आपल्या मनातील स्वप्नांचा जन्म आणि ते पूर्ण होणे, यांमधील अंतर, वेळ व अडचणी यांचा आनंद घेत रहाणे म्हणजे चिकाटी.
ओळख:
आपले सद्गुण आणि क्षमता, आपली दुर्बलता व नाजूकता आपल्या अंतर्मनात वास करतात, त्यांची ओळख म्हणजे स्वतःची ओळख.
बदलायचे:
आपली क्रुती आणि आपले वर्तन बदलायचे असेल तर प्रथम त्या गोष्टीबद्दलचे आपले मन आणि मत बदलणे गरजेचे आहे.
उगाळत:
महिनोंमहिने आपण जर त्याच त्या आकांक्षा, आशा, समस्या, अडचणी, संधी, सबबी उगाळत असू तर आपले जीवन थांबलेले आहे.
ठरवताना:
आपण ठरवले तर सर्व काही संपलेले असते, आपण ठरवले तर ती एक नवी सुरुवात असते, म्हणून काहीही ठरवताना थोडे काळजीपूर्वक ठरवूया.
स्वरूप:
‘नकारात्मक परिस्थिती आहे’, असे वाटणे, हे आपल्या नकारात्मक मनःस्थितीचे एक स्वरूप आहे, वास्तविकता नाही.
मार्गावर:
आपण नेहमीच मार्गांच्या शोधात असतो, काम करण्याच्या किंवा काम न करण्याच्या, पहिल्या मार्गावर रहायला शिकूया.
आनंद:
आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद आपल्याला आज घेता येत नसेल, तर उद्या जे काही हवंहवंसं मिळेल त्याचाही आनंद घेणे अवघड जाईल.
उपलब्ध:
आपल्याजवळ जे उपलब्ध नाही, त्याचा शोक किंवा मोह करण्याच्या नादात, जे उपलब्ध आहे ते वाया जाऊ शकते किंवा खराब होऊ शकते.
लक्ष:
आपण जे करु शकत नाही त्याकडे अती लक्ष देण्याऐवजी, आपण जे करु शकतो त्याकडे जास्त लक्ष द्यायला शिकूया.