ज्या गोष्टींबद्दल आपल्याला मनापासून वाईट वाटते व आपण दुखावले जातो, आणि ज्या आपण बदलू शकत नाही, त्या गोष्टींबद्दलचे आपले दृष्टिकोन दुरुस्त करून घेऊया.
योग्यता:
आपली योग्यता सिद्ध करण्याचा उत्तम मापदंड आपण इतरांना दिलेली समर्पक व अचूक उत्तरे नसून आपण स्वत:ला विचारलेले यथार्थ व सहेतुक प्रश्न असतात, हे समजून घ्यायला शिकूया.
माहीत:
जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाबद्दल खूप सारे माहीत असते तेंव्हाच, त्याविषयी बरेच काही आपल्याला माहीत नाही, हेही माहीत होऊ शकते, हे समजून घ्यायला शिकूया.
ओझी:
इतरांच्या डोक्यावरील ओझी आपण वाटू किंवा खाली उतरू शकतो, डोक्यातील ओझी मात्र ज्याची त्यालाच वाटावी किंवा उतरून खाली ठेवावी लागतील, हे समजून घ्यायला शिकूया.
ओझी:
आपल्या डोक्यावरील भावनिक ओझी आपण कळतनकळत अतिशय मानसिक जवळीक असणाऱ्या इतरांच्या डोक्यावर लादत असतो आणि त्यांची ओझीही स्वतःवर लादून घेत असतो, हे समजून घ्यायला शिकूया.
परिक्रमा:
आपले मन भूतकाळ व भविष्यकाळ यांची परिक्रमा करूनच वर्तमानकाळात येते, म्हणून या परिक्रमेचे दोन्ही मार्ग सुकर, सुपर व सकारात्मक बनवून ठेवायला शिकूया.
गोंधळ:
आपल्या मनात विचारांचा प्रचंड गोंधळ उडाला असेल तर आपण स्वतःला विचारलेला मोठा व अवघड प्रश्न फोड करून छोटा व साधासोपा करून घेण्याचा प्रयत्न करायला शिकूया.
भाग:
आपल्या मनात चटकन आलेले पहिले उत्तर हे आपल्या अंतर्मनाचा भाग असते, तर नंतर येणारी उत्तरे, समर्थने व दाखले हे बाह्यजगाचे भाग असतात, हे समजून घ्यायला शिकूया.
भावार्थ:
आपल्या मनात सतत तक्रारींची व दोषांची साखळीच तयार होत असेल तर आपण आपल्या मनात असणाऱ्या ध्येयांचे, हेतूंचे व अनुभवांचे भावार्थ हळुवारपणे बदलून घ्यायला शिकूयात.
आधार:
आपण भावनिक वादळात असताना कोणाचाही भावनिक आधार घेण्यातील मुख्य अडचण म्हणजे योग्य की अयोग्य, चूक की बरोबर, पटण्यासारखे आहे की नाही? हे शोधत बसणे, हे समजून घ्यायला शिकूया.