चातुर्य:

आपल्या आंतरिक भावभावना व आपले बौद्धिक तर्कवितर्क यांचा सुंदर मिलाफ घडवणारे विचार, उच्चार, आचार व व्यवहार यांची जाणीवपूर्वक केलेली निवड म्हणजे चातुर्य, हे समजून घ्यायला शिकूया.

निवड:

निवड गलत वाटत असेल तर लत लागू शकत नाही, लत लागलेली असेल तर निवड गलत वाटू शकत नाही, दोन्ही बाबतीत निवड तर आपलीच असते, हे समजून घ्यायला शिकूया.

प्रवास:

जे विचार आपले तनमनधन घडवायला मदत करतात ते ज्ञान, तर जे विचार आपले तनमनधन बिघडवायला मदत करतात ते अज्ञान, अज्ञान ते ज्ञान हा विचारांचा प्रवास समजून घ्यायला शिकूया.

निर्णय:

इतरांच्या व वैयक्तिक अर्थ नसलेल्या गोष्टींबाबतीत आपण योग्य व ठीक निर्णय घेतो, पण स्वतःच्या भावनिक व वैयक्तिक अर्थ असलेल्या गोष्टींबाबतीत मात्र गडबडून जातो, हे समजून घ्यायला शिकूया.

स्वयंशिस्त:

स्वयंशिस्त म्हणजे आपण आपल्या मनातील प्रिय-अप्रिय, आवड-नावड यांची आपल्या जगण्यातील गरजांशी आणि जीवनातील स्वप्नांशी व इच्छांशी घातलेली सांगड, हे समजून घ्यायला शिकूया.

जीवनशिक्षण:

आपण आपले स्वतःचे विचार, भावभावना, उच्चार व आचार यांबद्दल तज्ञ जाणकार बनायला व सजग व्हायला शिकणे म्हणजे खरे जीवनशिक्षण घेणे, हे समजून घ्यायला शिकूया.

विजय:

खऱ्या अर्थाने आनंदी व सुखी होण्यासाठी आपण आपल्या स्वतःच्याच मनातील भित्या, काळज्या व चिंता यांवर आपल्याच शरीरात, मनात व अंतर्गत जगात विजय मिळवायला शिकूया.

कसोटी:

आपली परीक्षा किंवा कसोटी पाहणाऱ्या प्रसंगांना सामोरे जात असताना आपल्याला व आपल्या स्वप्नांना सहाय्य होईल अशाच गोष्टी, शब्द व वाक्ये आठवायला, बोलायला व करायला शिकूया.

सुसंगत:

आपले प्रियजन आपल्याला देत असलेल्या उपाधींशी व लावत असलेल्या शाब्दीक लेबलांशी सुसंगत असे वागण्याचा आपण नकळत प्रयत्न करत असतो, हे समजून घ्यायला शिकूया.

बदल:

आपण तेव्हाच काही बदल घडवू शकतो जेव्हा पर्यायांची निवड, आपल्या भाकीतांची माघार किंवा अपेक्षित परिणामांची लवचिकता आपल्याला शक्य असते, हे समजून घ्यायला शिकूया.