अफवा उवाच
दुपारची वेळ, ओपीडी संपलेली होती. कोरोना साथरोगाला घाबरल्यामुळे चिंता वाढलेले दोघे नुकतेच भेटून गेले होते. त्याच विचारात होतो. मोबाइल वाजला. उचलला,
“हेलो”
“डॉक्टर, ओपीडी चालू आहे का?”
“हो, या लवकर.
“नाही, मी बरा आहे. अजून महिन्याच्या गोळ्या आहेत.”
“मग.”
“डॉक्टर लोकांनाही कोरोना होतोय, काळजी घ्या.”
“होय, धन्यवाद.”
” पण, डॉक्टरला नाही व्हावा, अस्सं वाटतं.”
“का बरं? तोही माणूसच आहे.”
“तुम्हाला, सगळं माहिती असतंय. त्यामुळे तुम्ही काळजी घेऊ शकता. आजारापासून दूर राहू शकता.”
“हो, बरोबर.”
“मग, मलाही सांगा. कोरोनाला कसं रोखायचं ते?”
“घरी राहा. वारंवार हात धुवा. मास्क वापरा. सुरक्षित अंतर ठेवा. ताप, खोकला झाल्यास सरकारी इस्पितळात तपासणी करा.”
“हे तर आम्हाला पण माहिती आहे.”
“अरे वा!”
“मला तो गुपित इलाज सांगा ना.”
“कसलं गुपित?”
“चायनीज वनस्पती औषध, समूळ बरं करणारं.”
“असं काही मला ठाऊक नाही.”
“चीनने कोरोना घालवला ते!”
“लाँकडाऊन पाळून घालवलाय त्यांनी.”
“आपला का जात नाही?”
“कडक लाँकडाऊन पाळल्यास नक्की जाईल.”
“नाही गेला तर?”
“प्रत्येकाने काळजी घेतल्यास नक्की जाईल.”
“वाटत नाही! असो! तुमच्याकडे चायनीज औषध आल्यावर मला नक्की द्या. कीतीही पैसे देऊ.”
“अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका!” मी
“सत्य आहे ते! तेवढं औषध आलं की सांगा. कोणाकडे मिळत असल्यास सांगा. फार उपकार होतील. ठेवतो आता. काळजी घ्या.”
आणि काही बोलू न देता त्याने फोन बंद केला.
वारंवार, वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या माध्यमातून व लोकांकडून ऐकलेली व पाहिलेली एखादी अफवा सुद्धा सत्य वाटू लागते. म्हणून कोणत्याही प्रकारची अफवा न पसरवणे हीच प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.
डॉ. संताजी शेळके
बारामती.