ठेच:
“आम्ही जे भोगलं ते आमच्या मुलांना नको. आम्हाला जे कष्ट पडले ते आमच्या मुलांना पडू नयेत. आम्ही ज्या यातना लहानपणी सहन केल्या त्या आमच्या मुलांना नकोत. आम्ही जे रानामाळात काबाडकष्ट केले ते आमच्या मुलांना करण्याची वेळ येऊ नये. आम्ही जे कमीत कमी पुस्तकं व वह्या असताना शिकलो ती वेळ आमच्या मुलांवर यायला नको. आम्हाला लिहायला वही नव्हती, पाटी नव्हती, पेन्सिल नव्हती, ती वेळ आमच्या मुलांवर येऊ नये. आमची खायची प्यायची आभाळ झाली ती आमच्या मुलांची होऊ नये. आमच्या आईवडिलांनी ज्या शिक्षा केल्या ज्या पद्धतीने आमच्याशी वागले त्या पद्धतीने आम्ही आमच्या मुलांची वागणार नाही. आम्हाला ज्या पद्धतीने शिक्षकांनी ओरडलं, रागावले, शिक्षा केली, छड्या मारल्या त्याप्रमाणे त्यांनी आमच्या मुलांना नाही मारावं. आमच्या मुलामुलींच्या सुखासाठी व आनंदासाठी आम्ही काहीही करायला व कीतीही पैसे खर्च करायला तयार आहोत.” अशा अपेक्षा कदाचित आपल्या पाल्यांच्या विकासाच्या मार्गावरील खड्डे व दगडधोंडे ठरु शकतात.
अशा सर्व इच्छा करणाऱ्या हे माझ्या पालकांनो, तुम्ही आज उभे आहात, सक्सेसफुल आहात, यशस्वी आहात, हे सर्वस्वी तुमच्या भूतकाळातील समस्यांना तुम्ही दिलेले तोंड आणि त्याला काढलेला सकारात्मक पर्याय यातूनच झालेले आहात. या माध्यमातून तुम्ही शिकलेले अमूल्य धडे, ध्येयावरचा तुमचा विश्वास आणि ध्येयाप्रती तुम्ही केलेली सातत्यपूर्ण कष्ट हेच तुमच्या यशाचं रहस्य आहे.
या गोष्टी कदाचित तुमच्या वाट्याला आल्या नसत्या, तुम्ही केल्या नसत्या, चुका करायला तुम्ही घाबरला असता, कष्ट करायला तुम्ही नकार दिला असता, तुमच्या आई-वडिलांनी कष्ट करायला तुम्हाला नको म्हटलं असतं, मदत करणे हे वाईट व कमीपणाचे आहे असं शिकवलं असतं, तर कदाचित तुम्ही हे यश कधीही मिळवले नसते.
मुलांनी सक्सेसफुल व्हावं असं आपल्याला मनापासून वाटतं, म्हणून या गोष्टी आपल्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहेत हे त्यांना समजावून सांगू या. यावेळी आपण जरी घाबरलो, तरी माघार न घेता आपल्या इच्छेप्रती, ध्येयाप्रती आणि कामाप्रती आपण इमानदारीने आणि प्रामाणिकपणे पुनपुन्हा प्रयत्न करावे ही तुम्ही मुलांना करून दाखवा, ते बघून शिकतील. मुलांना शाळेतील, घरातील, घरगुती समारंभातील छोटी-छोटी कामं ध्येयाच्या स्वरुपात ठरवून द्या. ती पूर्ण केल्यावर त्यांच्यावर प्रेमाचा व कौतुकाचा भडीमार करा. काही चूक झाल्यास, काही काम न जमल्यास, काही करताना गडबड झाल्यास, त्याची इच्छा नसल्यास, काही तूटफूट झाल्यास त्यांनी जे थोडंफार केलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करा. सातत्याने पाठपुरावा करून ते सातत्य व चिकाटी या सवयी शिकतील.
तुमच्या भूतकाळातील किंवा इतरांच्या जीवनातील बंधनं, समस्या, अडचणी, आव्हाने किंवा यशापयश यांचे मापदंड व साखळदंड त्यांच्या पायात घालण्याचा प्रयत्न करू नका. ज्यामुळे त्यांचा विकासवेग मंदावेल अशी कोणतीही धारणा, वाक्ये, टीका, भविष्यवाणी किंवा चित्र त्यांच्या मनःपटलावर पाडू नका, पडू देऊ नका.
शेवटी अनावधानाने हे सगळे होऊन गेले असेल तर या सगळ्यातूनही आपण बाहेर निघू शकतो हा विश्वास ठेवा आणि आपली रोजची कामं, प्रत्येकाशी बोलणं, सर्वांशी वागणं हे आपली ध्येयं आणि आपल्या इच्छा यांच्याशी सुसंगत करून आपण उज्वल भविष्यकाळ घडवू शकतो, हाही विश्वास तयार करा. आपण त्यांच्या विकासाच्या व उत्क्रांतीच्या मार्गावरील ठेच किंवा पायातील दोरखंड न बनता, त्या ठेचेतून आपण सावरू शकतो किंवा तो दोरखंड आपण प्रयत्न करून तोडू शकतो हा विश्वास तयार करणे हेच खरी पालकत्व आहे.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती