जेव्हा आपण, जे काही योग्य व चांगलं केलं आहे, त्यावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा ते अजून चांगल्या पद्धतीने करण्यास प्रोत्साहित होतो.
स्वतः
आपली स्वप्नं, आशा, आकांक्षा प्रत्यक्षात उतरवायच्या असतील, तर सर्वांत जास्त काम आपल्याला, स्वतःवरच करावे लागते.
धन्यवाद:
आपल्या प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद हे आपलंच स्वतःचं प्रतिबिंब असतं, ते पाहूया व समजून घेऊया, मदतीबद्दल समोरच्याला धन्यवाद देऊया.
सिद्ध:
आपणच कसे बरोबर आहोत, हे सिद्ध करण्याच्या गडबडीत, आपण सिद्धींच्या विविध मार्गांपासून जास्तच दूर जातो.
विद्यार्थी:
आपल्याला जे काही माहीत आहे, ते अपूर्ण किंवा चूकही असू शकते हे मान्य करणे, ही आपण विद्यार्थी असल्याची प्रथम खूण आहे.
जीवनप्रवास:
आपण इतरांचं कौतुक, प्रशंसा व आदर ज्या ज्या गोष्टी मिळवल्याबद्दल करतो, त्या त्या सर्व गोष्टींकडेच आपला जीवनप्रवास सुरू असतो.
शक्य:
जोपर्यंत आपण “शक्यच नाही” हा विचार “शक्य आहे” मध्ये बदलून घेत नाही, तोपर्यंत प्रत्यक्ष काही करण्याची शक्यता कमी आहे.
मोकळे मन:
कुटुंबातील व प्रिय व्यक्तीकडून आलेल्या अनपेक्षित प्रतिक्रिया, विचार आणि संकल्पना यांचा स्वीकार करणारे मन म्हणजे मोकळे मन.
ध्यान:
आपलं मन कशावर तरी केंद्रित करणं म्हणजे ध्यान, आपलं ध्यान कशावर आहे हे माहिती असणं म्हणजे भान, आपलं भान योग्य वेळी योग्य ठिकाणी ठेवण्याची समज म्हणजे जाण.
वाद:
छोट्या छोट्या आणि फालतू गोष्टींवरून आपले वाद व भांडणे होत असतील, तर त्या गोष्टी नक्कीच मोठ्या आणि महत्वाच्या असणार.