जाणीवपूर्वक:

आवडीची किंवा निवडीची असे जाणीवपूर्वक ठरवलेल्या व जाणीवपूर्वक स्मरणात ठेवलेल्या गोष्टी आपले लक्ष जास्त वेळ पकडून ठेऊ शकतात, हे समजून घ्यायला शिकूया.

अंदाज:

एखाद्या गोष्टीत एखादी व्यक्ती तरबेज असेल तर त्यावरून ती इतरही सर्व बाबतीत चांगली व तरबेज असेल, हा अंदाज साफ खोटा ठरू शकतो, हे समजून घ्यायला शिकूया.

वारंवार:

आपण शारिरीक व मानसिक पातळीवर जे जे वारंवार करत जातो त्यामुळे आपल्या मेंदूचा चेहरामोहरा व चेतापेशींच्या अंतर्गत जुळण्या बदलत जातात, हे समजून घ्यायला शिकूया.

संकेत:

आपले ज्ञान महत्त्वाचे आहे, पण  ते ज्ञान कधी? कोठे? व कसे? वापरायचे हे ठरवणाऱ्या संवेदना व संकेत ओळखायला शिकणे त्याहूनही जास्त महत्त्वाचे आहे, हे समजून घ्यायला शिकूया.

शिकायचे:

आपल्याला जर काही विशेष शिकायचे असेल तर बुद्धीमत्तेबरोबरच खूप आवश्यक काही असेल तर त्या विशेष गोष्टीशी संबंधीत पूरक नातेसंबंध आणि पूरक भावना, हे समजून घ्यायला शिकूया.

कल्पना:

वारंवार कल्पना करतांना आपल्या मेंदूचा प्रत्यक्ष तोच भाग उत्तेजित होतो जो प्रत्यक्ष कृती करताना होतो म्हणून, हव्याहव्याशा कृतींच्या कल्पना करायला शिकूयात.

गुंतून:

ज्या गोष्टींत आपण सक्रीय सहभागी होतो, त्याबद्दल विचार करतो व त्यात वेळ घालवतो त्यांबाबत तटस्थ राहू शकत नाही, भावनिकरित्या गुंतून जातो, हे समजून घ्यायला शिकूया.

समजत:

आपण स्वतःला बऱ्याच वेळा आपण खरोखर आहोत त्यापेक्षा खूपच वरच्या पायरीवरचे, खास, हुशार, स्पेशल व वेगळे समजत असतो, पण तसे काही नसते, याचे भान ठेवायला शिकूया.