आपल्या मनात येणाऱ्या विविध भावभावनांचे आपल्या जीवनावर व मनावर आत्ता लगेच व भविष्यात काय काय परिणाम होतात? ते एक त्रयस्थ व अनोळखी व्यक्ती होऊन पहायला शिकूया.
प्रतिमा:
आपल्या मनातील पूजनीय, आदर्शवत व अनुकरणीय प्रतिमा नेहमी माणसांच्याच असतात, ज्यांची काही शक्तीस्थाने तर काही उणीवा या असणारच, हे समजून घ्यायला शिकूया.
स्विकार:
इतरांचा विनाअट स्विकार करणे व त्यांचेवर बोचरी टीका न करणे सहजसाध्य होण्यासाठी अगोदर आपण आपला स्वतःचा जसा आहे तसा स्विकार करायला शिकूया.
चारित्र्य:
आपण योग्य असूनही आपल्याला फळ म्हणून नकार, अवहेलना, अपमान व अयोग्य परिणाम मिळत असतील, तरीही आपण मात्र योग्यच राहणे म्हणजे खरे चारित्र्य, हे समजून घ्यायला शिकूया.
नाव:
परिस्थितीला किंवा व्यक्तीला प्रतिक्रिया देत असताना अगोदर आपल्या शरीरातील व मनातील बदल ओळखून त्या बदलांना साजेशा भावनेचे नाव आणि संदर्भ द्यायला सुरुवात करायला शिकूया.
प्रतिक्रिया:
आपल्या प्रतिक्रिया बऱ्याच वेळा आत्ताच्या घटनेबाबत नसून आपल्या किंवा इतरांच्या जीवनातील घडून गेलेल्या पूर्वीच्या घटना, गोष्टी किंवा अनुभवांबाबत असतात, हे समजून घ्यायला शिकूया.
संदर्भ:
आपण आपल्या स्वतःच्या आदिम, खोल व आंतरिक भावनांचा संदर्भ व मतितार्थ जाणून घेऊन स्वतःसोबत अधिकाधिक संगनमताने व मैत्रभावाने वागायला शिकूया.
पाया:
आपल्या स्वतःच्या सर्व प्रकारच्या भावभावना मोकळेपणाने व्यक्त करण्याची, समजावण्याची व समजून घेण्याची क्षमता हा आत्मविश्वासाचा पाया आहे, हे समजून घ्यायला शिकूया.
छान:
आपल्याला स्वतःलाच जर स्वतःबद्दल आणि स्वतःच्या गोष्टींबद्दल छान छान वाटत असेल तरच आपण आपल्या समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर मिळवू शकतो, हे समजून घ्यायला शिकूया.
शब्द:
आपल्या डिग्रीमुळे, पदामुळे व उपाधीमुळे आपल्या साध्या व सहज शब्दांना वजन प्राप्त होत असते म्हणून आपण आपले शब्द काळजीपूर्वक मोजूनमापून वापरायला शिकूया.