कुणालातरी काहीतरी करून दाखवत व धडा शिकवत बसण्यापेक्षा, आपण स्वतःच काही धडा घ्यावा व स्वतःलाच काही करून दाखवावे.
हवं:
आपल्याला काय? कीती? का? कसे? व कधी? हवं आहे हेच आपण स्वतःच्या मनाला व अंतर्मनाला स्पष्टपणे व वारंवार सांगावे.
बनणे:
आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी इतरांना बनवण्यापेक्षा, स्वतःच ते स्वप्न बनणे व स्वतःला स्वप्नपूर्तीकार बनवणे, केव्हाही उत्तम.
कोटा:
दु:खी-कष्टी, निराश, असहाय व भयभीत लोकांना जर सहाय्य करायचे असेल तर, आपला आनंदाचा कोटा नेहमी भरलेला ठेवावा.
प्रवास:
आपला “असण्या”पासून ते “बनण्या”पर्यंतचा सुंदर प्रवास, दररोज यथायोग्य कृती पूर्ण “करण्या”च्या मार्गाने पूर्णत्वास जातो.
पुनर्विचार:
अर्थ लावण्यात, संबंध जोडण्यात, तुलना करण्यात, सूत्र शोधण्यात व जोड्या जुळवण्यात मन घाईगडबड करते; पुनर्विचार केलेला बरा.
ऊर्जा:
क्रुती करायला किंवा टाळायला लागणारी ऊर्जा; भावना पुरवतात, म्हणून आपल्या भावनांवर बारीक लक्ष ठेवण्याची जाणीव असावी.
योग्य सल्ला:
आपल्याला मिळालेला योग्य सल्ला, जेव्हा आपण प्रत्यक्ष आपल्या क्रुतीत व वागण्यात उतरवतो, तेव्हाच तो योग्य सल्ला ठरतो.
भविष्यदशा:
आपण जो संकल्प करतो व जसे ठरवतो, त्याप्रमाणे नक्की क्रुती करतो किंवा वागतो काय? यावर आपली भविष्यदशा ठरते.
प्रभावी:
समोरच्या व्यक्तीच्या काळज्या, गरजा व भावना समजावून घेता आल्यास व त्याबद्दल तद्नुभाव वाटल्यास, आपण प्रभावी व किंमतीचे ठरतो.