ना वैयक्तिक ना व्यक्तीगत:

ना वैयक्तिक ना व्यक्तीगत:
कोणतीही समस्या किंवा प्रश्न सोडवताना; आपण समस्येकडे लक्ष देतो का? नाही. समस्या ज्यांच्यामुळे तयार झाली आहे असे आपल्याला वाटते त्यांच्याकडे लक्ष देतो का? होय. समस्या बाजूला ठेवून एखाद्याला धडा शिकवण्याची इच्छा आपल्याला होते का? होय. प्रश्न काय आहे याकडे न बघता आपण पण समोरच्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न करतो का? होय. हे सर्व बारकाईने पहावे व स्वतःला प्रश्न करायला सुरुवात करावी.
जेव्हा आपण म्हणतो “एखाद्यामुळे” समस्या तयार झाली तेव्हा त्या समस्येचे मूळ आपण त्या “एखाद्यामध्ये” शोधायला सुरुवात करतो. मूळ समस्येपासून आणि त्याच्या मूळ उत्तरांपासून दूर भरकटले जातो. समोरचा प्रश्न किंवा समोरची समस्या ही अडचण राहता आपल्याबरोबर काम करणारी व्यक्ती हीच आपली अडचण होऊन जाते. म्हणून एखाद्या व्यक्तीवर एखाद्या समस्येचे खापर फोडून मोकळे होण्यापेक्षा, त्या समस्येचे व्यक्तिनिरपेक्ष काही उत्तर मिळते का? हे विचारायला सुरुवात करणं गरजेचं आहे. यासाठी आपण कोणत्याही प्रश्नाकडे वैयक्तिकरीत्या न बघता, त्याकडे एक प्रश्न म्हणूनच पाहायला सुरुवात केली पाहिजे. असा प्रयत्न केल्यास आपल्या आयुष्यातील बरेच प्रश्न, आपण कुटुंबीय व सहकारी यांना न दुखावता, कोणावरही दोषारोप न करता आणि स्वतःलाही त्रास करून न घेता सोडवू शकतो.
आपल्या पाल्याच्या बाबतीतच पहा; आपल्या पाल्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न, समस्या आपण ऐकून व समजून घेतोय का?
पाल्याच्या अडचणींची काय काय कारणे असू शकतात व त्यावर काही पर्याय निघू शकतोय का?
आपल्या पाल्याला आपण कशाही प्रकारे मदत करू शकतोय का?
आपल्या अनुभवांचा आपल्या पाल्याला उपयोग होऊ देऊ शकतोय का?
वरील प्रश्नांची उत्तरे अर्थातच होय असावीत, पण ती नक्की तशीच असतात काय, तर नाही. परंतु आपण हे सगळं बाजूला ठेवतो आणि त्या सर्व अडचणींना आपला पाल्यच कसा कसा जबाबदार आहे?
सर्व समस्या त्याच्या एकट्यामुळेच कशा तयार झाल्या आहेत?
जगातील सर्व अडचणींमध्ये आपल्या पाल्याचाच हात असतो का?
सर्व प्रश्नांचं एकमेव कारण आपला पाल्यच असतो का?
त्याचे मत आणि त्यांनी मांडलेली बाजू आपण झटक्यासरशी खोडून टाकतो का?
त्यांनी केलेला तर्क आणि त्यांनी मांडलेले विचार कसे बालिश आणि मूर्खपणाचे आहेत असे सिद्ध करतो का?
त्याला आलेल्या अडचणी आपण वैयक्तिकरित्या करून घेऊन स्वतःच्या अस्मितेचा, इज्जतीचा, किंमतीचा आणि मानपानाचा प्रश्न करून घेतो का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही असावीत, पण दुर्दैवाने सर्व उत्तरे होय असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही असतील तर आपल्या पाल्याच्या अडचणी व प्रश्न कदाचित आपोआप सुटू शकतात किंवा कदाचित प्रश्न म्हणावेत इतके ते तीव्र होणारच नाहीत.
संसारांमध्ये नवरा बायको या नात्यामध्येही होणारे बरेच ताण-तणाव आणि प्रश्न हे संसारात येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न यामुळे येतात का? तर नाही. ते येतात कारण या अडचणींना व प्रश्नांना आपण आपल्या जोडीदाराला जबाबदार धरल्यामुळे. त्यामुळे मूळ प्रश्न आणि अडचणी यांचे मूळ कारण आणि मूळ उत्तर बाजूला राहते. आपण एकमेकांकडे केलेल्या बोटांमुळे आणि आरोपांमुळे तयार होणारे नवीन आणि दुय्यम प्रश्न व अडचणी उत्पन्न होतात. या दुय्यम प्रश्नांना व अडचणींना कुठलेही मूळ कारण नसल्यामुळे व त्याचे मूळ कारणं आपल्यातच लपलेली असल्यामुळे त्यावर आपल्याला मार्गच शोधता येत नाही. आपणही ते प्रश्न वैयक्तिकरित्या घेऊन त्या अडचणी आपण आपल्या जोडीदाराशी जोडून टाकतो आणि जोडीदाराला जबाबदार धरून त्यांच्यावर आगपाखड किंवा दोषारोप करतो. अर्थात यातून आपण कदाचित जिंकू शकतो परंतु आपला संसार मात्र हरण्याची जास्त शक्यता असते. म्हणून कोणताही प्रश्न, कोणतीही समस्या, कोणतीही अडचण ही वैयक्तिकरित्या व स्वतःची करून नाही घेतली पाहिजे आणि व्यक्तीगतरित्या दुसऱ्यालाही त्याला कारणीभूत नाही धरलं पाहिजे, तेव्हाच आपण त्या समस्येच्या मूळ कारणापर्यंत आणि मूळ उत्तरापर्यंत पोहोचू शकतो.

Leave a comment