चौकशी की स्पष्टीकरण की स्वीकार:
“तू असा का करतोस?
तू असा का वागतोस?
तुला असं का वाटतं?
तू असं का चिडतोस?
तू असं काय रडतोय?
तू इतका का घाबरतोय?”
या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता व कौशल्य आपल्या लहान मुलांमध्ये नसते. बर्याच वेळा ‘हे का?’, प्रकारचे प्रश्न आपल्या मुलांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्या समस्यांमध्ये व अडचणींमध्ये अजून भर टाकतात. त्यांच्या मूळ समस्येला व अडचणीला समजून घेत असतानाच आता त्यांच्या भावनेचे व वागण्याचे त्यांना विश्लेषण आणि स्पष्टीकरण द्यावे लागते. हे अतिरिक्त काम करणे बऱ्याच वेळा आपल्या मुलांसाठी खूपच कठीण अवघड गोष्ट असते.
बर्याचदा आपल्या मुलांना हे माहीत नसते की त्यांना काय वाटत आहे? व ते तसे त्यांना का वाटत आहे?
जरी आपल्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या भावनांबद्दल, वागण्याबद्दल व वाटण्याबद्दल थोडेफार माहित असेल तरी ते सांगण्यास टाळाटाळ करतात. आपल्या मुलांना भीती वाटते कि आपल्या सारख्या प्रौढ व्यक्तींच्या आणि समाजातील मोठ्या व्यक्तींच्या दृष्टीने त्यांनी सांगितलेले कारण योग्य व समर्थनीय वाटणार नाही. आपल्या मुलांना अजूनही वाटते की त्यांनी सांगितलेले कारण चांगले व नैतिक वाटणार नाही.
“तू चिडू व ओरडू शकतोच कसा?
का असा वागूच कसा शकतोस?
असं बोलण्याची व वागण्याची तुझी हिम्मत कशी झाली?”
अशी गुन्हासद्रुष्य चौकशी करण्याऐवजी व स्पष्टीकरण मागण्याऐवजी
“मी पाहतोय की तुला काहीतरी दु:खी व नाराज करीत आहे.
तुला खूपच राग आलेला दिसतोय.
मला दिसतंय कि तुला मत्सर आणि द्वेष वाटत आहे.
मी पाहतोय की तुला कशाबद्दल तरी साशंक वाटत आहे”, अशी संवेदनशील विचारपूस केल्यास आपली मुले आपल्याशी मनमोकळा व स्वतःहून संवाद साधतील. स्पष्टीकरण मागण्याऐवजी, दबाव टाकण्याऐवजी व चौकशी करण्याऐवजी आपण काय जाणतो, आपल्याला काय वाटते, आपल्या भावभावना व आपलं वेगळं व्यक्तीमत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलणे आपल्याला सुद्धा सोपे व सुरक्षित वाटते, नाही का?