चार बोटांचे अंतर:

जुन्याकाळी आणि आजही सत्य आणि असत्य किंवा खरं आणि खोटं यांमधील फरक कसा ओळखावा? हा एक मोठा गंभीर व गंमतीशीर प्रश्न मानवासमोर नेहमीच आ वासून उभा राहीलेला दिसतो. यापूर्वी अनेक विद्वानांनी याचे उत्तर अतिशय सोप्या व समर्पक पद्धतीने “चार बोटांचे अंतर” असं शोधलेले आहे. कान आणि डोळे यांच्यामध्ये असणार हे अंतर. कानाने ऐकलेल्या गोष्टींमध्ये आणि डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींमध्ये जे अंतर आहे, तेच सत्य आणि असत्य यामधील अंतर आहे. जी गोष्ट ऐकलेली आहे ती असत्य आणि जी गोष्ट डोळ्यांनी पाहिलेली आहे ती सत्य, असा एक ठोकताळा यामध्ये आहे.

परंतु आजकालच्या जगात सोशल मीडियाच्या, इंटरनेट व दूरदर्शन या “द्रुकश्राव्य माध्यमांमुळे” लोकांची “चार बोटांचे अंतर” या ठोकताळ्यामुळे मोठीच गोची होते. बऱ्याच गोष्टी ज्या यापूर्वी ऐकलेल्या म्हणून गणल्या जायच्या त्या आता “प्रत्यक्ष पाहिल्या” म्हणून गणल्या जाऊ लागल्या. सोशल मीडियावर अमुक एक गोष्ट आपण ऐकली, असं न म्हणता ती गोष्टी आपण पाहीली असं म्हणतो. समाजिक माध्यमावर वाचलेली गोष्टही पाहिलेली गोष्टी या सदरामध्ये गणली जाते. मग आपल्या “चार बोटांचे अंतर” या मान्यतेनुसार या गोष्टी आपल्याला सत्य व खऱ्या वाटल्या, तर त्यात नवल नाही. आपल्या जुन्या मान्यतेनुसार मग आपल्या बुद्धीला “चार बोटांचे अंतर” या निकषाप्रमाणे ऐकलेल्या व वाचलेल्या गोष्टीसुद्धा प्रत्यक्ष पाहिल्यासारख्या भासू लागतात. मग त्या सर्व कधीही प्रत्यक्ष न पाहीलेल्या गोष्टीही आपल्याला व इतर ऐकणाऱ्यांना सत्य वाटू लागतात. त्यामुळे अशा सामाजिक व द्रुकश्राव्य माध्यमांतून बरेच गैरसमज व गैरसमजुती सत्य व खऱ्या म्हणून पसरतात. कोणतीही गोष्ट मी पाहीली आहे म्हटलं की त्याची सत्यता अलिखित होते या मान्यतेला बरेच लोक बळी पडताना दिसतात.

त्यामुळे आता सत्य किंवा असत्य आणि खोटं किंवा खरं याला वेगळे निकष लावण्याची गरज आहे. तसं तर कान आणि डोळे दोन्हींही आपली अतिशय महत्वाची इंद्रिये आहेत. सत्य असत्याचा निर्णय घेणारी आपल्या मेंदूतील केंद्रे हीसुद्धा डोळ्यापासून व कानांपासून चार बोटे अंतरावरच असतात. आता कान व डोळे किंवा पाहणे आणि ऐकणे हा साधा हिशोब व ठोकताळा ठेवणे बंद करायला हवे. पाहिलेलं आणि ऐकलेलं आपल्या तर्काच्या व बुद्धीच्या साहाय्याने तारतम्य व विवेकाचा वापर करून आकडेवारीच्या सहाय्याने तपासले गेले पाहिजे. हे तपासणे निशंक व निष्पक्षपाती करण्यासाठी आपल्या आवडीनिवडी आणि भावभावना ठरवणारी मेंदूतील केंद्रेही विचारात घेतली पाहीजेत. पुन्हा आवडीनिवडी व भावभावनांची केंद्रे ही तार्किक आणि बौद्धिक केंद्रापासून अंदाजे चार बोटे अंतरावरच असतात.
म्हणून परत सत्य किंवा असत्य आणि खऱ्या किंवा खोट्या याबद्दलचे निकष व ठोकताळे पुन्हा “चार बोटांचे अंतर आहे” असं म्हणायला हरकत नाही, फक्त ते अंतर कान आणि डोळे यांमधील नसून आपल्या मेंदूतील तार्किक किंवा बौद्धिक केंद्रे आणि भावनिक व अंतर्गत उर्मी जपणारी केंद्रे यामधील अंतर आहे. अर्थातच हे अंतर तार्किक केंद्रे व भावनिक केंद्रे यांमधील आहे आणि हे अंतरही चार बोटांचेच आहे, हा एक सुखद योगायोग आहे.

डॉ. संताजी शेळके

मानसोपचारतज्ज्ञ, बारामती.

वापर:

स्थळ, काळ, वेळ यांनुसार आपण जिथे आहोत तिथे, आपल्याजवळील कौशल्यांचा पुरेपूर व यथायोग्य वापर करणे, म्हणजे यशस्वी होणे.