शरीर प्रतिमा:

शरीर प्रतिमा:
शरीर प्रतिमा म्हणजे एखाद्या व्यक्तीचे शारीरिक गुणधर्म, शरीररचना व बाह्य अवयव यासंबंधीची व्यक्तीच्या मनातील प्रतिमा. शरीररचना व अवयव ठेवण यासंबंधित धारणांमुळे उद्भवलेले विचार आणि भावना याबद्दलची समज म्हणजे शरीर प्रतिमा.
आपण स्वतःला आरशात पाहील्यावर स्वतःबद्दल मनात आलेले विचार, निघालेले उद्गार, सुचलेले रूपक, कल्पिलेली प्रतिमा व वाटणारी भावना म्हणजे शरीर भावना. आपण आपल्या शरीराविषयीच्या भावना आपल्या आरशातील प्रतिबिंबावरून ठरवतो. हे आरशातील प्रतिबिंब आपल्या मनातील शरीर प्रतिमेशी कीती प्रमाणात जुळते यावर आपले आपल्या शरीराविषयीचे समाधान ठरते. आपण आपल्या आरशासमोर खूपच वेळ घालवत असेल तर आपल्या मनातील या शरीर प्रतिमा व भावना याबाबत नक्कीच काहीतरी गडबड आहे.
या शरीर प्रतिमेबाबत आपण आनंदी व समाधानी असाल तर ठीक परंतु वय, ऋतू, इजा व आजार यांबरोबर होणारे शारीरिक बदल तुमच्यासाठी मानसिक आघात होऊ शकतात. गळा, चेहरा, ओठ, केस, पोट, कंबर इत्यादी अवयवांमधील हे अपरिहार्य बदल सोबत असमाधान व बेचैनी घेऊन येतात. त्याचबरोबर आपल्या प्रतिमेबाबत जर आपण नाराज व असमाधानी असाल तर तुमचा आत्मविश्वास व आत्मसन्मान कमजोर होईल. या प्रतिमा दुरुस्त करणे म्हणजे आत्मविश्वास व आत्मसन्मान परत मिळवणे असा एकांगी विचार आपण करू. आपला वेळ, पैसे, साधने व कौशल्ये आपण या प्रतिमा दुरूस्त करण्यास समर्पित करू शकाल. शरीर प्रतिमा दुरूस्ती हेच आपल्या जीवनाचे ऐकमेव ध्येय होऊ शकते.
आपले नातेवाईक, मित्रमंडळी, समाज, प्रसारमाध्यमे व सामाजिक माध्यमे यांचाही आपली शरीर प्रतिमा ठरवण्यात मोठा वाटा आहे. काही वेळा हा प्रभाव इतका तीव्र असतो की शरीर प्रतिमेसमोर ईतर सर्व गुणवैशिष्ट्ये व जीवनमूल्ये शून्य ठरवली जातात. त्यामुळे गोरं, उंच, सडपातळ, नाकी डोळी निटस असणं हेच सद्गुण ठरवण्याची चूक होऊ शकते. अशा प्रव्रुतीमळे या सर्व गोष्टी जशा आहेत तशा टिकवून ठेवण्याची किंवा त्यात सुधारणा करण्याची चढाओढ सुरू होते. त्यामुळे सौंदर्य प्रसाधने, फेअरनेस क्रिम, मुरुमे, डाग व सुरकुत्या कमी करणारी औषधे व सप्लिमेंट या सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांची खूप चलती आहे.
आपण आपले शरीर, अंग, रंग, ढंग व अवयव जसे आहेत असे आपण समजतो ती आपल्या शरीराची समजलेली प्रतिमा असते. आपण प्रत्यक्ष कसे दिसतो व आपली शरीर रचना प्रत्यक्ष कशी आहे, याचा या आपण समजलेल्या प्रतिमेशी ताळमेळ असणे महत्त्वाचे आहे. जर या प्रतिमांमध्ये कसलाही ताळमेळ नसेल तर त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या विभिन्न प्रतिमा आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत. आपण सर्व प्रकारच्या पँथी व डॉक्टर धुडाळतो पण कोणीही आपल्याला समाधान देऊ शकत नाही. आपण रागवतो व चिडतो, औषध कंपनीला व डॉक्टर मंडळींना नावे ठेवतो. कोणी आपल्याला मनोविकार तज्ञांचा सल्ला घेण्यास सांगितल्यावर आपण आपल्याला मानसिक अस्वास्थ्य असल्याचे नाकारतो. आपण समजलेली स्वत:ची प्रतिमा हीच आपण खरी असलेली प्रतिमा मानायला लागतो. आपले वजन कीतीही कमी असले तरीही आपण स्वत: ला जास्त वजन असलेले समजू शकतो. आपले शरीर शास्त्रानुसार सुरुप व सुडौल असते परंतु आपली समजलेली प्रतिमा कुरुप व बेडौल असू शकते. एखादी व्यक्ती त्याचे सामान्य नाक, गाल, हनुवटी, डोळे, कपाळ व चेहरा विद्रुप व कुरुप समजू शकते. एखादी सडपातळ व्यक्ती स्वतःला जाड समजून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत राहते. एखादी व्यक्ती आपला सामान्य सावळा रंग काळा समजून, उजळपणा वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या उपायांमध्ये दंग होऊन जातो. यातून असंख्य प्रकारचे त्रास सुरू होतात जे आपले मानसिक स्वास्थ्य हिरावून घेतात.
आपल्या शरीराचा आकार, वजन आणि शरीराच्या वैयक्तिक भागांबद्दल आपल्या भावना म्हणजे आपली भावनात्मक प्रतिमा होय. ही प्रतिमा आपण आपल्या शरीराबद्दल किती प्रमाणात समाधानी किंवा असमाधानी आहोत हे स्पष्ट करते. आपल्या शरीराबद्दल समाधानी व संतुष्ट असलेल्या लोकांना जीवनात आनंद, सुख, सम्रुद्धी व यश मिळते. आपल्या वैयक्तिक अवयव व अंगांबद्दल, लिंगाचा आकार, जाडी व सरळपणा याबद्दल असंतुष्ट असणाऱ्या लोकांचे वैवाहीक व लैंगिक जीवन निराशाजनक होऊन जाते. सर्व ऐहिक सुखसम्रुद्धी व मनासारखा जोडीदार असूनही असे लोक शापित जीवन जगत असतात. अशा लोकांना शरीर, अवयव, अंग व लिंग प्रतिमा दुरूस्त करणारे लैंगिक शिक्षण हाच खरा व कायमस्वरूपी उपचार आहे. परंतु हे लोक क्रीम, मलमे, गोळ्या, इंजेक्शन व जडीबूटी यामध्येच आयुष्य खर्ची करतात. अशा वैयक्तिक व लैंगिक विषयांशी निगडीत उत्पादने, सेवा व उपकरणे बनविणाऱ्या लाखो कंपन्या आज प्रचंड नफा कमावतात. यावरून समाजात असणाऱ्या शरीर, अवयव, लिंग व गुप्तअंग प्रतिमांबद्दलच्या धारणा, विचार व द्रुष्टीकोन बदलाची गरज अधोरेखित होते.
आपण आपल्या शरीराबद्दल व बाहय अवयवांबद्दल ज्या प्रकारे विचार करतो ती म्हणजे आपली संज्ञानात्मक किंवा वैचारिक शरीर प्रतिमा होय. आपल्या शरीराच्या प्रतिमेचा परिणाम म्हणून आपले जे वागणे व वर्तणूक असते ती म्हणजे आपली वर्तनात्मक शरीर प्रतिमा होय.
किशोरवयीन मुलामुलींमध्ये शरीर प्रतिमा खूप महत्त्वाची बाब आहे. तरुणतरुणींचं अलीकडच्या काळात ह्याशिवाय पान हालत नाही. स्लिम, ट्रीम, कट्स, सिक्सपँक, फेअर, फिगर हे शब्द त्यांच्यासाठी परवलीचे बनलेले आहेत. मासिके, प्रसारमाध्यमे व जाहिराती हाच फंडा छुप्या पद्धतीने वापरतात व तरुण पिढीला आकर्षित करतात. शरीर प्रतिमेचा व अवयवांचा वापर ते त्यांची उत्पादने व सेवा विकण्यासाठी वापरतात.
सकारात्मक शरीर प्रतिमा व्यक्तीमध्ये सुरक्षितता, प्रेम, दया, करूणा, सहनशीलता व आत्मविश्वास निर्माण करते. नकारात्मक शरीर प्रतिमा लज्जा, कमतरता, अक्षमता व न्यूनगंड या भावना तयार करते. शरीर प्रतिमेबाबत नकारात्मक भावना प्रबळ असल्यास स्वतःला बदलण्याची इच्छा तीव्र होऊ शकते.
१० ते ३० वर्ष वयोगटातील मुलेमुली व स्त्रीपुरुष टेलिव्हिजन, चित्रपट आणि मासिकांमधील स्त्रीपुरुषांच्या रूपाचे अनुकरण करतात. माध्यमांद्वारे बनवलेल्या सौंदर्याच्या 90% मानदंडांचे मुलेमुली व स्त्रीपुरुष अनुपालन करतात. आदर्श शरीराच्या व वजनाच्या स्त्रियांची चित्रे व फोटो पाहिल्यानंतर, 95% स्त्रियांना त्यांच्या शरीराचा आकार जास्त व विद्रूप वाटतो.
पुरुषांनी अशा जाहिराती पाहिल्यानंतर, त्यांच्या शरीरातील चरबी व मांसपेशीबाबत ते असमाधानी असल्याचे दिसून आले. पुरुषांच्या शरीराच्या समाधानामध्ये शरीरातील चरबीपेक्षा स्नायूंचे महत्त्व जास्त महत्वाचे आहे. असे चरबी कमी व स्नायू जास्त असणारे सिक्स पँक शरीर मिळवण्यासाठी काही पुरुष वेगवेगळ्या प्रकारचे तात्पुरते उपाय करतात. परंतु या उपायांनी त्यांचे निरामय व निरोगी शरीराचे स्वप्न भंग पावते.
जेव्हा आपण आपल्या दृष्टीकोनातून आपले शरीर व अवयव याविषयी असमाधानी असतो, तेव्हा आपण स्वत: ला अलग समजू शकतो. आपल्याला आपल्या दिसणे, आकार, अवयव व अंगांबद्दल वाईट वाटते. म्हणून आपण आपले स्वतःचे शरीर, अंग व अवयव आणि त्याबद्दलच्या धारणा व विचार ओळखूया व तज्ञांच्या मदतीने निरोगी व निरामय शरीर प्रतिमा नव्याने स्थापित करूया. यामध्ये काही मदतीची गरज वाटल्यास आपल्याला मानसोपचारतज्ज्ञ नक्कीच मदत करतील.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती

Leave a comment