क्षणभंगुर:
जीवन हे क्षणभंगुर आहे. आपण जीवन क्षणाक्षणाने जगत असतो. अर्थात सर्व क्षणांची गोळाबेरीज म्हणजे आपले जीवन होय. यातील प्रत्येक क्षण ज्या पद्धतीने व द्रुष्टीने आपण जगू त्यावरून आपल्या जीवनाची दिशा व दशा ठरणार असते.
आपण आपले जीवन हे ऑटो मोडवर अर्थात स्वयंचलित पद्धतीने जगत असतो. म्हणजे आपण जगण्यासाठी फार काही विशेष करत नाही, ही प्रक्रिया आपोआपच चालू असते. आपले अंतर्मन आपल्या जीवनातील सर्व प्रक्रिया आपल्यासाठी आपल्या नकळत करून टाकते. आपल्या अंतर्मनामध्ये जे जे आहे ते आपण जीवनात क्षणाक्षणाला प्रदर्शित करत असतो.
घडून गेलेले क्षण क्षणात भूतकाळात जमा होतात. येऊ घातलेले क्षण भविष्यकाळात असतात. या दोघांच्या मध्ये “आत्ता आणि इथे” म्हणजे वर्तमानकाळात चालू असणारे क्षण. चालू असणारा क्षण चालतच असतो, थांबत नाही. तो क्षणातच भूतकाळात बदलणार असतो. आपला अधिकार आणि हक्क फक्त वर्तमान क्षणावर असतो. आपल्या आयुष्याची बेरीज म्हणजे फक्त वर्तमान क्षणांची बेरीज. स्थळ, काळ, वेळ, प्रसंग, व्यक्ती व परिस्थिती या सर्वांचा विचार करता प्रत्येक क्षण खास व स्वतंत्र असतो. जर आपण या क्षणात सावधान व जाणीवेत नसू तर काही कळायच्या आतच तो क्षण भूतकाळात गेला असेल. अर्थात प्रत्येक क्षण क्षणभंगुर आहे.
आपण एकदा घडून गेलेले क्षण पुनपुन्हा जगत असतो. हे करण्यासाठी आपल्या मनात कल्पनाशक्ती नावाची ताकद असते. तोच जुना क्षण आता जसाच्या तसा जगून आपण आधीच जगलेलं जीवन पुन्हा जगत असतो. आनंदाचे व आवडीचे क्षण तेच व तसेच पुन्हा उभे करतो. याचा अर्थ तोच एक क्षण आपण हजारो वेळा जगतो. हजारो वेगवेगळे क्षण जरी जगलो तरीही तो भूतकाळातील एकच क्षण असतो. त्या अर्थाने हा प्रत्येक क्षण क्षणभंगुर आहे. भूतकाळातील हवेहवेसे क्षण वर्तमान क्षणांना जाणण्या अगोदरच भूतकाळ जाहीर करतात. भूतकाळातील या क्षणांचा आपल्या मनावर घट्ट पगडा असतो. तो क्षण प्रत्येक वेळी तसाच्या तसा यावा असा आपला हट्ट असतो. याला आपण अनुभव हे सुंदर नाव देतो. प्रत्येक क्षणाला नवीन व कोराकरकरीत जगायचा असेल तर हे टाळायला हवे. समोर असणाऱ्या प्रत्येक क्षणाला आपल्याला भूतकाळरहित व आवडनिवडरहित जगायला शिकले पाहिजे.
आपल्याला प्रत्येक क्षणी स्वतःलाच का? व काय? प्रश्न करणे गरजेचे आहे. आपल्याकडे जर एक हेतू, ध्येय किंवा उद्दिष्ट असेल तर आपण प्रत्येक क्षण जगताना यांचा नेहमीच परामर्श घेऊ. त्यांच्या भोवती आपला तो क्षण गुंफून टाकू. गुंफलेला तो क्षण आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट असेल. तो भूतकाळात गेल्यावरही आपल्यासाठी सर्वोत्कृष्टच असेल. असा भूतकाळ आपल्याला नवीन क्षण नवीन पद्धतीने जगण्याची ऊर्जा देईल. तेच जुने धागे व तेच जुने टाके क्षणाला नाविन्य देणार नाहीत. आपण प्रयत्न केला तरी तेच तेच परत परत आपल्या सर्व क्षणांना व्यापून टाकणार. म्हणून आपल्याला जर प्रत्येक क्षणाचा सर्वोत्कृष्ट आनंद घ्यायचा असेल व उत्तम उपयोग करायचा असेल तर आपल्यासमोर हरेक क्षणासाठी एक ध्येय असेल. हे ध्येय काही दिवसासाठी, वर्षांसाठी किंवा आयुष्यभरासाठी असेल. ते अगोदरच आपण ठरविलेले हवे. प्रत्येक क्षणी स्मरण होईल इतके मनावर ठसवीलेले हवे.
प्रत्येक क्षणाला आपल्या जीवनात आपण नवीन शिकण्याचं व होण्याचं ध्येय हा सर्वोत्तम मार्ग आहे. आपले त्या त्या क्षणांचे शिक्षण आपल्या आयुष्यात बेरजा करत जाते. आत्ताच्या क्षणात आपल्या उद्याचे बी आहे. हे बी दर्जेदार व विकसित असेल तर आपला उद्या सर्वोत्तम असेल. क्षणांचं मोल हेच आपल्या जीवनाचं मोल. जीवन हे या आत्ताच्या क्षणात आहे, क्षणभंगुर आहे.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती