जीवनाच्या परिक्षेत अभ्यासक्रम ठरवणारे, शिकवणारे, शिकणारे, पेपर सेट करणारे, लिहिणारे, तपासणारे व निकाल देणारे सारेकाही एकमेव आपण स्वतःच आहोत, हे समजून घ्यायला शिकूया.
Category: Uncategorized
अनुभव:
आपला अनुभव आपला असतो, इतरांचा अनुभव इतरांचा, अनुभव मूल्यवान असतात पण आव्हान समान असेल तरीही अनुभव समान व एकसारखे कधीही नसतात, हे समजून घ्यायला शिकूया.
जीवन:
आपल्याला पडणारे प्रश्न, त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी केलेली धडपड, त्यातून मिळालेली काही उत्तरे, त्या उत्तरांमधून पुन्हा पडणारे प्रश्न, अशी प्रश्नांची अखंड मालिका म्हणजेच आपले जीवन होय.
वळण:
चांगले वळण फक्त विचारांत व डोक्यात असेल तर ती आपली डोकेदुखी ठरते, तेच चांगले वळण सरावाने अंगवळणी पडल्यास आपल्या यशाचे गमक ठरू शकते.
वळवणे:
“कळतंय पण वळत नाही”, अशा अवस्थेत आपल्या बुद्धीला कळलेले असते, मनाला व ह्रदयाला नाही ज्यांचे वळवणे हे काम आहे, हे समजून घ्यायला शिकूया.
मुक्त:
आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक भावनांपासून मुक्त होण्यासाठी त्यांना विरोध करणे टाळणे व त्यांना आपल्या अंतर्मनातून सखोल जाणून घेणे, हे सर्वोत्तम पर्याय वापरायला सुरुवात करूया.
वास्तविक जग:
आपले मन, ध्यान, स्मृती व विचार जेथे असतील तेच त्या क्षणासाठी आपले वास्तविक जग असते व त्यानुसार आपण प्रतिक्रीयाही देतो, मग शरीराने आपण कोठेही असो, हे समजून घ्यायला शिकूया.
वेळ:
भविष्यात कधीतरी वेळ आल्यावर वेळेबद्दल विचार करून अमूल्य वेळ वाया घालवण्याऐवजी आजच आपल्या त्या अमूल्य वेळेचा विचार करण्यासाठी वेळ काढायला सुरुवात करूया.
सज्ञान:
आपण मिळवलेल्या ज्ञानाने जर आपला अहंकार व अभिमान गळून पडले तर ते सज्ञान आणि जर वाढू लागले तर ते अज्ञान, हे समजून घ्यायला शिकूया.
बदलणार:
“आमचं नक्की ठरलंय, आम्ही पक्कं ठरवलंय” अशी आपली अवस्था असेल तर कसलीही संगत, परिस्थिती किंवा मनस्थिती आपल्याला बदलणार नाही, हे समजून घ्यायला शिकूया.