रमेश (नाव बदलले आहे) बावीस वर्षांचा कॉलेजचा तरुण. मागच्याच महिन्यात तो माझ्या ओपीडीत आला होता. आला होता म्हणजे त्याला आणला होता. त्याचे आईवडील व एक मित्र त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध घेऊन आले होते. नक्कीच काहीतरी गंभीर मानसिक आजार असणार असा मी अंदाज केला. मानसिक आजारांचे आम्ही मानसोपचारतज्ञ दोन प्रकार करतो. एक ज्यामध्ये व्यक्तीला स्वतःला त्याच्या आजाराबद्दल कल्पना असते, तो आजार मान्य करतो आणि उपचार घ्यायला तयार होतो. अशा आजारांना आम्ही “न्यूरोसिस” असं नाव देतो. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण आजारी आहोत याची रुग्णाला कल्पना नसते व तो आजार अमान्य करून उपचार नाकारतो. अशा आजारांना आम्ही “सायकोसिस” असं नाव देतो.
तोंड फिरवून आपली नाखुशी व्यक्त करीत रमेश माझ्यासमोर बसला होता. प्रथम त्याच्या आई-वडिलांनी संवादाला सुरुवात केली. त्यांनी सांगितले की रमेश चे काका तीन महिन्यांपूर्वी कोरोनासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. त्यादरम्यान रमेशने त्यांच्यासाठी हॉस्पिटलात मदत करून व त्यांची काळजी घेऊन व त्यांना मानसिक आधार देऊन खूप कष्ट घेतले. ते कोरोनामधून खडखडीत बरे झाले. दिड महिन्यापूर्वी घरी असताना ते हार्ट अटॅकने वारले. त्यावेळी रमेशही त्यांच्यासोबतच होता. त्याने त्यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला परंतु रस्त्यातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर मागील एका महिन्यापासून त्याने खूपच टेन्शन घेऊन घाबरायला सुरुवात केली आहे. अचानक त्याला छातीमध्ये धडधड होते, दडपण येते, छाती भरून येते व कधीकधी दुखते सुद्धा. त्याला घाम येतो. हात थरथर कापायला लागतात. त्याला चक्कर येते. त्याचा तोल जातोय असं त्याला वाटतं पण तो पडत नाही. तो इतका घाबरून जातो की पटकन मला दवाखान्यात घेऊन जा मला हार्ट अटॅक येऊन मरण येईल. ताबडतोब आम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन जातो. डॉक्टरांनी हृदयाच्या व हार्ट अटॅकच्या ईसीजी, रक्ताच्या चाचण्या, सोनोग्राफी या सर्व तपासण्या केल्या. सर्व तपासण्या व त्यांचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं.
दोन तीन दिवसानंतर पुन्हा त्रास झाल्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला कार्डिओलॉजिस्ट यांचा सल्ला घेण्याचे सांगितले. त्या ठिकाणी पुन्हा ईसीजी तसेच टू डी एको, स्ट्रेस टेस्ट, रक्ताच्या चाचण्या केल्या. सर्व तपासण्यांचे रिपोर्ट परत नॉर्मल आले. नंतर मात्र रमेश रागावला नाराज झाला. “मला तर इतका प्रचंड त्रास होतोय आणि रिपोर्ट नॉर्मल कसे येत आहेत? काहीतरी गडबड आहे?” असे म्हणून चिडचिड करू लागला. मग डॉक्टरांनी त्याला मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला. या गोष्टीचाही त्याला प्रचंड राग आला. “मी काय वेडा आहे काय? मला मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याची काहीच गरज नाही” अशी बडबड करू लागला. माझ्या लक्षात आले की हा सायकोसिस चा प्रॉब्लेम नसून न्यूरोसेस चा प्रॉब्लेम आहे. फक्त समाजामध्ये “वेडा असणे” या गोष्टी भोवती आणि “मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे” या क्रियेभोवती असलेल्या “कलंक व काळीमा” या भावना, भीती व गैरसमजामूळे रमेश रागावलेला आहे.
“डॉक्टर मी तुम्हाला वेडा वाटतो काय?” इतका वेळ तोंड फिरवून बसलेल्या रमेशने त्रागा करत रागातच विचारले.
“रमेश, मी डॉक्टर संताजी शेळके. मी मानसोपचार तज्ञ. पण तुला माझ्याकडे पाठवले आहे, त्याबद्दल तुला खूपच राग आलेला दिसतोय. तुला खूपच वाईट वाटलेले दिसतेय”.
“वाटेल नाहीतर काय? अहो डॉक्टर, माझी तर छाती धडधडतेय, छातीत दुखतय, चक्कर येतेय, श्वास गुदमरतोय. मला अटॅक येतो की काय असं वाटतंय. हे सर्व शारिरीक त्रास आहेत. मनाशी त्याचा काय संबंध? मग मी वेडा कसा? काय हा वेडेपणा आहे.” त्याचा त्रागा साहजिक होता.
“म्हणजे बघ मन म्हणजे आपले विचार, आपल्या भावना, आपले दृष्टिकोन व त्यामधून घडणारे आपले वर्तन. आपले शरीर, मन, मेंदू व हृदय हे एकमेकांशी एकदम घट्ट जोडलेले असतात. शरीर व हृदय आजारी असेल तर त्याचा मनावर परिणाम होतो आणि मन आजारी असेल तर त्याचा शरीरावर व हृदयावर परिणाम होतो. तुझ्या आजाराविषयी मला सांगशील तर मला काही तुला मदत करता येते का? ते ठरवता येईल.” मी शांतपणे सांगितले.
“म्हणजे तुम्ही मला शॉक देणार आणि वेड्यांच्या इस्पितळात ॲडमिट करणार”? रमेशने आपली भीती व्यक्त केली.
“नाही रे रमेश. तुला होणारा त्रास हा ताणतणावाशी निगडित वाटतोय. या तीन महिन्यात तुला तुझ्या काकांची हॉस्पिटलमधील काळजी व काकांचा हार्ट अटॅकने मृत्यू या गोष्टींमुळे ताणतणाव आलेला आहे असं वाटतंय. त्याबद्दल मला अजून सांगशील काय?” मी त्याची भीती दूर करत म्हणालो.
“हो हे खर आहे डॉक्टर. मला त्या वेळी खूप ताण आला होता. पण मी खूप मनापासून त्यांची सेवा केली व काळजी घेतली. अगदी शेवटच्या वेळी जेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. आज मला जे जे होते असे ते अगदी त्यांना कसं व्हायचं तसंच होत आहे. म्हणून मी खूप घाबरून गेलो आहे. डॉक्टर मला नक्की खात्री आहे की हा हार्ट अटॅकच आहे.” रमेशने आपले मन मोकळे करायला सुरुवात केली.
“मला समजतेय रमेश की तुला खूपच त्रास होतोय. परंतु एक गोष्ट मी तुला सांगू इच्छितो. अगदी “हार्ट अटॅक” सारखीच सर्वच्या सर्व लक्षणे असणारी “पॅनिक अटॅक” नावाची एक अवस्था असते. बऱ्याच वेळा या पॅनिक अटॅक ची लक्षणे ही हार्ट अटॅक पेक्षाही जास्त तीव्र स्वरूपामध्ये व्यक्तीला जाणवत असतात.”
“खरंच की काय डॉक्टर. तरच मी विचार करतोय की काकांना जेव्हा अटॅक आला होता तेव्हा ते माझ्याइतके घाबरले नव्हते. त्यांना माझ्या इतके स्पष्टपणे बोलताही येत नव्हते. मी ऐकले आहे की दोन किंवा तीन वेळाच हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यानंतर माणसाचा मृत्यू होतो. परंतु माझ्या बाबतीत मात्र हे या महिन्यात दहा-बारा वेळा झालेले आहे आणि अजूनही मी जिवंत आहे. म्हणजे मला जे होते असे, ते पॅनिक अटॅक आहे तर.” आता रमेश सैलावून बसला होता. त्याची जिज्ञासा जाग्रुत झाली होती.
“नक्कीच. आणि त्यामुळेच तुझ्या हृदयाच्या आणि रक्ताच्या चाचण्यांचे सगळे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत.”
“अच्छा! मग मी उगीचच डॉक्टरांना निदान होत नाही अशी तक्रार करत होतो. माझं चुकलंच की उगीचच मी सगळ्यांना त्रास दिला. तरच डॉक्टर मला सांगत होते की तू टेन्शन घेतोय म्हणून तुला त्रास होतोय.”
“हो, अगदी बरोबर बोलले बघ डॉक्टर. टेन्शन आल्यावर पॅनिक अटॅक येतात आणि पॅनिक अटॅक आल्यावर अजून टेन्शन वाढत जाते.” मी.
“म्हणजे मला जास्त टेन्शन आलं तेव्हा मला सुरुवातीचा पॅनिक अटॅक आला. त्यानंतर मला पॅनिक अटॅक आला याचं टेन्शन घेऊन मला त्यापुढचे पॅनिक अटॅक आले. असं झालं कि काय डॉक्टर.” रमेश स्वतःचा अनुभव व खोल भावना सांगू लागला.
“अगदी बरोबर बोललास रमेश. तुझी आत्मपरीक्षण करण्याची व कारणमीमांसा करण्याची क्षमता खूपच छान आहे. म्हणजे तुला आलेले टेन्शन हे तुझ्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाला अनुरूप आहे. परंतु तुला आलेल्या टेन्शनच्या शारिरीक लक्षणांचे तू घेतलेले टेन्शन हे तुला आजारी पाडत आहे, हे आता तुझ्या लक्षात आले आहे.” मी खुश होऊन बोललो.
“म्हणजे मला टेन्शन आल्यावर पॅनिक अटॅक येणे ही ‘नॉर्मल’ गोष्ट आहे. परंतु त्या पॅनिक अटॅकला ‘जीवघेणा’ हार्ट अटॅक समजणे यामुळे येणारे टेंशन मला आजारी पाडते आहे. बरोबर आहे ना डॉक्टर.” रमेशला टेन्शनचे टेन्शन हा प्रकार लगेचच समजला.
“अगदी बरोबर रमेश. एकदा आपला “पॅनिक अटॅक” आणि “टेन्शन” याविषयीचा गैरसमज दूर झाला की आपले मन त्याला नॉर्मल समजून शांत होऊन जाईल. त्यानंतर आपण आजारातून बरे होऊन जाऊ.” मी धीर देत म्हणालो.
“म्हणजे मला असा त्रास परत होणार नाही नक्की ना डॉक्टर,” रमेशची शंका.
“आता असं बघ रमेश, ताणतणाव तर आपल्या सोबत राहणार आहे. त्यासोबत येणारी काही लक्षणे आहेत ज्याला आपण पॅनिक अटॅक म्हणतो, तीही आपल्या सोबत राहणार आहेत. फक्त आपण त्या टेन्शनच्या लक्षणांचे कशाप्रकारे “विश्लेषण” करतो किंवा आपलं मन त्याला काय “अर्थ” देतं यावर ठरणार आहे की आपल्याला त्या टेन्शन वर अजून किती टेन्शन येणार आहे.” मी.
“बापरे हे तर दुष्टचक्र चाहे. म्हणजे एखाद्या छोट्याशा गोष्टीचं आलेलं छोटसं टेन्शन आणि त्या टेन्शन मधून आलेलं साधारण छोटसं शारीरिक लक्षण जर माझ्या मनाने खूप मोठ्या जीवघेण्या आजाराचं लक्षण आहे असं घेतलं तर त्या छोट्याशा टेन्शनमधून मग खूप मोठं टेन्शन तयार होणार. मग त्या मोठ्या टेन्शन मधून अजून मोठी मोठी टेन्शन व पॅनिक अटॅक मला येत जाणार. बरोबर ना डॉक्टर.” रमेशच्या लगेचच लक्षात आले.
“हे दुष्टचक्र आपण तोडायला शिकणं खूप आवश्यक आहे. यासाठी टेन्शन म्हणजे काय? ते आल्यावर आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात? जास्त टेन्शन आल्यावर येणारा पॅनिक अटॅक कसा कमी होतो? त्यावेळी आपण कसा श्वास घेतो? याचं आत्मनिरीक्षण करणं ही याची पहिली पायरी आहे.” मी.
“डॉक्टर यावेळी माझा श्वास गुदमरतो. त्यासाठी मी काय करायला हवं?” रमेश.
“त्यासाठी आपल्याला लहान मुलांप्रमाणे श्वास घ्यायला शिकलो पाहिजे. म्हणजे पोटातून श्वास घ्यायला आणि सोडायला शिकलं पाहिजे. त्याला “बेली ब्रीदिंग” असं म्हणतात. यामध्ये श्वास घेतल्यावर पोट फुगले पाहिजे आणि सोडल्यावर ते खाली गेलं पाहिजे. हा श्वास आपल्या मेंदूला भरपूर ऑक्सिजन देतो आणि आपला मेंदू व मन ताणतणावावर मात करण्यासाठी तयार होते. आपल्या मनाचा गोंधळ कमी होतो. आपण भावनिक स्तरावर विचार करायचं कमी करून सद्सद्विवेक आणि वास्तविक स्तरावरून तार्किक विचार करायला सुरुवात करतो.” मी दोन वेळा पोटाने श्वास घेऊन दाखवले.
“अगदी बरोबर आहे डॉक्टर. पॅनिक अटॅकच्या वेळी मी घाबरून जातो व छातीतून छोटे-छोटे श्वास घेत असतो. ते आता मी बदलायला शिकेन. मी पोटातून श्वास घ्यायचा सराव दररोज आणि नियमित करायला शिकेन.” रमेशने दोन मोठे श्वास पोटातून घेतले.
“छान जमतंय तुला!” मी.
“पण डॉक्टर आता छातीत धडपड झाल्यावर मी त्याचा काय अर्थ लावावा?” रमेश विचार करत बोलला.
“त्याचा अर्थ आपलं ह्रदय कोणत्याही परिस्थितीशी सामना करायला तयार आहे. ते कार्यक्षम, उत्तेजित व नॉर्मल आहे. ते मेंदू, स्नायू यांना अतिरिक्त रक्तपुरवठा करण्यास सक्षम आहे.” मी.
“अरे हा! हा! आता मला समजले म्हणजे जेव्हा मी घाबरतो किंवा जेव्हा माझ्या मनात टेंशन येते तेव्हा त्या घाबरवणाऱ्या परिस्थितीशी किंवा त्या टेन्शनची दोन हात करण्याची ताकद मला माझे हृदय धडधड वाढवून आणि छाती श्वास फुलवून देत असते. हे म्हणजे गाडीला टेस्ट करण्यासाठी एका जागी उभी करून पाचवा गिअर टाकण्यासारखे आहे. शोरूम मध्ये गाडी अशीच टेस्ट करतात की. मग पॅनिक अटॅक हीसुद्धा माझ्या शरीराची एक टेस्टच आहे की काय? म्हणजे एका जागेवर बसून मी माझ्या शरीराचा पाचवा गिअर टाकू शकतो. त्यालाच आपण पॅनिक अटॅक म्हणतो. बरोबर! याचा अर्थ माझं शरीर पूर्ण क्षमतेने काम करू शकत आहे याचाच हा पुरावा आहे की.” रमेशची समज व उदाहरण ऐकून मी अचंबित झालो. मी असा विचार याबद्दल कधीही केला नव्हता.
“वा! खूप योग्य आणि समर्पक उदाहरण.”
“त्यावेळी मी नेमका कसा विचार करावा बरे?” रमेशची जिज्ञासा खूप खोलवर गेली होती.
“आपले विचार, भावना व वर्तन हे ऐकमेकांवर अवलंबून असतात. तसेच ते ऐकमेकांना प्रभावीत करीत असतात. नकारात्मक व तर्कदुष्ट विचार आपल्यामध्ये नकारात्मक भावना व वर्तन तयार करतात. म्हणून आपले विचार सकारात्मक व तर्कनिष्ठ करून घेणे हाही यावर प्रभावी उपाय आहे.” मी समजावले.
“बरोबर आहे डॉक्टर. म्हणजे मी आता शारीरिक लक्षणांबद्दल विचार करताना “माझे शरीर व ह्रदय आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहे” “पोटाने श्वास घेऊन मला जास्त ऑक्सिजन मेंदू, स्नायू व ह्रदय यांना द्यायला हवा.” “मला मदत केल्याबद्दल हे ह्रदया धन्यवाद”. असा विचार करायला हवा काय?” रमेशला जास्त काही सांगण्याची गरज पडली नाही.
“यासोबत आजार कमी व्हावा, लवकर उतार यावा, यासाठी काही औषध सुरू करूया का?” मी.
“नाही डॉक्टर! आता मला माझ्या आजाराचं स्वरूप पूर्ण लक्षात आलं आहे. आता आपण चर्चा केलेल्या गोष्टी माझ्या दररोजच्या रूटीनमध्ये व्यवस्थित पाळेल आणि माझ्या इच्छाशक्तीवरंच बर होण्याचा मी प्रयत्न करेल. काही वाटलं तर फक्त तुम्हाला मध्ये फोन करेल किंवा येऊन भेटेल.” रमेश आत्मविश्वासाने बोलला. तो आता खुश दिसत होता. त्याला मार्ग सापडला होता. आता फक्त त्या मार्गाने प्रवास करायचा होता.
“ठीक आहे, चालेल” मीही त्याची जिद्द पाहून खुशीत बोललो. असे बोलणारे पेशंट एक दोन आठवड्यात परत येतात व औषधे सुरू करण्याची विनंती करतात. असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे.
साधारण एक महिन्यानंतर रमेशचा मला फोन आला.
“नमस्कार डॉक्टर, मी रमेश. आपण एक महिन्यापूर्वी भेटलो होतो. पॅनिक अटॅक चा मला त्रास होता.”
मी त्याला अडवत लगेच म्हणालो,”अरे हो! हो! रमेश बोल. अरे ओळखलं मी तुला. बोल कसा आहेस तू?”
“धन्यवाद डॉक्टर! तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाने मी आज एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे धडधड झाली तरीही मी धडपड व तडफड करत नाही आणि श्वास गुदमरला म्हणून मी गोंधळूनही ही जात नाही. आता मला पोटाने सहज श्वास घेता येत आहे आणि माझे विचारही मला हवे ते, हवे तेव्हा निवडता येत आहेत. एक महिना लागला डॉक्टर. पण मी हार मानली नाही.”
मी प्रसन्न झालो आणि बोललो, “धन्यवाद रमेश! तुझ्या जिद्दीला, तुझ्या धडपडीला, तुझ्या इच्छाशक्तीला माझा सलाम. हे तुझेच कष्ट आहेत.”
“धन्यवाद डॉक्टर! ठेवतो आता”!
“बाय! टेक केअर”.
केवळ एकाच भेटीत माझ्या मनात कायम घर करून, आठवणीत राहील अशी इच्छाशक्ती, जिज्ञासा, जिद्द व कार्यतत्परता अशी अमूल्य भेट देऊन रमेशने फोन ठेवला होता.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ बारामती.