“आपल्या मनाला काय व कसं वाटावं? हे आपल्या हातात आहे आणि आपण आपलं वाटणं आपल्याला हवं तसं आपण स्वतः बदलू शकतो,” हे समजून व पटवून घ्यायला शिकूयात.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
नियंत्रण:
कोणत्या भावभावना आपल्याला याव्यात यांवर आपलं नियंत्रण नाही, मात्र त्यांबद्दल आपल्याला काय व कसे वाटावे? व आपण काय व कसे करावे? यांवर संपूर्ण नियंत्रण आहे, हे समजून घ्यायला शिकूया.
निवड:
एखाद्या वाईट घटनेबरोबर येणारा राग व दुःख यानंतर आपल्याला ‘वैफल्यग्रस्त’ वाटण्याऐवजी ‘शांत व संतुलित’ वाटेल अशा स्वरूपाच्या विचारांची आपण निवड करायला शिकूया.
भीती:
शरीरात भीतीची लहर आल्यावर ‘भीऊ नको!, एवढे काय घाबरायचे?’, असे म्हणण्याऐवजी ‘ही आहे भीतीची लहर, ती येणार तशीच ती जाणार’, असं म्हणायला शिकूयात.
कळतंय:
‘कळतंय पण वळत नाही’, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट पटली व समजली आहे असे वारंवार म्हणणे पण ती मनाला रूचलेली व मनात रुजलेली नसणे, हे समजून घ्यायला शिकूया.
प्रतिसाद:
आपण स्वतः विश्वास दाखवल्यास, सहकार्य केल्यास व चांगले वागल्यास आपल्याला समोरच्याकडूनही तसाच प्रतिसाद मिळण्याची जास्त शक्यता असते, हे समजून घ्यायला शिकूया.
परतफेड:
जेव्हा एखादी गोष्ट आपली इच्छापूर्ती किंवा आपल्यावर मेहेरबानी वाटते तेव्हाच आपण सहकार्य करून त्याची सढळ हाताने परतफेड करण्याचा प्रयत्न करतो, हे समजून घ्यायला शिकूया.
व्यक्त:
आपण स्वतःबद्दल जे काही लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो ते आपण स्वतःच अप्रत्यक्षरीत्या जाहीरपणे व्यक्त करीत राहतो, हे समजून घ्यायला शिकूया.
अपेक्षा:
आपण ज्या काही इच्छा किंवा अपेक्षा करत आहोत त्या वास्तविक तत्वं व खरीखुरी तथ्यं यांवर आधारित आहेत का? या गोष्टींचा आपण स्वतः शोध घ्यायला शिकूयात.
प्रश्न:
राग किंवा वैफल्य यांशिवाय आपण समोरच्या घटनेला सामोरे जाऊ शकतो काय? हा प्रश्न आपण हरघडी स्वतः स्वतःला विचारायला सुरुवात करूया.