मनाचे आजार कमजोर मनाच्या लोकांना होतात, मानवी मन कमजोर आहे, फक्त मी याला अपवाद आहे, असा भ्रामक तर्क आपल्याला नवीन काही शिकणे व मौल्यवान उपचार घेणे यांपासून दूर ठेवतो.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
स्वयंचलित:
“स्वयंचलित वाहन” हे स्वतः चालत नाही, आपल्याला चालवावं लागतं, फक्त ते आपल्याकडून विशेष प्रयत्न न करता व लक्ष न देता चालवलं जातं. त्यासाठी आपल्याला वाहन चालवण्याचा खूप सराव करावा लागतो. सरावाने कोणतीही गोष्ट स्वयंचलित होऊन जाते, म्हणून जीवनात सराव महत्त्वाचा आहे. ज्या गोष्टींचा आपण वारंवार सराव करू, ती गोष्ट स्वयंचलित होऊन जाईल मग ते काहीही असो. ती गोष्ट आपल्यासाठी चांगली असो किंवा आपल्यासाठी वाईट असो, सरावाने ती स्वयंचलित होऊन जाते.
असं असेल तर मग ती सराव करण्याची प्रत्येक गोष्ट चांगलीच का असू नये? जर ती स्वयंचलित होणार आहे तर मग फक्त चांगल्या गोष्टींचंच वारंवार सराव व प्रॅक्टिस आपण का करू नये? जेणेकरून आपल्या या “स्वयंचलित प्रणालीचा” चांगला वापर करून, आपण आपल्या स्वतःकडून चांगला व अपेक्षित निकाल मिळवू शकतो. चांगलं विचार करणं, बोलणं आणि वागणं स्वयंचलित होऊन जावं, प्रयत्न न करता व लक्ष न देता, इतका या गोष्टींचा सराव करणे आवश्यक आहे. असे केल्यास चांगल्या, आनंदी, सुखी व समाधानी जीवनाच्या प्रवासाचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो, तोही अगदी स्वयंचलित पद्धतीने.
उगम:
आपल्या मान्यता, समजूती व गृहीतकं वारंवार सत्याच्या कसोटीवर घासून बघावेत, कारण आपल्या सर्व विचारांचे व वर्तनाचे ते उगम असतात.
मी:
व्याकरणातील कर्ता “मी” जेव्हा आपल्या जीवनात प्रवेश करतो तेव्हा “अहंकाराचे रूप” घेऊन ते किचकट करून टाकतो.
असणारा:
आपल्या “असण्याला” प्राधान्य असते, “करण्याला” नाही, म्हणून आपल्याला “ह्यूमन बीईंग” म्हणजे “असणारा” म्हणतात, “करणारा” नव्हे.
भांडण:
चांगले-वाईट, श्रेष्ठ-कनिष्ठ, बरोबर-चूक, प्रशंसनीय-निंदनीय, सोपे-कठीण, प्रेम-द्वेष, असावे-नसावे हे विरूद्धार्थी शब्दच, आपल्या अंतर्मनातील भांडणांचे मुख्य स्त्रोत आहेत.
सुख:
आपल्या परवानगीशिवाय व निमंत्रणाशिवाय कोणीही आपल्या अंत:करणात प्रवेश करू शकत नाही; ना सुख, ना दु:ख.
निवडून:
आनंद, सुख व समाधान या आपल्या आयुष्यात निवडण्याच्या गोष्टी आहेत; आपण त्यांनाच बहुमताने निवडून देऊया.
रस्ता:
नुसता जीवनाचा रस्ता माहिती असून भागत नाही, आपलं डोकं कसं चालतं हे आपल्याला अगोदर माहीत असावं लागतं.
निवड:
सुख किंवा दु:ख आपल्यावर अवलंबून आहे, म्हणून आपण हरघडी सुखाचीच निवड करूया.