निरसन:

आपल्याला आपल्या चिंतांचं व शंकांचं निरसन करायचं असेल तर आत्ताच्या विचारांना सोडून देऊन थोड्या वरच्या किंवा खालच्या पायरीवरील विचारांना पकडायला हवं.

दृष्टीकोन:

समस्येबद्दल विचार करूया की, समस्या ती गोष्ट आहे? की त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन? म्हणून इतर काही दृष्टीकोनही समजून घेऊन विचारात घ्यायला शिकूयात.

आंतरिक शक्ती:

पद, प्रतिष्ठा, रंग, रूप, सत्ता, संपत्ती, अधिकार, श्रेणी, शारिरीक शक्ती या बाह्य व उसन्या शक्तींपेक्षा आपल्या आंतरिक शक्तींवर जास्त विसंबायला शिकूयात.

भावनिक ताकद:

आपल्या प्रिय व्यक्तीचं बोलणं आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून व मनात समजून घेण्याची इच्छा ठेवून; ऐकून घ्यायला शिकणं म्हणजे आपली भावनिक ताकद वाढवणे.

पहिली पायरी:

एखाद्या क्षेत्रातील आपले शिक्षण व विकास सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे आपण ज्ञानाच्या व अज्ञानाच्या कोणत्या पायरीवर किंवा स्तरावर आहोत याचा शोध घेणे.

वेळ:

नियोजनासाठी लागणारा वेळ, ऊर्जा व कष्ट वाचवण्यासाठी घाईगडबडीत घेतलेले शॉर्टकट, आपल्याला मिळू शकणारे अपेक्षित परिणाम व फायदे कट शॉर्ट करू शकतात.

पायरी:

समजून घेऊया की स्वतःचा विकास नेहमी पायरीपायरीने होतो, प्रत्येक पायरी महत्वाची असते, ती गाळता येत नाही, प्रत्येक पायरीला ठराविक वेळ लागतो आणि मोठ्या पायऱ्या छोटया छोटया पायऱ्यांमध्ये विभागता येऊ शकतात.

अज्ञानी:

स्वतःच्या चांगल्या किंवा वाईट भावना, धारणा, हेतू व दृष्टीकोन यांबद्दल काहीच माहिती व ज्ञान नसलेल्या अज्ञानी व अशिक्षित व्यक्तीला खूप काही शिकण्यासारखे आहे.

अंधविश्वास:

खऱ्या गोष्टींना, वास्तवाला व सत्याच्या प्रकाशाला झाकोळून टाकणारे सर्वात मोठे ढग म्हणजे आपले अंधविश्वास, संकुचित समज, चुकीच्या धारणा व कट्टर दृष्टीकोन.