स्पष्ट:

आपल्याला नेमके काय हवे आहे? व ते का हवे आहे? हे स्पष्ट माहीत नसेल तर ते कशाही पद्धतीने, कोणालाही दुखावून व कसेही करून मिळवायचेच! ही प्रवृत्ती बळावू शकते.

स्वतःबद्दल:

आपण काय बोलत व करत आहोत? कसं बोलत व वागत आहोत? हे आपल्याला इतरांबद्दल कमी व आपल्या स्वतःबद्दल जास्त सांगतं, मग आपली परिस्थीती, काळ व वेळ कसाही असो.

भूमिका:

आपल्याला जीवनात कोणकोणत्या भूमिका चांगल्या प्रकारे वटवायच्या आहेत, हे स्पष्टपणे ओळखल्यास त्याव्यतिरिक्त इतर मुखवटे वागवण्याची गरजच उरणार नाही.

उत्तरे:

आपण जे करतोय ते का करतोय? ते नक्की महत्त्वाचे आहे काय? नक्की आपल्याला तेच हवे आहे काय? या प्रश्नांची उत्तरे संकट आल्यावर शोधण्याऐवजी आजच शोधून ठेवूया.

कंडीशनींग:

कंडीशन योगायोगाने आली असेल, परंतु कंडीशनींग मात्र आपण स्वतः सरावाने केलेले आहे, म्हणूनच डीकंडीशनींग योगायोगाने होणार नाही, तेही आपल्याला सरावानेच करायला हवे.

स्वीकारणे:

आपल्या दैनंदिन जीवनात प्रतिक्रिया न देता, प्रतिसाद द्यायला शिकण्याचा, सर्वात चांगला मार्ग म्हणजे आपल्या स्वतःच्या वाट्याची जबाबदारी व उत्तरदायीत्व स्वीकारणे.

प्रभावी:

प्रभावी व परिणामकारक होणे म्हणजे आपला प्रभाव कुठे चालतो? व कुठे चालत नाही? यांचा शोध घेऊन आपल्या प्रभावाच्या क्षेत्रात काम करणे व त्या कामांत स्वतःला वाहून घेणे.

दर्जा:

आपल्याला आपल्या आयुष्याचा दर्जा सुधारायचा असेल तर, आपण जे काही करायचे ठरवतो त्याने आपल्या मूल्यांमध्ये कीती भर पडत आहे, यावर लक्ष द्यायला शिकूया.