आपल्या मनात कोणते विचार येतात? यापेक्षा आपण त्यांमधील कोणते विचार चिंतन व कृती करण्यासाठी निवडतो? त्यावर आपले फळ व भविष्य ठरते, हे समजून घ्यायला शिकूया.
Category: Uncategorized
भले:
‘इतरांचे काय वाट्टेल ते होवो, आपले तेवढे भले झाले म्हणजे झाले’, या विचारातून केलेल्या जास्तीत जास्त प्रयत्नांतून जास्त दुःखच निर्माण होऊ शकते, हे समजून घ्यायला शिकूया.
भेटल्यावर:
ऐकमेकांना भेटल्यावर हजर नसणाऱ्या कोणाची स्तुती, कौतुक किंवा गौरव करण्यासारखे काहीच नसेल, तर आपण शांत राहायला व मौन पाळायला शिकूया.
दुःखी:
दुःखाचे चिंतन करणे, दुःख सांगत सुटणे, दुःखी पर्याय निवडणे व दुःखस्वप्ने पाहणे हे आपले जीवन दुःखी करण्याचे खात्रीचे उपाय आहेत, हे समजून घ्यायला शिकूया.
माणूस:
स्वतःचा स्वार्थ साधून इतरांनाही त्यांचा स्वार्थ साधू देतो तो माणूस, तर इतरांचा विचारही न करता फक्त स्वतःचा स्वार्थ साधतो तो पशू, हे समजून घ्यायला शिकूया.
भाग:
आपल्या ज्या गुणांना आपले आसपासचे लोक वारंवार वाव, प्रतिसाद, वाहवा व किंमत देतात ते गुण वाढत जातात व ते आपल्या नकळत आपल्या व्यक्तीमत्वाचा अविभाज्य भाग बनतात.
कुठे जायचे:
जर आपल्याला, कुठे जायचे आहे? व का? हे माहिती नसेल, तर आपल्याला कुठे थांबायचे आहे? व का? हे कधीही समजणार नाही, म्हणून या प्रश्नांची उत्तरे शोधायला शिकूया.
थांबायचे:
जीवनात अपार कष्ट व प्रयत्न करूनही आपल्या मनात शांतता नसेल, अपयशाची व दुःखाची भावना असेल, तर थोडं चिंतन करून थांबायचे कुठे? या प्रश्नाचे उत्तर शोधायला शिकूया.
गैरसमज:
आपण अडचणीतून बाहेर येण्याचा प्रयत्नही करत नाही व मदतही घेत नाही कारण ‘जे नशीबात व दैवात आहे ते भोगावेच लागणार’ हा गैरसमज, हे समजून घ्यायला शिकूया.
शहाणपण:
शहाणपण म्हणजे ‘आपलं व इतरांचं भलं व चांगलं व्हावं’, हे तत्व इच्छा, चिंतन, बोलणं व करणं या चारही पातळ्यांवर पाळायला शिकणं हे समजून घ्यायला शिकूया.