आपल्याला ‘हाक मारता’ यावी म्हणून आपलं ‘नाव ठेवतात,’
आपण याच नावावरून ‘झ्याकी मारल्यास’ आपल्याला ‘नावं ठेवतात’.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
प्रेम:
“माझं तुझ्यावर प्रेम आहे” असं म्हणताना जर “तू माझ्यावर प्रेम कर” अशी छुपी याचना व भावना असेल तर, प्रेमाबद्दल अजून थोडे जाणणे गरजेचे आहे.
भावनिक:
जो आपला वाटतो, आपल्यातला वाटतो व आपल्या सारखा वाटतो त्याच्या बाबतीत आपण भावनिक बनतो आणि इतरांच्या बाबतीत मात्र शुद्ध तार्किक.
क्रोधाग्नी:
क्रोधाग्नी; दाबून टाकल्यास त्याचा स्फोट होईल, व्यक्त केल्यास तो आग लावून देईल, जाणून व ओळख करून घेतल्यास तो अंत:करणात उजेड पसरवेल.
दोस्त:
“दोस्त” म्हणजे दोन अस्त; “मी” व “तू” दोघांचाही अस्त,
दोस्त म्हणजे दोष अस्त; “दोष पाहण्याच्या” प्रवृत्तीचा अस्त,
दोस्त म्हणजे दो अस्त; “दे दे प्रवृत्तीचा” अस्त.
विचार:
आपण डोकं खाजवून आणि आठवणीला ताण देऊन शोधून काढतो ते इतरांचे विचार व जे आपल्याला पोटातून व ह्रदयातून आपोआप स्फुरतात ते आपले विचार. इतरांचे विचार आपल्याला लागू होत नाहीत आणि आपले विचार इतरांना लागू होत नाहीत.
तथ्य आणि सत्य:
तथ्य आणि सत्य:
तथ्य आणि सत्य यात अगदी थोडसंच अंतर आहे. तथ्य म्हणजे वस्तुस्थिती ही जाणत्या मनाच्या स्तरावर असते तर सत्य म्हणजे समज ही अजाणत्या मनाच्या स्तरावर असते. वस्तुस्थिती मध्ये काही गैर असेल तर ते आपल्याला लगेच पटते परंतु समजेमध्ये काही गैर असेल तर ते आपल्याला सहजासहजी पटत नाही. आपले अजाणत्या मनातील समज, बोध, व अर्थ यामधूनच तर बाहेरील तथ्याचे रूपांतर अजाणत्या मनातील सत्यामध्ये होते. तथ्यावर आपल्या जाणत्या मनाची सत्ता चालते, पण अजाणत्या मनातील सत्य आपल्या जाणत्या मनावर व पर्यायाने आपल्या समग्र जीवनावर सत्ता गाजवते.
आपले अजाणते मन तथ्य व सत्य यात फरक करू शकत नाही ते काम जाणत्या मनाचे आहे. म्हणून कोणत्याही वस्तुस्थितीचा किंवा तथ्याचा सत्य म्हणून स्वीकार करताना आपण व आपल्या जाणत्या मनाने दहा वेळा विचार करावा. आपण आपल्या जाणत्या मनाला पुन्हा पुन्हा हा एक प्रश्न विचारावा की जे आहे ते तथ्य आहे की सत्य आहे? ही वस्तुस्थिती आहे का इतर कोणालातरी वाटलेले सत्य आहे? कारण जर का अजाणत्या मनामध्ये एखादी चुकीची वस्तुस्थिती किंवा तथ्य, सत्य म्हणून प्रस्थापित झाले, तर तेच सत्य समजून अजाणते मन, अजाणतेपणी व नकळतपणे आपल्याकडून आपली इच्छा नसताना, त्याप्रमाणेच बोलणे, वागणे व कृती करवून घेते, अर्थात आपल्या अजाणत्या मनाचे प्रोग्रॅमिंग होते. म्हणून हे अजाणत्या मनाचे प्रोग्रॅमिंग आपण व जाणते मन दोघांनी मिळून सावधपणे, समजून-उमजून, शांतपणे व सजगपणे केलेले बरे, यात घाई गडबड नको. अन्यथा मग बोलायचं होतं एक आणि बोललो दुसरेच, करायचं होतं एक आणि केलं दुसरंच आणि मनात होतं एक आणि झालं दुसरंच अशी आपली केविलवाणी अवस्था होऊन जाते.
विजयपथ:
अंतर्मनात प्रवेश करताना, आपल्या मनाला जाणून व समजून घेण्याचा भाव म्हणजे आपला विजयपथ; तर मागण्या, हट्ट, तक्रारी व भांडणतंटे करण्याचा भाव म्हणजे विजयपथाकडे वळण घेण्याची एक संधी.
पिंगा:
ज्या विचारांना वाईट, वर्ज्य व नकोशे समजून, आपण त्यापासून स्वत:ला दूर ठेऊ इच्छीतो, त्याच विचारांभोवती आपलं मन पिंगा घालू लागतं.
स्व:प्रतिमा:
आपण बाहेरच्या जगातील आपल्या स्व:प्रतिमेला जितकं जास्त जीवापाड जपतो व तीच स्व:प्रतिमा खरी असल्याचं सिद्ध करण्यासाठी जितकी जास्त धडपड करतो, तितकेच जास्त आपण आपल्या अंतर्मनातील खरीखुरी स्व:प्रतिमा पहायला व स्वतःच स्वतःच्या नजरेतून उतरायला घाबरतही असतो.