पर्याय निवडताना:

एखादा पर्याय निवडताना किंवा एखादी कृती करताना, दुसरे काहीतरी जे आपल्यासाठी खरोखर प्राणप्रिय आहे ते आपल्या हातातून सुटून तर जात नाही ना, याची खात्री करायला शिकूया.

काम:

उद्याचे काम आज व आजचे काम आत्ता उरकून टाकण्याच्या नादात, आत्ताचे गरजेचे, महत्त्वाचे व प्राधान्याचे भावनिक स्वरूपाचे काम राहून जाऊ शकते, हे लक्षात घ्यायला शिकूया.

दुःखकारक:

दुःखकारक जगणे म्हणजे वास्तवात कसं आहे? काय आहे? व कसं नाही? ते पूर्ण सोडून देऊन कसं असावं? व काय नसावं? या कल्पनेलाच पकडून जगणे, हे समजून घ्यायला शिकूया.

आशा:

आशा बाळगताना मग त्या स्वतःकडून, इतरांकडून, परिस्थितीकडून, भविष्यकाळाकडून किंवा योगायोगाकडून असल्या तरी त्या फक्त स्वप्नांवर नाही तर वास्तवावर आधारित अशा बाळगायला शिकूया.

औदार्य:

खरे औदार्य म्हणजे जवळ भरपूर असलेली, गरज नसलेली किंवा नावडती वस्तू खऱ्याखुऱ्या गरजूला देण्याऐवजी जवळ थोडीशी असणारी गरजेची किंवा आवडती वस्तू द्यायला शिकणे.

खात्री:

आपले बाह्य आणि आंतरिक वातावरण सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतरच आपण इतरांच्या नवीन कल्पना मनापासून ऐकू शकतो आणि त्यांच्याकडून नवीन काही शिकू शकतो.

आंतरिक सुरक्षितता:

आपल्या मूळ तत्वांशी, खोल हेतूंशी आणि आंतरिक मूल्यांशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहूनच आपण आपली आंतरिक सुरक्षिततेची भावना स्थिर करायला व वाढवायला शिकूया.