गुप्त:

गुप्त:
आपल्या विचारांचा अंत, आपल्या मनाचा ठाव, आपल्या विचारांचा तळ दुसऱ्या व्यक्तीला कळू नये यासाठी बऱ्याच वेळा आपण प्रयत्न करतो. या नादात आपण स्वतःच आपल्या विचारांपासून दूर जातो आणि आपलेच विचार आपल्याला गुप्त व अनोळखी होऊन जातात. परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपले विचार कधीही गुप्त राहू शकत नाहीत. अगदी जरी शब्दरूपाने व्यक्त नाही झाले तरी ते आपल्या कृतीतून व्यक्त होतात. अगदी आपण शब्द आणि कृती समाजासमोर व लोकांसमोर चांगल्या प्रकारे चालू ठेवल्या तरी आपल्या सवयी मधून आपले विचार डोकावत असतात. जरी आपण लोकांसमोर आपल्या सवयी चांगल्या प्रकारे ठेवण्याचा खोटा खोटा प्रयत्न केला तरी आपल्या चारित्र्या मधून आणि आपल्या मूल्यांमधून दिसत असतात. अगदी आपण आपलं चारित्र्य आणि आपलं मूल्य व शील जगासमोर चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या विधिलिखितामध्ये आपले विचार नक्कीच अधोरेखित होतात. आपले विचार कधीही गुप्त नसतात. आपल्या विचारांना जाणणे व शोधणे आणि त्या विचारांना आपल्याला जसं जीवन हवं आहे त्या जीवनाशी जाणीवपूर्वक सुसंगत करणं हे आपल्या जीवनाचं एक प्रमुख ध्येय असलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या चांगल्या-वाईट परिस्थितीचे आणि परिणामांचे मूळ चांगल्या चांगल्या वाईट विचारांमध्ये आहे. म्हणून परिस्थिती बदलायची असेल, परिणाम बदलायचे असतील तर आपल्याला कारणांवर म्हणजे विचारांवर नक्कीच विचार करावा लागेल. आजच सुरुवात करू या. आपले विचार स्वतःपासून गुप्त ठेवणं टाळू या, ते जाणून घेऊया.

Leave a comment