सहजीवन म्हणजे फक्त चार भिंतीत एकत्र राहणे नव्हे तर एकमेकांचे दृष्टीकोन व समज स्विकारून एकमेकांचे प्रतिक्रियात्मक जीवन समजून घ्यायला शिकणे.
समजून घेणे:
मुलांना समजून घेणे म्हणजे त्यांच्या नजरेतून त्यांच्या समोरच्या प्रश्नांकडे व आव्हानांकडे बघायला शिकणे, ते म्हणतील तोच नव्हे तर योग्य तो पर्याय निवडायला शिकणे.
अक्कल:
एखाद्याची ‘अक्कल’ कमी लेखून आपल्या अकलेचे तारे तोडण्याऐवजी, त्याची धारणा ‘समजून घेऊन,’ आपल्या अकलेचे ‘आकलन व क्षितिज’ वाढवायला शिकूया.
संवादात:
तार्किक संवादात काही नवीन माहिती होण्यासाठी प्रश्न विचारायला शिकूया, तर भावनिक संवादात सहवेदनेने ऐकून घ्यायला, त्यामागची भावना जाणून व समजून घ्यायला शिकूया.
दुर्दशा:
“सगळं कळतंय पण वळवता मात्र येत नाही” ही आपली दुर्दशा, आपल्याच रागावलेल्या, बचावात्मक, भेदरलेल्या किंवा अपराधात्मक मनोदशेचा परिणाम असते; हे समजून घ्यायला शिकूया.
भावदशा:
आपण चांगलं व छान छान बोललेलं जर समोरच्या माणसापर्यंत पोहोचत नसेल तर, नाराज न होता व न चिडता, आपण त्याची वेगळी व विशिष्ट भावदशा समजून घ्यायला शिकूया.
खरे बोलणे:
इतरांना पटेल व तार्किक वाटेल असे खोटे बोलण्यापेक्षा, पटणार नाही व तार्किक वाटणार नाही असे खरे बोलणे, खूपच फायदेशीर, असे धाडस करायला शिकूया.
ऐकून घेणे:
“ऐकून घेणे म्हणजे समोरचा बरोबर असणे किंवा त्याचे म्हणणे मान्य असणे किंवा त्याचे मताचे समर्थन करणे” या गैरसमजांमुळे आपण इतरांचे ऐकून घेत नाही, ऐकायला शिकूया.
समजून:
दुसऱ्या व्यक्तीला खरंखुरं आणि खोलवर समजून घेण्यासाठी तिच्याच नजरेतून आणि संदर्भ चौकटीतून गोष्टींकडे बघायला हवे, हे समजून घ्यायला शिकूया.
सल्ले:
एकदोन चांगले सल्ले देऊन इतरांच्या समस्या व अडचणी पटापट मार्गी लावण्याच्या नादात, आपण त्यांचा मूळ प्रश्न खोलवर समजून घ्यायला विसरू शकतो, हे लक्षात घ्यायला शिकूया.