संकटकालीन प्रसाद:
आपल्या स्वतःच्या भावनिक वादळांशी व संकटांशी लढत असताना, आपले मित्र, कुटुंबीय व नातलग आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी मदत करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनी दिलेले प्रतिसाद कधी आपल्याला आश्वस्थ करतात तर कधी अस्वस्थ. कुटुंबातील लोकांनी दिलेले प्रतिसाद कधी कडवट, तिरस्कारयुक्त, तणावकारक व नकोनकोसे वाटतात तर कधी हवाहवासा प्रसाद वाटतात. मित्रांनी व कुटुंबीयांनी दिलेल्या कोणत्याही प्रतिक्रिया अयोग्य किंवा चुकीच्या नसतात. ज्या प्रतिक्रिया आपणास योग्य, समजून घेणाऱ्या, स्विकारल्या जाणाऱ्या व प्रासंगिक वाटतात त्याच आपल्याला आधार देतात व आपल्यासाठी योग्य असतात.
“इतके अस्वस्थ होण्याचे काहीच कारण नाही. तसे वाटणे मूर्खपणाचे आहे. तू संपूर्ण गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त फुलवून सांगत आहेस. हे तुला जितके वाईट वाटत आहे तितके वाईट असू शकत नाही. चल हस जरा, तू हसताना खूप छान दिसतोस.” इत्यादी प्रकारच्या प्रतिक्रियेत आपल्या भावनाच नाकारल्या जातात. आपलं अस्तित्व म्हणजे आपलं भावविश्व असतं, त्यामुळे आपल्या भावना नाकारल्यामुळे आपल्याला आधार वाटण्याऐवजी अस्वस्थ वाटते.
“हे बघ, जीवन हे तसेच असते.
आयुष्यात आपल्या इच्छेनुसार गोष्टी होत नाहीत. टप्प्याटप्प्याने या गोष्टी शिकूण घेणे हेच तुझ्या हातात आहे. या जगात काहीही परिपूर्ण नाही. अपयशातून आपल्याला शिकायचे असते. मोठ्या लोकांची चरीत्रांतून बोध घे.” इत्यादी प्रतिक्रियांना दार्शनिक किंवा तात्विक प्रतिसाद म्हणतात. भावनिक वादळात असताना कसलीही तात्विक चर्चा आपल्याला नको असते. भावनिक वादळं चालू असताना तर्क व सामान्यज्ञान यांपेक्षा भावनिक नियोजनाला प्रथम प्राधान्य असते. आपल्याला हे तर्क व ज्ञान अगोदर माहिती असतात, आपल्याला तर्कही करता येत असतात. आपण स्वतःला तार्किक, माहितगार व ज्ञानी माणूस समजत असतो, परंतु संकटकाळी आपले रूपांतर भावनिक माणसात होते. आपली भावना अतार्किक ठरवली गेल्याने आपण चिडतो व मनमोकळा संवाद साधला जात नाही. आपल्याला तर्कहीन ठरवणाऱ्या व्यक्तीची मदत आपल्याला नकोशी वाटते.
“मला वाटते तू असे करावे, मला वाटते तू बॉसची मदत घ्यावी, सरळ तुझ्या बॉसची माफी माग, तुझी चूक मान्य कर, तू दुर्लक्षित केलेली कामे पूर्ण कर, असं पुन्हा कधी घडणार नाही हे लक्षात ठेव. नोकरी सोडून दे. घटस्फोट दे. त्याला चांगला धडा शिकव.” इत्यादी प्रतिक्रिया सल्ला व मार्गदर्शन या सदरात मोडतात. भावनिक वादळात आपल्याला सल्ला,व्याख्यान व प्रवचन दिल्यास आपली चिडचिड व गोंधळ होऊ शकतो.
“नेमकं काय संकट आहे? ही वेळ आलीच कशी? तू काळजी का घेतली नाहीस? कसं काय विसरलास तू? तू त्याला त्वरित का भेटला नाहीस? त्याचा मूड तुला कसा समजला नाही? हे यापूर्वी कधी घडले आहे का? तू माफी का मागीतली नाही? तू पुन्हा समजावून सांगायचा प्रयत्न का केला नाही?” इत्यादी प्रतिक्रिया प्रश्न विचारणे या प्रकारच्या असतात. यामुळे आपल्या क्षमतेवर व अकलेवर अविश्वास दाखवला जात असल्याची भावना होते व आपली हताशा वाढत जाते.
“मी तुझ्या भावना समजू शकतो.
लोकांच्या प्रतिक्रिया अशाच असतात. त्याला खूप टेंशन असणार. तू भाग्यवान आहेस की तुला रोज झाप मिळत नाही, माझी अवस्था तुझ्यासारखीच आहे.” इत्यादी प्रतिक्रिया मित्राच्या मनातील समान भावनांच्या विरोधी प्रकटीकरण असतं. अशा वेळी आपल्या भावनांचं सामायिकीकरण होतं व आपल्याला समजून घेतले जात नाही व आपली चेष्टा केली जात आहे, असे वाटत रहाते.
“अरेरे वाईट गोष्ट. ते खूप भयंकर आहे. मला फार वाईट वाटत आहे. बापरे ते कीती भयंकर आहे. रडवलंस की मला. खूपच अपमानास्पद. बिच्चारा, केवढा कमनशिबी.” अशा दया व करूणा दाखविणाऱ्या प्रतिक्रिया आपल्याला अजूनच असहाय बनवतात.
“तू अस्वस्थ आहेस याचे खरे कारण आहे की तुला प्रत्येक माणसात तुझे वरचष्मा करणारे वडिल दिसतात.
लहान असताना कदाचित तू निंदेची काळजी करणारा होतास, म्हणून कोणी निंदा केल्यास, तुझी ती भीती परत उफाळून येत असते.” इत्यादी प्रकारच्या प्रतिक्रियांना मनोविश्लेषण म्हणतात. यामुळे आपल्या मनात गोंधळ व अपराधी भावना निर्माण होतात.
“मला वाटते हा एक खडतर अनुभव असावा. तुझी चूक नसताना, इतर लोकांसमोर झाप ऐकायला कठीण वाटले असेल. एवढ्या दबावानंतर, अजून ताण घेणे, फारच कठीण झाले असावे. एवढे कष्ट करूनही अपयश समोर येणे, हा वाईट अनुभव असावा. तुझी समस्या ऐकून व समजून घेतली नाही, हे निराशाजनक असणार. जवळच्या लोकांनी विश्वास न ठेवणे, वेदनादायक असावे. कुटुंबातील सदस्य समजून घेत नाहीत, हा अनुभव दुखदायक असणार.” इत्यादी प्रतिक्रिया सहअनुभूति व सहवेदना या प्रकारच्या असतात. यामध्ये आपला मित्र व नातलग आपल्या भाव भावनांशी ताळमेळ करण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असतो. आपल्या भावना सामान्य, सहज, नैसर्गिक व स्वीकारार्ह आहेत, ही भावना आपल्या दुखी मनावरील फुंकर असते. आपल्या भावना अपरिहार्य असल्या तरी लवकरच त्या निघून जातात हा संदेश आपणास मिळतो. या कठीण काळात आपलं ऐकणारं, आपल्याला समजून घेणारं व आपल्याला सोबत व साथ देणारं कोणी तरी आहे, हे समजल्यावर आपण आपल्या समस्येवर धैर्याने मात करू शकतो.
म्हणूनच सहअनुभूती किंवा इम्पॅथेटीक अशा प्रकारची प्रतिक्रिया व प्रतिसाद हा भावनिक संकटकाळात, आपण आपले मित्र, कुटुंबीय, नातेवाईक व सहकारी यांना आधार म्हणून देऊ शकू असा सर्वोत्तम प्रसाद आहे.