रागावले असाल तर:

रागावले असाल तर:
रस्त्यावरून येताजाता बुंगाट सुटलेल्या गाड्या पहायला मिळतात. असं वाटतं की हे इच्छितस्थळी चाललेले नाहीत, तर आपला राग व्यक्त करत आहेत. हँडल पाठीमागे किंवा स्टेरिंग पाठीमागे बसलेले शरीर महत्त्वाचे नसून ते शरीर चालविणारे मन व त्या मनाची मनस्थिती महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळा ताण आल्यावर, बेचैन झाल्यावर, राग आल्यावर, चिडचिड झाल्यावर “आम्ही लॉंग ड्राईव्हला जातो” असे अभिमानाने सांगणारे लोक आम्ही नेहमी पाहतो. इच्छित स्थळी चालला असाल तर नक्कीच तुम्ही सुरक्षित पणे वाहन चालवणार. मात्र रागावला, चिडला असाल आणि राग कमी करण्यासाठी किंवा मूड व्यवस्थित होण्यासाठी ड्रायव्हिंग करत असाल तर, सावधान! रस्ता, रस्त्यावरचे ड्रायव्हिंग या गोष्टी ताणतणाव नक्कीच कमी करू शकत नाहीत. परंतु मनस्थितीतील हेलकावे, विचारांच्या लहरी, विचलित लक्ष व नजर यामधून एक्सीडेंट चे प्रमाण मात्र नक्कीच वाढेल. रस्त्यावरील एक्सीडेंटच्या कारणांमध्ये दारू नंतर विचलित मनस्थितीचाच दुसरा नंबर लागतो. अर्थात दारू मनस्थिती विचारीत करते आणि मनस्थिती विचलित झाल्यामुळेच लोक दारू पितात म्हणूनच विचलित मनस्थिती हे हे एक्सीडेंट चे प्रथम कारण आहे असं म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. दुसऱ्याच्या जिवाला धोका उत्पन्न होतो जो तुमच्या ड्रायव्हिंगमुळे नसून मनस्थितीमुळे असतो, हे लक्षात घ्या. म्हणून ड्रायव्हिंग करताना स्वतःची मनस्थिती शांत आणि व्यवस्थित तर ठेवाच परंतु दुसऱ्याची मनस्थिती विचलित असू शकते आणि त्याच्याकडून चूक होऊ शकते जी आपल्या जीवावर उठू शकते हे सुद्धा लक्षात असू द्यात.
राग, तणाव, विफलता, नैराश्य, बेचैनी इ. निवळण्यासाठी ड्रायव्हिंग ऐवजी चालायला जा. लांबच लांब रस्त्याने चालताना तुमचा राग विरघळून जाईल. निसर्गाच्या व झाडांच्या सानिध्यात तुमचे मन प्रफुल्लित होऊन जाईल. शरीराला आलेला घाम, वाढलेला श्वास व ह्रुदयाची वाढलेली धडधड तुमच्या शरीरात तयार झालेल्या ऊर्जेला चांगल्या पद्धतीने बाहेर फेकेल. रागातून रागाकडे नेणाऱ्या विचार चक्रातून बाहेर येऊन तुम्ही निसर्ग चक्राशी एकमत व्हाल. तुमचे मन शांत, स्पष्ट व आशावादी होईल जेणेकरून ताणावर तुम्ही योग्य प्रकारे विचार करू शकाल.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती

Leave a comment