पालकत्व व भावनिक समस्या:
पालकांना काय काय समस्या असतात? का असतात? व त्या कशा सोडवाव्यात? या प्रश्नांची उत्तरे काही पालक हसण्यावारी नेतात. पण जेव्हा त्यांना त्यांच्या मुलांसोबत समस्या निर्माण होतात तेव्हा त्यांच्या नम्रतेची व संयमाची कसोटी लागते.
एक पालक म्हणून, प्रत्येक दिवशी सकाळी आपण स्वतःला म्हणू की, आजचा दिवस वेगळा व चांगला असेल. परंतु आपली मुले तोही दिवस इतर नेहमीच्या दिवसासारखा करून टाकतात. “तुम्ही तीला माझ्यापेक्षा जास्त दिले!” “मला दुसरा कप हवा आहे. ” ” ही भाजी कीती खराब आहे.” “त्याने मला मारले.” “मला ती अजिबात आवडत नाही!” या दररोजच्या भावनिक तक्रारी पालकांसाठी एक आव्हान उभे करतात.
मुलांना भावनिकद्रुष्ट्या कसे वाटते आणि ते कसे बोलतात व वागतात याचा थेट संबंध असतो. जेव्हा मुलांना भावनिक द्रुष्टीने योग्य वाटते तेव्हा ते योग्य वर्तणूक करतात. अर्थात त्यांना भावनिक द्रुष्ट्या योग्य वाटण्यासाठी आपण मदत केली तर त्यांनी वर्तणूक आपोआपच योग्य होऊन जाईल. मुलांची वागणूक, वर्तणूक आणि बोलणं सुधारण्यासाठी व त्यांना संस्कारित करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग नव्हे काय? आणि हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या भावना व भावनिक विश्लेषणं लक्षपूर्वक ऐकणे व मनापासून स्वीकारणे.
आपण पालक सहसा आपल्या मुलांच्या भावना ऐकूनच घेत नाही. “एक शब्द बोलू नको, तू काहीही बोलू नको, चूप गप्प बैस,” असं म्हणून आपण त्यांना झिडकारून टाकतो. ऐकून घ्यायला लागलो तरी, आपण पूर्ण लक्ष त्यांच्या भावनांकडे, बोलण्याकडे व हावभावांकडे देत नाही. नुसतेच “हो हो, पुढे पुढे, बोल बोल, ऐकतोय मी,” असं म्हणत त्यांच्या चेहऱ्याकडेही न पाहता त्यांचं म्हणणं नापसंदीनं ऐकत असतो. पूर्ण ऐकून घ्यायच्या अगोदरच “एवढं काय रडण्यासारखे आहे, मग कशाला तिथे गेलास, तू का मूर्खपणा केलास, तुझी चूक आहे, सोड ना एवढं काय त्यात,” असं म्हणून त्या भावना अवैध व अविचारी ठरवून टाकतो. नकारात्मक भावभावना, भावनिक बोलणं आणि वागणं यांचा आपण स्वीकारतच करीत नाही.
आपण आपल्या मुलांच्या भावनिक समस्या व भावना यांना अकारण, त्रासदायक, नाटकीय, अतार्किक व अवैध ठरवून टाकतो. उदा: “असं काही तुला वाटत नाही, बरं”, “काही नाही तू कंटाळा करतोस फक्त.”, “एवढं अस्वस्थ व्हायचं काहीच कारण नाही.” अशा प्रकारच्या सततच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे मुले गोंधळून जातात व चिडचिड करायला लागतात. तसेच भावना व भावनिक समस्या काय इतक्या महत्त्वाच्या नसतात, त्यांच्याकडे दुर्लक्षच करायला हवं, असा एक संदेश आपण मुलांना देत असतो. त्यामुळे मुले आपल्या भावभावनांना आणि भावनिक विश्वाला नाकारायला शिकतात. ही मुलं भावी आयुष्यात स्वतःला येणाऱ्या त्याचबरोबर इतरांच्याही भावनिक समस्यांना नाटकीय आणि अतार्किक समजून त्याकडे दुर्लक्ष करायला लागतात.
आपल्याला सर्वांना असंच वाटतं की इतर सर्व पालक चुका करतात पण मी तसा पालक नाही. आपल्याला आपल्या स्वतःच्या पालकत्वाबदल खूपच सकारात्मक आणि चांगलं वाटत असतं. परंतु जर आपण आपल्या पाल्यांसोबत होणाऱ्या दैनंदिन संभाषणाचं जवळून निरीक्षण केलं व आत्माअवलोकन केलं तर ही गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकते.
आपल्या मुलांबरोबर होणाऱ्या जवळपास सर्व संभाषणांचे रूपांतर युक्तिवादांमध्ये होते. भावनेच्या स्तरावरून वागणार्या आणि बोलणाऱ्या मुला-मुलींशी आपण बौद्धिक व तार्किक स्तरावरून वागायला आणि बोलायला सुरुवात करतो. मुलांच्या भावभावनांना आणि समजुतींना नाकारून आपण त्यांना संदेश देत असतो की, तुमच्या समजुती आणि भावना या विश्वासास पात्र नाहीत. अप्रत्यक्षरीत्या आपण मुलांना सांगत असतो की तुम्ही स्वतःवर व स्वतःच्या समजूतींवर विश्वास ठेवू नका. त्याऐवजी तुम्ही आमच्या भावना आणि आमच्या समजुती यावर विश्वास ठेवावा आणि त्यावरच अवलंबून रहावे, अशी आज्ञाच जणू आपण आपल्या मुलांना देत असतो.
आपण हे नक्की काय करतोय? मुलांची प्रगती की अधोगती, याचा एकदा नक्की विचार केला पाहिजे. आणि यामध्ये बदल करण्याचा निर्धार आणि निर्णय आपण केलाच पाहिजे. हे करण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे मुलांच्या जागेवर स्वतःला समजून, स्वतःला तशी समस्या किंवा भावना तयार झाल्यावर, स्वतःला कसे वागवले जाण्याची आपली इच्छा आहे? हा प्रश्न स्वतःला वारंवार विचारणे. असं समजा की आपण स्वतःच एक थकलेलं, कंटाळलेलं किंवा चिडलेलं मूल आहात. आणि आता कल्पना करा की घरातील मोठ्या माणसांनी काय बोलावं? आणि कसं वागावं?म्हणजे तुम्हाला तुमच्या भावना समजून घेतल्या सारखं वाटेल. मुलांच्या भावना मुलांच्या जागेवर जाऊन समजून घेतल्यावर नक्कीच मुलांच्या प्रती आपल्या प्रतिक्रिया, योग्य व विकसित असतील.
आपल्याला खरच मनापासून मुलांना समजून घ्यायचं असतं त्यांच्या भावना समजून घ्यायच्या असतात, पण त्या बाबतीत काय करायचं? व कसं करायचं? हे माहीत नसल्यास आपण आपल्या जुन्या पद्धतीनेच वागू आणि बोलू लागतो. या जुन्या पद्धती बदलल्याशिवाय आपण आपल्या मुलांच्या भावना व भावनिक विश्व समजून घेऊ शकणार नाही.
आपण आणि आपले पाल्य भावनिक दृष्ट्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असतो. या दोन्ही व्यक्तींपैकी कोणीही अगदी बरोबर आणि अगदी चूक नसतं. आपल्याला प्रत्येकाला जे काही वाटतं ते वाटतं, ते तसं का वाटतं? आणि तसं नाही वाटलं पाहिजे! असं म्हणणं म्हणजे त्या व्यक्तीच्या अस्तित्वावरच प्रश्न उभा केल्यासारखं आहे. त्यामुळे आपण आणि आपली मुले यांमधील संवादांमध्ये आपण युक्तिवादाला दुय्यम स्थान दिले पाहिजे आणि भावनिक दृष्टीने समजून घेण्याला प्राथमिक स्थान दिले पाहिजे. एखाद्या माणसाच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यावर किंवा त्या भावनांच्या खरेपणाबद्दलच प्रश्नचिन्ह तयार केल्यावर त्या माणसाला कसे वाटेल? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर देऊन त्यावरही विचार करावा.
एवढं करूनही मुलं एखाद्या दिवशी अशा विषयावर, असं काही बोलतील की आपल्याला आपलं समजून घेण्याचे स्थान टिकवणं अवघड होऊन जाईल. असे विषय व गोष्टी याबद्दल मुलांशी बोलताना आपण स्वतःबद्दलच नवीन काहीतरी शिकू आणि स्वतःला जाणण्यामध्ये याचा नक्कीच फायदा होईल. मुलांमधील ज्या भावना आपल्याला संतप्त व चिंताग्रस्त करतात आणि आपल्याला पुन्हा जुन्या मार्गाने प्रतिक्रिया द्यायला लावतात, त्या भावनांचा ऊगम आपल्या स्वतःमध्ये आहे मुलांमध्ये नाही. त्यानिमित्ताने मुलांशी संवाद आणि संभाषण करता करता, आपण स्वतः स्वतःला शोधण्यास सुरुवात करू, हा आपल्यासाठी बोनसच नव्हे काय?