मनाची रेसिपी:

मनाची रेसिपी:
आपल्या मनासाठी खाद्य म्हणजे मनातले विचार. मनाचे आरोग्य हे मनानेच मनाला समजून घेऊन व समजावून सांगून निवड केलेल्या विचारांमध्ये आहे. निवड केलेले विचार मनाला निर्भय, सशक्त, स्वतंत्र व सृजनशील बनवत आहेत याची मन मनाला विचारून खात्री करून घेते. ही खात्री करतांना मनाला काय हवं आहे? व काय नको आहे? हे आपलंच मन विचारते. म्हणून आपल्या मनाला काय हवं आहे? आणि काय नको आहे? हे आपल्या मनाला अगोदर माहीत पाहिजे. मनाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपलंच मन देतं. ते मन नेमकी काय उत्तरं देत आहे? व का? यावर मनाने लक्ष ठेवतं. यातूनच मनाला मनाचे मनाशी व मनासंबंधी असलेले परस्पर संबंध व हेतू लक्षात येतात. आलेल्या उत्तरांवर प्रतिप्रश्न व प्रत्युत्तर करून मन स्वतःचं संपूर्ण समाधान करून घेतं. त्यामुळे निवडलेल्या उत्तरासाठी व विचारासाठी आपलंच मन स्वतःला जबाबदार मानतं. घडलेल्या प्रसंगातून व मिळालेल्या परिणामातून मन काहीतरी बोध व अर्थ घेऊनच पुढील प्रवास करतं.
मनाची कार्यपद्धती व कार्यप्रणाली आपण मनाच्या मदतीने शोधू शकतो. मनाबद्ल माहीत करून घेण्यासाठी आपल्या मनाच्या सहाय्याने आपण आपल्या मनाचं प्रत्येक क्षणी निरीक्षण व अवलोकन करतो. आपल्या मनाचं त्या क्षणी निरीक्षण व अवलोकन करून मगच मन परवडेल असा विचार निवडेल. आपल्याला जे विचार व जी तत्वं काहीही झालं तरी पकडून ठेवायची असतात, ती आपल्या मनात मनाने अगोदरच कोरलेली असतात. हे कोरीव काम आपल्या मनाने भावना व इंद्रिये यांच्या मदतीने याअगोदरच केलेले असते. हे कोरीव काम कायमचे कधीच नसते, ते हरक्षणी बदलत असते, अगदी तुमच्या मनाने ते बदलू नये असे ठरवले तरी. ते बदलण्याची क्षमता मनामध्ये नेहमीच असते. ते आहे तसे ठेवण्यासाठी मनाला क्षणोक्षणी प्रयत्न करावे लागतात.
आपल्या भावना व इंद्रियांचे काम मनाला मनाची कामे मनासारखी पूर्ण करण्यात मदत करणे हे असते. इंद्रिये, भावना व मन या सर्व यंत्रणांमधील कोणतीही एक यंत्रणा सर्वोत्तम नाही. सर्व यंत्रणा एकत्रितपणे काम करतात तेव्हा बरे परिणाम मिळतात. मनाने केलेल्या सर्वोत्तम निवडी बरोबर असण्याची शक्यता किती असते? या प्रश्नाचे उत्तर आहे दहा टक्के. जगातील सर्वांत मोठ्या व यशस्वी लोकांनी घेतलेले सर्वोत्कृष्ट निर्णय हे बरोबर असण्याची शक्यता आहे दहा टक्के. कारण माहिती व तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे, पुढच्या क्षणी त्याच प्रश्नाला पूर्णपणे नवीन उत्तर आलेले असते. आपल्या अशिक्षित मनाची अवस्था याहून कमी, पण सतत नवनवीन शिकणं व सराव करणं यामुळे मन दहा टक्के ही पातळी गाठू शकते. त्यामुळे आपल्या मनाला याची माहिती व सवय झाल्यास मन पायरी पायरीने विकसित होत जाईल.
किमान दहा वेगवेगळ्या विचारांवर विचार व मनन चिंतन केल्यानंतर आपल्याला एक सर्वोत्तम विचार मिळेल. या एका विचारावर काम करण्यासाठी मनाने किमान दहा पद्धती शोधल्यास एक सर्वोत्तम पद्धत सापडेल. या सर्वोत्तम पद्धतीने भावना व इंद्रियांचे सहकार्य घेऊन काम केल्यास मनाला सर्वोत्तम परिणाम मिळू शकतात. ही सर्वोत्तम पद्धत किंवा प्रणाली वापरून काळाच्या ओघात यशस्वी होण्याची व अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता आहे, दहा टक्के.
आपल्या मनामध्ये मनाने चूक करणे, चूकणे, अपयश येणे, माघार घेणे व न जमणे या गोष्टींना योग्य व मानाचे स्थान द्यावे. त्याबरोबर चुक मान्य करणे, प्रयत्न करणे, नवीन शिकणे, बोध घेणे, धडा घेणे, सातत्याने काम करणे, समजून घेणे व समजावणे या गोष्टींना मनाने मान द्यावा. भावना व इंद्रिये मनात गोंधळ घालायचे काम करतात. परंतु मनाने त्यांना मोठ्या मनाने समजून घेऊन त्यांचेच आभार व धन्यवाद मानल्यास तेसुध्दा मनाच्या हो ला हो करतात. भावनाविवश व इंद्रियवश होत असल्यास मनाने काही निर्णय व निवड करण्याचे काम पुढे ढकलावे. भावना या मीठ व मसाल्यासारख्या असतात. योग्य प्रमाणात व योग्य ठिकाणी मनाला चविष्ट विचारांची मेजवानी देतात. मात्र अती प्रमाणात व अयोग्य ठिकाणी मनाला बेचव विचारांनी नकोसं करून टाकतात.
मनाने, मनातच व मनासाठी इंद्रिये व भावनांचा मीठ मसाला घालून तयार केलेला एक रुचकर पदार्थ म्हणजे मौल्यवान विचार. सुखी, समाधानी व आनंदी जीवनाची मनाने मनापासून केलेली हीच ती रेसिपी.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती

Leave a comment