कोणतेही काम पूर्णत्वास न्यायचे असेल तर काही ठोस कारण असावे लागते म्हणूनच आपले महत्वाचे व विधायक कार्य पूर्ण व्हावे यासाठी खूपसारी ठोस कारणे शोधून ठेवायला सुरुवात करूयात.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
आत्मसंयमी:
आपल्या स्वतःच्या अंतःकरणातील उपजत मानसिक, भावनिक व वैचारीक आवेग आणि कल वेळीच ओळखायला, स्वीकारायला, जाणायला व रोखायला शिकून आत्मसंयमी बनण्याचा आपण प्रयत्न करत राहूया.
दृष्टिकोन:
विधायक, रचनात्मक व उपायाभिमुख विचार, भावना व कामे यांना प्रोत्साहन देणारे दृष्टिकोन आपण स्वतः निवडायला, घ्यायला, शिकायला, बाळगायला व वाढवायला शिकूयात.
आवाका:
जी गोष्ट आपल्याला वारंवार त्रास देते किंवा बेचैन करून सोडते, ती बऱ्याच वेळा आपल्या आकलनशक्तीच्या बाहेर असते, म्हणून आपल्या या शक्तीचा आवाका वाढवायला शिकूया.
ध्येय:
आपले जीवन अर्थपूर्ण व कृतार्थ बनवण्यासाठी हरघडी स्वतःसाठी अर्थपूर्ण, परोपकारी, सहकारी किंवा सकारात्मक ध्येय ठरवून त्यानुरूप वागण्याची व बोलण्याची दिशा ठरवायला शिकूया.
विचार:
कालचा किंवा उद्याचा विचार अतिशय जास्त प्रमाणात असेल तर आपण ताणतणावात आहोत हे ओळखुया, मनाला हटकून व गोंजरून फक्त आजचाच विचार करायला ठरवायला शिकूया.
ठीक:
जी गोष्ट आपल्याला पचत नाही ती खाऊ नये, जरी खाल्ली तरी थोड्याबहुत त्रासानंतर काही दिवसांत सर्वकाही ठीक होते, टोकाचे विचार व नकारात्मक भावनांचेही अगदी तसेच असते, हे समजून घ्यायला शिकूया.
प्रयत्न:
आपल्या हाताबाहेरील गोष्टी हातात आणत बसण्याऐवजी आपल्या हातातील गोष्टी हाताबाहेर जाऊ नयेत यासाठी सतत प्रयत्न करत रहायला शिकूया.
शक्यता:
दोष, टिका, इज्जत, मान, अपमान, अब्रू, संस्कार, संस्कृती, परंपरा, कुळ, रीत या गोष्टी आपल्या बोलण्यामध्ये असतात तेव्हा आपण भावनेच्या भरात असण्याची शक्यता ओळखायला शिकूया.
निवड:
भावनेच्या भरात आपण दिलेल्या अविवेकी, अव्यवहार्य व ध्येयविरोधी प्रतिक्रियांवर कायम ठाम राहण्याऐवजी, वेळीच नंतर विवेकी व ध्येयसंमत प्रतिसादांची निवड करायला शिकूया.