कळतंय पण वळत नाही:
हा प्रत्येकाचा अनुभव असावा. आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या क्षणी आपण हे वाक्य म्हणतोच. हे बरोबर इतरांना लागू होते आहे, असं तर आपल्याला वाटतंच व आपण समोरच्याला तसे सांगतो देखील. पण कधी आपल्या अंतर्मनात डोकावून पाहिल्यावर, आपल्यालाही पटतं की हे आपल्यालाही लागू पडतंय. आपणही कधी कधी असं काही वागतो, असं काही बोलतो, असं काही करतो, असं काही हावभाव करतो की जे आपल्याला कधीच करायचं नसतं. याबद्दल आपल्याला चुकल्यासारखं वाटतं, शरम व लाज वाटते, अपराधभाव वाटतो.
ही मला वाटतं प्रत्येकाची अडचण आहे. कल्पना करा एखाद्याने तुम्हाला खालील प्रश्न विचारले: अमुक एका प्रसंगांमध्ये तुम्ही कसे वागाल? एखाद्या अडचणीमध्ये असल्यास तुम्ही काय कराल? एखाद्याने तुम्हाला आरे केल्यास तुम्ही काय बोलाल? या प्रश्नांची कल्पनांमध्ये आपण जशी उत्तरे देऊ, तसेच वागू याची शक्यता किती असावी?
ही शक्यता शून्यापासून ते शंभर पर्यंत कितीही असू शकते. कदाचित आपल्याला विचारलेल्या प्रसंगांना आपण वारंवार तोंड दिलं असेल, पण वरील प्रसंग आपण कधीही तोंड न दिलेले सुद्धा असतील. आपल्या प्रतिक्रिया आपल्या नकळत आपल्याला तोंडावर अथवा तोंडघशी पाडतात. अशावेळी आपण म्हणतो “कळतंय पण वळत नाही काय करू”? ही आपली भविष्यात येणाऱ्या आपल्या यशाची पहिली पायरी असू शकते.
आपल्याला जर यशाकडे जावं असं वाटत असेल तर आपली वरील अवस्था तयार करणारे प्रसंग, व्यक्ती, अनुभव, आठवणी आणि दैनंदिन शब्द व वाक्यं यांची एक यादी तयार करून ठेवावी. वरील प्रत्येक प्रसंगात आपल्याला त्या प्रसंगाबद्दल नेमकं कशाचं वाईट वाटतं? किंवा आपल्याला नेमकं काय चुकतंय असं वाटतं? किंवा कुठला शब्द कुठलं वाक्य आपल्याला खटकतं? हेही शोधा. असं पहा एखाद्या प्रसंगाला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या अडचणीला, एखाद्या शब्दाला आपण पूर्वीपासून तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया देत आलेलो असतो.
या प्रतिक्रिया आपलं भावनिक मन वारंवार सराव करून शिकलेलं असतं. आता आपल्या या मनाला नवीन व सुधारित प्रतिक्रियांनी जर सज्ज करायचं असेल तर आपल्याला नवीन प्रतिक्रियांचा जितका जास्त सराव करायला मिळेल तितका केला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला अशा व्यक्तींची, प्रसंगांची, अडचणींची व शब्द वाक्यांची गरज पडेल जे तुम्हाला हा सराव देतील. या गोष्टी नेहमी अशा असतील ज्या तुम्ही मनापासून निवडणार नाही व त्या तुम्हाला आवडणार नाहीत. परंतु याच गोष्टी तुम्हाला तुमची सुधारित आवृत्ती बनवण्यासाठी गरजेच्या असतील. म्हणूनच आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अडचण तयार करणाऱ्या प्रसंगांना, ताण तयार करणाऱ्या व्यक्तींना व संघर्ष तयार करणाऱ्या शब्दांना व वाक्यांना कृतार्थ भावनेने धन्यवाद दिला पाहिजे.
मी काय करतोय, कसा बोलतोय, कसा वागतोय आणि एका आदर्श व्यक्तीने काय करावे, कसे बोलावे, कसे वागावे यातील अंतर भरून काढणे गरजेचे आहे. यासाठी आपण काय कृती करू शकतो व काय योजना करू शकतो याचा विचार हा सदैव आपल्यासमोर असावा. या कृती योजनेचे दररोज वाचन, मनन, चिंतन, लेखन व आचरण या गोष्टी झाले तर आपली उत्तम सुधारित आवृत्ती आपली वाट पाहत असेल. एक दिवस ती वृत्ती आपल्याला नक्कीच भेटेल.
त्यामुळे यानंतर कधीही आपल्या मनात असा विचार आला कि “यार कळतय पण वळत नाय” तर आनंदित व्हा. कारण तुमची सुधारित आवृत्ती आणण्याची हीच ती वेळ असेल. स्वतःची सुधारित आवृत्ती तुमच्या मनात अगोदरच तयार असेल ती शोधा आणि त्यानुसार प्रवासाला सुरुवात करा. प्रवासासाठी स्वतःला शुभेच्छा द्यायला विसरू नका. तुम्हाला प्रवासासाठी शुभेच्छा!
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ञ
बारामती