टाइमपास:

टाइमपास:
टाइमपास ही संकल्पना आज-काल फारच प्रसिद्ध आहे. कॉलेजात काय केलं? सुट्टीत घरी काय केलं? थेटर मध्ये गेल्यावर काय केलं? कामावर गेल्यावर काय केलं? मित्रांना भेटल्यावर काय केलं? अशा सर्व प्रश्नांचे साचेबद्ध उत्तर म्हणजे टाईमपास. टाईमपास केला म्हणजे वेळ काटला, वेळ कटवला किंवा वेळेला चकवा दिला, असं त्यांना म्हणायचं असतं. पण प्रत्यक्ष मात्र वेळेला कोणी काटू शकत नाही कटवू शकत नाही आणि चकवाही देऊ शकत नाही. अशा प्रकारच्या खूप साऱ्या वेळांची गोळाबेरीज म्हणजे काळ ज्याला आपण कोणीही चकवा देऊ शकत नाही.
आलेल्या प्रत्येक वेळेला, वेळ देऊन आपण न्याय दिला तर आपला काळ आपल्याला साथ देणार, ज्या काळाला आपण सुकाळ किंवा चांगला काळ म्हणू. वेळेला आपण योग्य तो न्याय न दिल्यास, अर्थात टाईमपास केल्यास काळ आपल्याला न्याय देऊ शकत नाही आणि आपली साथही देऊ शकत नाही, अशा काळाला आपण वाईट काळ किंवा कर्दनकाळ म्हणू. वेळेला, वेळ न दिल्याचा पश्चाताप करायला लावणारी व येणाऱ्या वेळेला, उचीत वेळ देण्याचा निश्चय करायला लावणारा काळ म्हणजे संधीकाळ. संधीकाळाचा वापरही आपण लेखाजोखा, पाठपुरावा व सिंहावलोकन यांसाठी वेळ देऊन करायला हवा. आपण आपल्या वेळेचं काय करतो यावरून आपला काळ ठरतो. हा काळ मग ठरवतो की आपलं काय करायचं. म्हणजे अगोदर वेळ येते, या वेळेला आपण कशा प्रकारे वेळ देतो ते महत्त्वाचे आहे. वेळ मारून नेणाऱ्या व वेळेला चकवा देणाऱ्या लोकांचा काळ हा त्यांच्या मनासारखा नसतो. म्हणून म्हणतात,”वेळ आली होती पण काळ आला नव्हता”, असं म्हणतात. अर्थात वेळ अगोदर येते, वेळेला दिलेल्या वेळेनुसार काळ येतो.
“आत्ता नको, पुढच्या वेळेला बघु,” असे परतपरत म्हणणार्‍या लोकांना काळ साथ देत नाही. “मागच्या वेळी चुका झाल्या त्या झाल्या, आता पुढे अशी वेळ येऊ देणार नाही, योग्य वेळी योग्य गोष्टींना योग्य वेळ देऊ,” असा संकल्प करणाऱ्या लोकांना काळ साथ देतो. म्हणून पुढच्या वेळेची वाट पाहत बसू नका. आत्ताच्या वेळीच कसे सर्वकाही उत्तमोत्तम करता येईल आणि हीच वेळ कशी आपल्यासाठी वापरून घेता येईल ते ठरवा.
काळ आपल्यासाठी थांबत नाही व आपल्या आवाक्यात येतही नाही. वेळ मात्र आपल्या हातात असते, ती आपल्या समोर असते व आपल्या आवाक्यातसुद्धा असते. आपल्याला वाटतं आपण टाईमपास करत आहोत, मजेत वेळ घालवत आहोत, पण तसं नाही. वेळ, प्रत्येक वेळी आपलं मूल्यांकन करत असते. हळूहळू या वेळांचं रूपांतर काळामध्ये होते. हा काळ आपल्याला आपल्या वेळांच्या मूल्यांकनानुसार फळ देतो. मग बऱ्याच वेळा आपण उद्वेगाने म्हणतो “अरेरे! त्यावेळी केलं असतं तर बरं झालं असतं,” किंवा “त्या वेळी हे केलं नसतं तर बरं झालं असतं,”. म्हणून वेळच्या वेळीच, वेळेचे महत्त्व ओळखा. वेळेसाठी, वेळ काढणारा माणूस काळावर विजय मिळवतो. वेळेला महत्त्व न देणाऱ्या माणसावर काळ हावी होतो, खायला उठतो. गेलेली वेळ परत येत नाही, पण काळ, चांगला किंवा वाईट मात्र कायम आपल्या सोबत राहतो, स्मृतीत राहातो. तरूणांसमोर भरपूर वेळ असतो, त्या वेळेचा योग्य वेळी व योग्य वापर करायला हवा, म्हणजे उतारवयात काळ आपला दोस्त होऊन जाईल. जेव्हा आणि जे आपण करायला हवं ते त्यात्यावेळेला आपण करायला हवं. ज्यावेळी आपण जी गोष्ट करायला हवी होती, ती योग्य रित्या पूर्ण केली, असा काळ आपण कधीच विसरू शकत नाही. म्हणून वेळेला योग्य न्याय द्या.
कॉलेजात असाल तो वेळ कॉलेजसाठी व शिकण्यासाठीच द्या. घरी असाल तो वेळ घरातील नातीगोती आणि घरातील कामांसाठीच द्या. कामावर असाल तो वेळ कामासाठीच द्या. मित्रांमध्ये असाल तो वेळ मित्रांसाठीच व मनोरंजनामध्ये असाल तो वेळ मनोरंजनासाठीच द्या. पत्नीसोबत मुलांसोबत असाल तो वेळ पत्नीसाठी व मुलांसाठीच द्या. हे सर्व केल्यावर येणारा काळ तुमच्यासमोर सुख, समाधान, शांती याचा मखमली गालीचा तुमच्या वाटेवर अंथरूण, यशाचा पुष्पगुच्छ व सम्रुद्धीचा हार हातात घेऊन तुमच्या स्वागतासाठी सदैव तयार असेल.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती

Leave a comment