डॉक्टर हिमगौरी वडगावकर लिखित “व्रतस्थ” हा कथासंग्रह काल दुपारी वाचायला सुरुवात केला व आज सकाळी वाचून पूर्ण झाला. हातात घेतलेला कथासंग्रह वाचून पूर्ण होईपर्यंत ठेवावासा वाटले नाही. लेखिकेने वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्याचे हे लक्षण लक्षणीय आहे, जे या कथासंग्रहाला वाचनीय व चिंतनीय बनवतात, याबद्दल लेखिकेचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद.
मानवी मनाचे विविध कंगोरे चांगले व वाईट, जवळचे व दूरचे, आपले व इतरांचे, ज्ञात व अज्ञात, दृश्य व अदृश्य, गम्य व अगम्य हे सगळे लेखिकेने खूप साध्या भाषेत चपखलपणे वर्णन केलेले आहेत. मानवी मनाला स्त्रीमन किंवा पुरुषमन या दोन भागांमध्ये विभाजित करता येत नाही, तर ते या दोन रंगांच्या मिश्रणांप्रमाणे अनंत छटांमध्ये पाहता व अनुभवता येते, याची क्षणोक्षणी साक्ष देणाऱ्या या कथा आहेत. मानवी स्त्रीमन कधी कठोर व व्यवहारी पुरुषमन म्हणून काम करते, तर कधी मानवी पुरुषमन कोमल व भावनिक स्त्रीमनाचे रूप धारण करते, याची प्रत्येक पानावर ओळख पटत जाते. वेळ, काळ, स्थळ, परिस्थिती, समस्या, संधी व बलस्थाने यानुसार वेगवेगळी रूपं आणि छटा धारण करणारी मानवी मनं या कथांमधून अनुभवायला मिळतात. प्रेम व तिरस्कार या दोन विरोधी भावनांच्या विविधरंगी छटा एके ठिकाणी वाचकांस रोमांचकारी तर दुसऱ्या ठिकाणी हतबल तर तिसऱ्या ठिकाणी “नयनी पाणी” हे अनुभव देतात.
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीसमोर कशाप्रकारे भावनिक प्रश्नचिन्हे उभी राहतात? त्याची उत्तरे शोधताना मायेखातर त्या स्वतःकडे कशाप्रकारे पडकी व दुखःद बाजू घेतात? उत्तरे शोधताना प्रथम प्राधान्य त्या प्रिय व्यक्तीला का व कसे देतात? अबोल संवादांऐवजी बोलके व वेळीच केलेले संवाद कसे आधार देणारे व व्यवहारी ठरतात? हे या कथांमधून प्रकर्षाने जाणवले.
लेखिकेने वाचकांना पात्रांच्या अंतर्मनात प्रवेश करून त्यांच्या भावनिक खळबळी व झोके अनुभवण्याची संधी या प्रत्येक कथेमधून दिली आहे. एका बाजूला भावनिक, शारीरिक व लैंगिक शोषण करणारं, त्याचं समर्थन करणारं, त्याची इच्छा धरणारं व हे सर्व बघत बसणारं दिंग्मूड समाजमन; तर दुसऱ्या बाजूला शारीरिक, भावनिक, आत्मिक व सामाजिक आधार देणारं, समाजाचं समर्थन मिळवणारं व चांगल्याचा, भलेपणाचा स्विकार करण्याचं ‘व्रत’ करणारं समाजमन; यांच दर्शन झाल्यामुळे वाचकांची मने “कृतकृत्य” व “व्रतस्थ” झाल्याशिवाय राहत नाहीत.
मानवीमन व समाजमन यांना “व्रतस्थ” होण्यासाठी साद घालणाऱ्या अनंत कथांच्या प्रतिक्षेतील एक वाचक………
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ, बारामती.