आपण केलेल्या, न केलेल्या प्रत्येक क्रुतीचा व बोललेल्या, न बोललेल्या प्रत्येक शब्दाचा, परिणाम होतो; अनुकूल किंवा प्रतिकूल.
वाटचाल:
कोणी महत्वाची व्यक्ती पाहत नसतानाही, आपले काम चोख पूर्ण करणे व सुयोग्य वर्तन करणे, म्हणजे यशाकडे वाटचाल करणे.
फरक:
नातेसंबंधातील जवळपास सर्व संघर्ष व विसंवाद एकाच गोष्टीमुळे होतात, आपल्या व त्यांच्या प्राधान्यक्रमांमधील फरक.
करतो:
आपण काय बोलतो व दाखवतो यापेक्षा, दररोज आपण काय करतो यावरून, आपली ध्येयं आणि उद्दिष्टं स्पष्ट समजतात.
सत्कारणी:
प्राप्त परिस्थितीत, स्वतःमधील अंगभूत गुणांचा व क्षमतांचा, जास्तीत जास्त व योग्य वापर मी कसा करू शकतो? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दिलेला वेळ म्हणजे सत्कारणी वेळ.
बंद:
आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक भावना, पिटाळून लावण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे, इतरांवर दोषारोप करणे बंद करणे.
छाप:
इतरांवर छाप पाडण्यापेक्षा, इतरांमध्ये छाप पडण्यासारखे काय आहे? ते शोधल्यास, नातेसंबंध आपल्याला फायदेशीर ठरतात.
मनोधैर्य:
स्वतःविषयी अवास्तव कल्पना बाळगण्याऐवजी, आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारणे, म्हणजे खरे मनोधैर्य.
धडपड:
दैनंदिन जीवन जगताना उगीचच धडपडण्यापेक्षा, एखादे छोटेसे व स्पष्ट उद्दिष्ट ठेवून, ते गाठण्यासाठी धडपड करणे कधीही उत्तम.
स्मृतिभ्रंश टाळा, नियम पाळा:
(जागतिक स्मृतीभ्रंश दिनानिमित्त)
निसर्गामध्ये मानवी कौशल्ये आणि क्षमता यांबाबत काही त्रिकालबाधित नियम आहेत. अशा नियमांमधलाच एक महत्त्वाचा नियम आहे “वापर आणि वाढ” नियम. या नियमानुसार ज्या क्षमतांचा आपण वारंवार उपयोग करतो, त्यांमध्ये वाढ होते व त्यामध्ये आपण पारंगत होत जातो, ज्या क्षमतांचा आपण कमी वापर करतो किंवा वापर करणे बंद करतो, त्यांचा नाश होतो व त्या लयाला जातात. हा नियम मानवी मन, मानवी मेंदू, मानवी स्मृती, मानवी कौशल्य आणि क्षमता यामध्ये तितकाच लागू पडतो जितका तो आपल्या गाडीच्या बाबतीत लागू पडतो. आपण आपल्या गाडीचा जितका दररोज आणि योग्य वापर करू, तितकी ती गाडी आपल्याला चांगल्या ऍव्हरेजने, कमी खर्चात व जास्त दिवस वापरता येते. मानवी मनाचं, मेंदूचं, स्मृतीचं आणि कौशल्य-क्षमतांचा ही अगदी तसंच आहे. आपण आपल्या कौशल्यांचा, विचारांचा, स्मृतीचा, कल्पनांचा आणि कल्पनाचित्रांचा जितका जास्त वापर करू, तितकं आपलं मन जास्त तजेलदार आणि सक्रिय राहतं यात शंका नाही.
आपलं मन व मेंदू म्हणजे करोडो पेशींचा आश्चर्यजनक व सुनियोजित समूह आहे. या पेशी खूप स्पेशल असतात आणि अनोख्या पद्धतीने बनलेल्या आहेत. त्यांना मज्जापेशी किंवा चेतापेशी म्हणतात. या मज्जापेशींमध्ये एक मुख्य मज्जातंतू असतो, जो पेशींकडून तरंग वाहून नेतो आणि असंख्य उपमज्जातंतू असतात जे पेशींकडे तरंग घेऊन येतात. एक मज्जापेशी आसपासच्या इतर जवळजवळ पन्नास हजार पेशींशी मज्जातंतूंच्या सहाय्याने जोडलेली असते. या सर्व जोडांमधून एक प्रकारचं विशाल जाळं तयार होतं, ज्याची तुलना आपल्या विशाल ब्रम्हांडाशी केली जाऊ शकते. ज्या ठिकाणी दोन चेतापेशी जोडल्या जातात, त्या जोडाला सायन्यँप्स असं म्हणतात. असे अगणीत जोड, अगणीत जाळ्या व अगणीत तरंगमार्ग आपल्या मेंदूमध्ये असतात. त्या तरंगमार्गामध्ये जोड ओलांडताना तो तरंग न्यूरोकेमिकल म्हणजे रासायनिक प्रकारात रूपांतरीत होतो. जोड ओलांडल्यानंतर तो न्यूरोकेमिकल तरंग पुन्हा इलेक्ट्रिक तरंगामध्ये रूपांतरित होतो. जोडांमधील न्युरोकेमिकल तरंग फक्त एकाच दिशेने प्रवाहित होतो आणि त्यामुळे या तरंगांच्या प्रवाहाच्या दिशेवर नैसर्गिक व रसायनिक नियंत्रण आणले जाते. आतापर्यंत लागलेल्या शोधानुसार आपल्या मेंदूमध्ये जवळपास सहाशे प्रकारची न्युरोकेमिकल्स रसायने आहेत. या सर्व रसायनांच्या माध्यमातून हे तरंग अर्थात चेतना आपल्या मेंदूमध्ये गर्भावस्थेपासून मृत्यूपर्यंत अविरतपणे दिवसरात्र फिरत असतात.
जेव्हा आपण प्रथमच एखादी गोष्ट करतो, तेव्हा काही तरंग ठराविक मार्गातून, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात. हे तरंग जेव्हा एखाद्या ठरावीक मार्गातून, जोडांमधून आणि जाळीतून वारंवार जातात, तेव्हा त्या तरंगमार्गामध्ये काही रासायनिक बदल झाल्यामुळे, ते तरंग पूर्वीपेक्षा जास्त वेगाने पुढे सरकतात. जेव्हा तरंग एखाद्या जाळीतून मार्ग काढत जातात, तेव्हा त्या तरंगमार्गावर एक अस्पष्ट असा रस्ता तयार होतो. जेव्हा त्या ठराविक गोष्टीचा आपण पुन्हा पुन्हा सराव करतो, तेव्हा त्या ठिकाणी एक स्पष्ट पाऊलवाट तयार होते. जेव्हा तीच ठराविक गोष्ट आपण महिनोंमहिने व वर्षानुवर्षे करत राहतो, तेव्हा त्या ठिकाणी एक मार्ग द्रुतगती मार्ग तयार होतो.
जेव्हा आपण एखादी गोष्ट आयुष्यभर करण्यासाठी निवडतो आणि तीच गोष्ट आयुष्यभर करत राहतो, तेव्हा हे तरंग पाठवणारा रस्ता द्रुतगती मार्गामध्ये रूपांतरित होतो. यातूनच आपल्याला निरनिराळ्या सवयी लागत असतात व स्वभाव तयार होत असतात. अर्थात आपल्या सवयी व आपला स्वभाव म्हणजे आपल्या मेंदूच्या विशाल जाळ्यांमध्ये असलेले छोटे छोटे द्रुतगतीमार्ग असतात. परंतु या आश्चर्यजनक गोष्टीचा काही तोटा सुद्धा आहे. ज्या ठिकाणी मार्ग तयार होऊ शकतो, छोटी पायवाट तयार होऊ शकते, त्याठिकाणी आपण कधीही गेलो नाही, तर ती पायवाट बुजून जाते. त्याप्रमाणे जे तरंगमार्ग, ज्या जाळ्या आपण आयुष्यात कधीच वापरत नाही, त्या जाळ्या काळाच्या ओघात नष्ट होत जातात. कालांतराने ज्या पेशींमधून हा तरंगमार्ग जातो व या जाळ्यांची निर्मिती होते, त्या संबंधित चेतापेशीही नष्ट होतात. खूप साऱ्या चेतापेशी मृत होऊन नष्ट होण्यातूनच व्यक्तीला स्मृतीभ्रंश सारखे आजार सुरु होतात. यासाठी आपल्या मनातील द्रुतगतीमार्ग म्हणजे सवयी, स्वभाव व महत्त्वाची कामं आपण चांगल्या प्रकारे व नैपुण्यपूर्ण पद्धतीने करावीत. त्याचबरोबरीने आपण आपल्या मेंदूतल्या पायवाटांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. एवढेच नव्हे तर नवीन पायवाटा व तरंगमार्ग बनवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. आपण मेंदूमध्ये जेवढे जास्त नवीन तरंगमार्ग व तरंगजाळ्या बनवू, तेवढ्या जास्तीत जास्त चेतापेशी जास्त काळ जिवंत राहतील. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मेंदूला व मनाला कामाला लावणे, अर्थात त्याला दैनंदिन जीवनातील लहान लहान आव्हान स्वीकारायला मदत करते.
बालपणी आपल्याकडे जशी जिज्ञासा होती, प्रश्न विचारण्याची, माहीत करून घेण्याची, नवीन काही करण्याची गडबड होती, उत्साह होता, तो उत्साह व ती जिज्ञासा आपण आयुष्यभर कायम ठेवल्यास, आपली स्मृति, कौशल्ये, विचार करणारे, कल्पना करणारे तरंगमार्ग व चेतापेशीजाल वाढत जाते. एवढेच नव्हे लहानपणी शिकलेल्या चुकीच्या व तोट्याच्या सवयी आपण बंद करू शकतो, आणि त्या जागी नवीन, योग्य, चांगल्या आणि फायद्याच्या सवयी शिकून घेऊ शकतो. एखाद्या नवीन आणि विकसित पद्धतीने वारंवार प्रतिक्रिया देऊन आणि तशीच सरस प्रतीक्रिया देऊन आपण स्वतःला चांगली सवय लावून घेऊ शकतो. आपल्या स्वभावातील दुर्गुण जे आपल्याला आपली ध्येय आणि स्वप्न पूर्ण करण्यापासून आपल्याला थांबवून ठेवतात, तेसुद्धा आपण आपल्या स्वभावातून काढून टाकू शकतो, आणि हवे असलेले सद्गुण आपण आपल्या स्वभावात साकारू शकतो.
वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळे विचार, वेगवेगळी क्षेत्रे याबद्दल प्रश्न विचारणे, समजावून घेणे व चिंतन करणे या गोष्टींमुळे आपल्या चेतापेशींना व तरंगमार्गांना कामात ठेवू शकतो.
नियोजनात भाग घेणे, नियोजन करणे, योजना आखणे, स्वतःसाठी छोटी-छोटी ध्येयं ठरवणे, छोटी छोटी स्वप्न पाहणे, छोट्या छोट्या आशा-आकांक्षा ठेवणे, त्यासाठी योजना आखणे, आणि त्या मिळविण्यासाठी प्रयत्न करणे. नवीन गोष्टी शिकणे, नवीन मार्ग शोधून काढणे, आपला कोणता प्रयत्न काम करत नाही, कुठला प्रयत्न काम करतो याचं विश्लेषण आणि समीक्षण करणे, अशा प्रकारच्या मानसिक कामांमुळे, आपल्या मेंदूमध्ये नवनवीन पायवाटा, तरंगमार्ग आणि तरंगजाळ्या तयार होत असतात.
मोबाईलच्या आणि कॅल्क्युलेटरच्या जमान्यामध्ये आपण छोट्या-मोठ्या तोंडी आकडेमोडी करत नाही. त्याची आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागते. आपल्या मेंदूतील बऱ्याच चेतापेशी व पायवाटा त्यामुळे गायब होतात. म्हणून छोट्या-छोट्या आकडेमोडी तोंडी स्वरूपात करणे, आपल्या मनाच्या पाठीवर मनाच्या पेन्सिलीने लहान-मोठे आकडे लिहून त्यांच्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार व भागाकार करणे मनासाठी खूप महत्त्वाचे आहे. पेपर मध्ये येणारी शब्दकोडी, सुडोकू, क्रॉसवर्ड पझल, इत्यादी सोडवण्याचा प्रयत्न करणे, नवनवीन शब्द ऐकणे, वाचणे, शब्दांचे नवनवे अर्थ समजून घेणे, नवीन भाषांमधील नवीन शब्द समजावून घेणे, त्याचा अर्थ त्याचा अलंकार लक्षात घेणे, नवीन सुविचार ऐकणे, त्यांचे वाक्यात उपयोग करणे, नवीन वाक्यप्रचार बोलताना वापरणे, त्यांचा वाक्यात उपयोग करणे, नवीन भाषा शिकणे इत्यादींमुळे आपला मेंदू तरोताजा व चिरतरुण राहायला मदत मिळते.
दररोजचा व्यायाम, आवडीचा खेळ, विविध व्यायाम प्रकार शिकणे, समाजामध्ये मिक्स होणे, सामाजिक कार्यांमध्ये धडाडीने काम करणे, कौटुंबिक कार्यक्रमात भाग घेणे, गरजूंना मदत करणे, इतरांच्या समस्या ऐकून घेणे, समजून घेणे, इतरांना भावनिक आधार देणे, इतरांच्या ठिकाणी स्वतःला समजून त्यांच्याबाबतीत सहानुभूती दाखवणे, या माध्यमातून आपण आपल्या मेंदूचा व मनाचा विकास करीत असतो. कथा-कादंबऱ्या वाचणे, नवनवीन काव्य वाचन करणे, नवनवीन कला, कलाकृती, पाककृती शिकणे, आपल्या क्षेत्रातले आणि इतरांच्याही क्षेत्रातले वाचन करणे, गोष्टींमागील कारण परिणाम समजून घेणे, नवीन नवीन सिनेमे, चित्रपट, डॉक्युमेंटरी पाहणे आणि त्यावर विचार करणे, समीक्षण करणे या गोष्टींमुळे आपले मन व मानसिक कौशल्य वापरले जाते आणि जे वापरले जाते ते वाढत जाते, विकसित होत जाते.
थोडक्यात, आपलं जीवन बहुरंगी, बहुढंगी व ऊर्जामय पद्धतीने आणि पूर्ण शारिरीक व मानसिक कौशल्ये आणि क्षमता वापरून, आनंदाने व सुखाने जगणे व जगू देणे, हेच स्मृतीभ्रंश टाळण्याचे खरे इंगित आहे.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ बारामती