स्मरणपेढी व चांगले विचार:
आपण नेहमी म्हणतो की माणसाने चांगला व सकारात्मक विचार करावा. परंतु चांगला विचार म्हणजे नेमके काय?
चांगले विचार म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये लाभलेल्या भेटलेल्या गोष्टींबद्दल व यशाबद्दल समाधान मानणारे विचार. आपल्याला न भेटलेल्या आणि अपयश आलेल्या गोष्टींमधून बोध देणारे विचार. आपल्याला मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, मुलं, पती किंवा पत्नी, आईवडील, शेजारी-पाजारी यासारखे सर्व लोक भेटले आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे विचार. आपल्याला रोज भेटणार्या लोकांबद्दल कृतज्ञता व समाधान मानणारे विचार. आपल्या मुलांनी, पत्नीने, पतीने आणि आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या कामांबद्दल धन्यवाद भाव व्यक्त करणारे विचार.
आपल्या सहकाऱ्यांनी व मित्रांनी आपल्यासाठी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व धन्यवाद मानणारे विचार म्हणजे चांगले विचार. कोणाकडून काहीही चूक झाली असता माफी करून टाकण्याचे व ती गोष्ट विसरून जाण्याचे व सोडून देण्याचे विचार. आपली कंपनी व बॉस यांच्याबद्दल व त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांना कृतज्ञता व धन्यवाद भाव व्यक्त करणारे विचार म्हणजे चांगले विचार.
नातेसंबंधांबद्दल, नातेवाईकांबद्दल व नातेसंबंधांमधील चांगल्या प्रसंगांबद्दल आभार, धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करणारे विचार. एखाद्या व्यक्ती मधील चांगले गुण पाहणारे, दाखवणारे व त्याबद्दल बोलणारे विचार. तसेच एखाद्या व्यक्तीच्या गुणांबद्दल, चांगल्या कार्याबद्दल व कौशल्याबद्दल त्यांचे गुणगान व कौतुक करणारे विचार म्हणजे चांगले विचार. दररोजच्या प्रसंगांमध्ये, गोष्टींमध्ये, व्यक्तींमध्ये व संकटांमध्ये चांगल्या गोष्टी नजरेस पाडणारे व त्यावर लक्ष केंद्रित करायला लावणारे विचार. छोटे छोटे विजय, छोटे छोटे आनंद व छोट्या छोट्या सिद्धी यांवर लक्ष केंद्रित करणारे, त्या स्मरणात ठेवणारे व त्या वारंवार आठवणारे विचार. आपण पाहू शकतो, बोलू शकतो व चालू शकतो त्याबद्दल कृतज्ञता भाव ठेवणारे विचार. आपण जिवंत आहोत याबद्दल आनंद व्यक्त करणारे व धन्यवादभाव ठेवणारे विचार. ज्या गोष्टींमुळे आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी स्मरणपेढीत जपून ठेवणारे व त्या गोष्टी वारंवार आठवणीत आणणारे विचार म्हणजे चांगले विचार.
आपल्या अचाट स्मरणशक्तीमुळे आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट आपण लक्षात ठेऊ शकतो. ही स्मरणशक्ती आपल्यासाठी शाप किंवा वरदान दोन्हीही ठरू शकते. ही स्मरणशक्ती आपल्यासाठी वरदान ठरावी आणि आपल्या आनंदाचा, सुखाचा व समाधानाचा प्रवाही व कधीही न आटणारा झरा व स्त्रोत बनावी यासाठी आपण त्यामध्ये चांगले विचार भरले पाहिजेत, साठवले पाहिजेत आणि त्यातून वारंवार चांगलेच विचार बाहेर काढले व वापरले पाहिजेत. आपल्या स्मरणपेढीमध्ये आपण नेहमी चांगले विचार ठासून भरून ठेवले पाहिजेत व सुरक्षितपणे साठवून ठेवले पाहिजेत. या स्मरणपेढीमध्ये चांगल्या विचारांचा आपण नेहमी भरणा करत राहिलं पाहिजे. जेणेकरून चांगल्या विचारांनी भरलेली ही स्मरणपेढी नेहमीच आपल्यासाठी आपल्या आनंदाचा, सुखाचा व समाधानाचा अखंड स्त्रोत बनेल.