंतर येणाऱ्या प्रसंगांमध्ये आणि समस्यांमध्ये याच गोष्टींचा आपली मुलं संदर्भ म्हणून वापर करतात आणि त्याचा दाखलाही आपल्याला वारंवार देत असतात.
म्हणूनच आपण आपल्या मुलांना कोठपर्यंत सहन करू शकतो? हे अगोदरच आपले आपण ठरवून घेतले पाहिजे. अन्यथा समस्येच्या काळात आपण आपली सहनशक्ती कमी करून टाकतो व विफल होऊन मुलांकडे, त्यांच्या वागण्याबोलण्याकडे दुर्लक्ष करतो किंवा अकारण, अवास्तव व अप्रस्तुत प्रतिक्रिया देतो. आपण मुलांना सहन करण्याची, प्रोत्साहित करण्याची व प्रेरणा देण्याची क्षमता व शक्ती वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील, प्रयोगशील व आशावादी रहायला शिकले पाहिजे. मगच आपण मुलांच्या सहनशक्तीच्या परिक्षेला खरे उतरू शकतो. या नात्यामध्ये येणाऱ्या ताणतणावावर आपण आनंदाने व खेळीमेळीने मात करू शकतो व हे नातं आपल्यासाठी आनंद, सुख व समाधान यांचा एक अविरत स्त्रोत बनून राहते.