नशीब: थांबा
“यशस्वी व थोर लोक नशीबवान असतात” यावर आपण किती भरवसा ठेवतो? खूपच जास्त. इतका की नशीबासमोर तीव्र इच्छा, पूर्वनियोजन, योजना, कष्ट, सहयोग, सहकार्य, सद्सद्विवेक व मनोभूमिका या गोष्टी आपण नगण्यच समजतो. कार्यकारणभाव पूर्णपणे कानाआड करतो. यशस्वी लोक घराबाहेर, जाहिरातीत व जनमानसात काय बोलतात व करतात? यावर आपले लक्ष केंद्रित करतो. ते वापरणारे कपडे, घरगुती वस्तू, पेयं, गोळ्या, खाद्यपदार्थ, साबणं, क्रीम्स आपणही वापरायला सुरुवात करतो. ज्या देवावर ते श्रद्धा ठेवतात, ज्या बाबाजींना ते भेटतात, जो गंडादोरा, धागा, टिळा ते लावतात ते सर्व आपणही करायला सुरुवात करतो. परंतु हेच यशस्वी लोक ज्या तीव्र इच्छेने पूर्वनियोजन, योजना व कष्ट करतात ते आपण विसरून जातो. त्यांचे सहयोग, सहकार्य, सद्सद्विवेक व सकारात्मक मनोभूमिका व द्रुष्टीकोन यांकडे आपण ढुंकूनही पाहत नाही. आपणही एकमेकांना परीक्षेपूर्वी “बेस्ट लक” देतो, जणू सर्वकाही लकच्याच हातात आहे. परंतु यशाची पार्श्वभूमी व खुद्द यश ठरवणाऱ्या तीव्र इच्छा, पूर्वनियोजन, योजना, कष्ट, सहयोग, सहकार्य, सद्सद्विवेक व मनोभूमिका या गोष्टी नजरेआड करतो. म्हणून नशीबावर हवाला ठेवण्याआधी व नशीबाला दोष देण्याआधी तीव्र इच्छा, पूर्वनियोजन, योजना, कष्ट, सहयोग, सहकार्य, सद्सद्विवेक, मनोभूमिका व सकारात्मक द्रुष्टीकोन या गोष्टींची नक्कीच आठवण करा.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
यशापयशाचे जनक
आपण कितीही बुद्धिमान असलो, आपला बुद्ध्यांक कितीही जास्त असला, आपल्याला शाळेत कितीही जास्त गुण मिळाले असले तरीही; आपल्या या बुद्धिचं व्यवस्थापन व दिशादर्शन करणारा आपला द्रुष्टीकोन, आपली मनोभूमिका व मानसिकता हेच, येत्या काळातील आपल्या यशापयशाचे जनक असतात.
नातेसंबंध संजीवनी
नातेसंबंध संजीवनी:
आपले नातेसंबंध चांगले आणि आनंददायी असावेत असे आपल्या सर्वांनाच वाटतं. परंतु जेव्हा एखादा नातेसंबंध तणावात जातो, बिघडतो अथवा चीघळतो, तेव्हा तो नातेसंबंध सुधारण्यासाठी:
सुरुवात कोणी करावी?
त्याचा पाठपुरावा कोणी करावा?
त्यामध्ये माघार कोणी घ्यावी?
त्यामध्ये धन्यवादभाव कोणी ठेवावा?
माफी कोणी मागावी?
कौतुक व शाबासकीची थाप कोणी द्यावी?
त्यामध्ये माफी कोणी करावी?
त्यामध्ये प्रेम कोणी ओतावे?
सद्भाव आणि संयम कोणी ठेवावा?
या सर्व प्रश्नांची उत्तरे जर आपण “समोरच्या व्यक्तीने” अशी दिली तर अशी नाती आयुष्यभर रखडलेलीच राहतात. म्हणून या सर्व प्रश्नांची उत्तरं “आपण स्वतः” अशी द्यावीत आणि रखडलेल्या या नात्यांना संजीवनी द्यावी.
श्रवणानुबंध: आत्महत्या प्रतिबंध
आत्महत्या होऊ नये असे आपल्याला प्रत्येकाला वाटते. आणि आत्महत्या होऊ नयेत यासाठी खरे तर आपल्यापैकी प्रत्येकजण मदत करू शकतो. यासाठी फक्त आपलं मन थोडसं दुसऱ्या प्रति संवेदनशील असणं आणि दुसऱ्यांच्या भावना समजून व ऐकून घेणे ही दोन कौशल्य आपल्या जवळ असली पाहिजेत.
पृथ्वीतलावरील प्रत्येक माणसाला कधी ना कधी हा “जीव नकोसा वाटणे” ही भावना येत असते. त्यापैकी बऱ्याच जणांना “परमेश्वराने हे जीवन संपून टाकावं” असं वाटतं. त्यापैकी काही जणांना हे काम स्वतः करून “आत्महत्या करावं” असंही वाटू शकतं. ही भावना अत्यंत स्वाभाविक व नैसर्गिक अशा प्रकारची आहे. ही कोणालाही येऊ शकते. कधीही येऊ शकते. ही भावना व विचार येण्याचा शिक्षण, पदवी, पद, पगार, पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा, नातलग, मित्र, मैत्रिणी, गाड्या, बंगले, सुखसुविधा, समाधान, आनंद, यश या गोष्टींशी काडीचाही संबंध नाही. अगदी आपल्याला वाटणाऱ्या नगण्य आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा माणूस आत्महत्येबद्दल विचार करू शकतो. त्यामुळे आपण त्या बाबतीत थोडं जास्त चौकस व संशयी असले पाहिजे.
आत्महत्येच्या टोकापर्यंत जाण्याची प्रक्रिया व पद्धत ही व्यक्तिपरत्वे आणि संस्कृतीपरत्वे वेगवेगळी असू शकते. आत्महत्येच्या प्रमुख कारणांमध्ये नैराश्य, बेचैनी, एकटेपणा आणि आयुष्याबद्दल निराशा व असमाधान यांचा समावेश होतो. आत्महत्येचा प्रयत्न व पद्धत यामध्ये प्रामुख्याने कीटकनाशक किंवा जंतुनाशक पिणे, औषधांचा ओव्हरडोस घेणे, गळफास घेणे, बिल्डिंग वरून उडी मारणे, नस कापून घेणे, पिस्तूलाने गोळी मारणे इत्यादींचा सामावेश होतो.
अर्थात, जेव्हा जेव्हा आपला एखादा मित्र, सहकारी, शेजारी, नातेवाईक आपल्याला टाळायला लागतो, चिडचिड करायला लागतो, सारखं सारखं मृत्यूबद्दल बोलत राहतो, जीवन व्यर्थ असल्याच्या गोष्टी करतो, तत्वज्ञानाच्या गोष्टी करतो, आपल्याला खूप समजत असल्याचं सांगायला लागतो, संन्यास व बलिदान करण्याच्या गोष्टी करतो, जीवनाला काही अर्थ नसल्याबद्दल बोलतो, मृत्यूनंतरच्या गोष्टींबद्दल बोलत राहतो, जीवन मिथ्या असल्याबद्दल पोस्ट करतो अशा वेळी आपण सावध झाले पाहिजे. ही सर्व मनामध्ये आत्महत्येबद्दल विचार चालु असण्याची लक्षणे आहेत. या अचानक किंवा हळूहळू झालेल्या बदलाबद्दल आपण त्या व्यक्तीशी किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकांशी आपण बोलले पाहिजे.
आपण त्यांच्या आत्महत्या करण्याच्या विचारांबद्दल विचारले पाहिजे. अशा विचारांबद्दल विचारणे हा मदत करण्याचा उत्तम मार्ग आहे. त्या व्यक्तीने आपल्याकडे मदत मागावी, आपल्या आधारासाठी आपल्यासमोर प्रस्ताव ठेवावा अशी अपेक्षा आपण करू नये. स्वतःहून मदत मागणाऱ्या लोकांना तर मदत करावी परंतु स्वतःहून मदत मागू न शकणाऱ्या लोकांनाही आपली मदत व आधार आपण पोहोचता केला पाहिजे. याचे कारण म्हणजे जवळजवळ 50 ते 60 टक्के लोकांना आपल्याला काहीतरी त्रास होतोय आणि याला आपण कोणाची तरी मदत घेऊ शकतो हेच समजत नाही. तर दुसऱ्या टोकाला ज्यांना आपल्याला मदतीची गरज आहे असं वाटतं, ते समाजाच्या व्यंग्य दृष्टिकोनामुळे व नकारात्मक पूर्व ग्रहामुळे मदत घेणे टाळतात. कोणाकडे तरी मदत मागणे, आधार मागणे म्हणजे दुर्बल व सक्षम असणे, अशीही भावना मनात तयार होते. आपण आत्महत्येच्या विचारांबद्दल विचारल्यामुळे त्या व्यक्तीला हलके वाटते व नैसर्गिक वाटते. असे विचार येण्याबद्दल तो स्वतःला कमी लेखत नाही किंवा वाईट लेखत नाही. असा विचार येणे हे एक नैसर्गिक गोष्ट आहे असे समजून तो आपले मन मोकळे करू लागतो.
चहा, कॉफी, नाश्ता व जेवण या ऑफर फक्त आनंदाच्या क्षणी नकोत तर दुःखाच्या आणि निराशेच्या क्षणीही दिल्या गेल्या पाहिजेत. फेसबुक वर अशा पोस्टची भरमार व्हायला पाहिजे ज्यामध्ये चहा पिणाऱ्या फोटो सोबत लिहिलेलं असेल “दु:खी, नाराज व बेचैन वाटतंय, मित्राची स्टोरी ऐकताना पण छान आणि कृतज्ञ वाटतंय त्याची मनस्थिती समजून घेताना.” अशा ऑफर स्वीकारल्याबद्दल त्या व्यक्तीला धन्यवाद दिले पाहिजे. त्या व्यक्तीला त्याच्या मनातील सर्व विचार व भावना व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. अशा व्यक्तीला कोणताही सल्ला देण्याची गडबड करू नये. तुमचा दिलेला सल्ला त्याला पटला नाही किंवा पाळता आला नाही तर तो स्वतःला अजून दुर्बल समजू शकतो. फक्त पूर्ण लक्ष देऊन ते काय म्हणतायत ते ऐका. यावेळी फक्त त्यांचं बोलणं, त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव व शरीराच्या हालचाली यावरच तुमचं लक्ष केंद्रित करा. त्या व्यक्तीला पूर्णपणे समजून घ्या. त्याला कुठेही टोकू नका, कसलीही नकारात्मक प्रतिक्रिया देऊ नका, फक्त त्याला समजून घ्या फक्त त्याचं ऐकून घ्या. त्यांना हसू नका, त्यांना होकार किंवा नकारही देऊ नका, त्यांची चेष्टा मस्करी करू नका. हुंकार भरणे, तोंड वेडेवाकडे करणे, श्वास मोठ्याने घेणे आणि सोडणे, कपाळावर आट्या आणणे, डोळे लहान मोठे करून बघणे, अशाप्रकारच्या कृती करू नका. त्यांनी स्वतःची वैयक्तिक व गुप्त माहिती, विचार व भावनांबद्दल आपल्याशी हितगुज केल्याबद्दल त्यांचे आभार माना.
त्यांना अधिक चांगले होण्यासाठी, बरे वाटण्यासाठी व मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो ते विचारा. बऱ्याच वेळा आपण जी मदत किंवा जो आधार त्या व्यक्तीला देऊ पाहतो तो त्याला पटत नाही, आवडत नाही. अशावेळी त्याच्याशी या मदतीबद्दल वाद न घालता त्याला कशाप्रकारची मदत व सहकार्य आवडते आहे व पटते आहे, तशाच प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न करा. अर्थात ती मदत तुमच्यावर अन्याय करणारी व तुम्हाला अडचणीत ढकलणारी नक्कीच नसावी.
बऱ्याच वेळा ज्या व्यक्तींना मदतीची गरज असते अशा व्यक्ती समाजापासून दूर जातात व समाजाला आपला शत्रू मानतात. जग हे आपल्यासाठी वाईट आहे, असा ग्रह करून बसतात, त्यामुळे त्या व्यक्तींना मदत करणे थोडे कठीण होऊन बसते. म्हणून अशा व्यक्तींशी संपर्क तोडण्यापेक्षा संपर्क वाढवणे व त्यांच्याशी आपण होऊन संपर्कात राहणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा विचित्र मनस्थितीमुळे तुम्हाला अपमान व अवहेलना सहन करायला लागू शकते, पण तुमच्या प्रिय व्यक्तीच्या जिवापेक्षा काहीच मोठे नाही. यासाठी तुम्ही त्या व्यक्तीचा अन्याय व अत्याचार सहन करायचा नाही, परंतु त्याला मदत करण्यासाठी हरेक प्रयत्न नक्कीच करायला हवा. ज्याठिकाणी आपले प्रयत्न व मदत तोकडी पडते त्या ठिकाणी मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची मदत घेण्यास लाजू नये, मागेपुढे पाहू नये.
त्या व्यक्तीची कथा ऐकून तुम्हाला वाईट वाटत असेल, ताण आल्यासारखे वाटत असेल, बेचैन वाटत असेल, तर ते तसे त्याला सांगा. तसे केल्याने त्याला येणारे कठीण व नकारात्मक विचार आणि भावना या
आपल्याबरोबर सर्वांनाच येतात, असे वाटून त्याला दिलासा मिळेल व आपण काहीतरी अनैसर्गिक व अवास्तव आहोत ही भावना त्याच्या मनातून निघून जाईल. त्याचबरोबर तो या भावना व विचार मोठ्या धैर्याने व धीराने पचवत आहे व त्यांना सामोरे जात आहे याचा त्याला विश्वास द्या व त्याबद्दल त्याचे कौतुक करा व त्याला शाबासकी द्या. त्याचबरोबर त्याला विश्वास द्या की अशा भावना आणि विचार हे क्षणिक असतात, ते जसे बदलतात, तसे हेही क्षण बदलतील.
त्यांना विश्वास द्या की या बदलत्या क्षणात आम्ही तुमच्या सोबत आहोत. कसल्याही काळ्या रात्री आम्ही तुम्हाला आधार देण्यास व उजेड दाखविण्यास तयार आणि सज्ज आहोत.
जेव्हा एखाद्या समाजातील अतिशय प्रतिष्ठित व प्रसिद्ध व्यक्ती आत्महत्या करते त्या वेळी बऱ्याच वेळा लोक त्या आत्महत्येचे उदात्तीकरण करतात. त्या आत्महत्येतील प्रत्येक प्रसंगाचे व प्रत्येक विचाराचे व आचाराचे केलेले यथासांग वर्णन काही व्यक्तींसाठी आत्महत्येचे कारण बनू शकते. अशा व्यक्तींचे विचार व आचार यांना समर्थन देणाऱ्या व्यक्ती बऱ्याच वेळा त्याच विचारांच्या विळख्यात अडकून आत्महत्येस प्रवृत्त होतात. अशा व्यक्तींना ही त्यांचे विचार व भावना व्यक्त करण्यास व त्यांनी व्यक्त केलेले विचार ऐकण्यासाठी आपण नेहमी सज्ज असले पाहिजे. आपल्या आवडत्या व्यक्तीने ज्याप्रमाणे व जसा आत्महत्येचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न करण्याची उर्मी बऱ्याच लोकांमध्ये तयार होते. यातूनच खूप सारे लोक एकाच प्रकारे व एकाच पद्धतीने आत्महत्येचा प्रयत्न करतात. अर्थात प्रतिष्ठित व्यक्तीच्या आत्महत्येनंतर त्याची नक्कल होण्याची शक्यता खूप जास्त असते.
आत्महत्या प्रतिबंधासाठी 24 तास कार्यरत असणाऱ्या हेल्पलाइनची देखील आपण मदत घेऊ शकतो.
जिथे आपली ऐकण्याची व ऐकून घेण्याची क्षमता संपते त्याठिकाणी आपल्याला मानसोपचार तज्ञांची मदत घेताना बिलकुल शरम वाटू देऊ नये. मानसोपचार तज्ञांना भेटून व त्यांच्याशी बोलून आपण जवळजवळ 90 टक्के आत्महत्या रोखू शकतो. हे म्हणजे जगभरातील लाखो कुटुंबांना मानसिकरित्या कोसळण्यापासून व पुढे जाऊन अजून आत्महत्येला प्रवृत्त होण्यापासून वाचवणे आहे. अर्थात ऐकून घेणारा व कसलीही अट न घालता ऐकणारा अनुबंध, म्हणजे श्रवणानुबंध, हाच खरा आत्महत्या प्रतिबंधक उपाय होऊ शकतो. तर चला या एका पुण्यकर्माला आजच सुरुवात करूया. कठीण परिस्थितीत असणाऱ्या लोकांची गोष्ट ऐकुया आणि ऐकून घेऊया व संवेदनशील होऊया, श्रवणानुबंध तयार करूया.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती
The Journey Begins
Thanks for joining me!
Good company in a journey makes the way seem shorter. — Izaak Walton
