जी गोष्ट अथवा वस्तू आपण डोक्यात किंवा डोक्यावर घेतो, ती आज ना उद्या आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकते.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
प्रेम:
प्रेमात माणूस कधीही पडत नाही, आणि जर पडलाच तर ते प्रेमासारखं दिसणारं दुसरंच काहीतरी असतं; प्रेम नसतं.
मित्र:
सर्वात जास्त गप्पा, चर्चा, वादविवाद, प्रश्नोत्तरे व विचार विनिमय आपण स्वतःशीच करतो म्हणून स्वतःचे चांगले मित्र असतो.
स्वयंसुधारणा:
स्वतःसोबत व स्वतःच्या विचारांसोबत बोर होणाऱ्या व्यक्तीला, स्वयंसुधारणा करण्याची ती एक संधी असते.
विकास:
आपल्या क्षमता, कौशल्ये, व्यक्तीमत्व, ज्ञान, मार्ग आणि कार्यपद्धती यामध्ये सुधारणेला व विकासाला सदासर्वकाळ वाव व संधी उपलब्ध असतेच.
नातेसंबंध:
उपहास करून, दोष देऊन, आरोप करून आणि कमीपणा दाखवून आपण आपल्या नातेसंबंधांना सुरूंग लावण्याचे दुष्कर्म करीत असतो.
जागा:
लोकांना त्यांची “जागा दाखवण्याच्या” नादात, आपण आपली जागा व पातळी नकळतपणे सोडून देतो.
शरण:
आपल्या अंतर्मनातील खोल व तीव्र इच्छांना व आकांक्षांना शरण जाणे व समर्पित होणे आपल्यासाठी सर्वाधिक यशदायी, उर्जादायी व सुखदायी असते.
शिक्षण:
शिक्षण म्हणजे शरीर, बुद्धी व मन यांचा निरंतर विकास; शाळा-कॉलेजं आपल्याला फक्त त्याचा मार्ग व पद्धती शिकवतात.
झपाटलेले:
झपाटलेल्या माणसांकडे खूप ताकद असते, म्हणून माणसाने एखाद्या तरी विधायक ध्येयाने झपाटलेले असावे.