मतभेद:

मतभेद व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला धन्यवाद देणेच चांगले कारण आपल्या हातून होऊ शकणाऱ्या काही गंभीर चुका टाळण्याची एक संधी त्यांच्यामुळेच आपल्याला मिळते.

मोठ्ठं मन:

“तुझ्याकडे आहे माझ्याकडे नाही, माझ्याकडे आहे तुझ्याकडे नाही. मला येतं तुला येत नाही, तुला येतं मला येत नाही. माझं बरोबर तुझं चूक, माझं चूक तुझं बरोबर.” अशा प्रकारचे “मी-मी तू-तू, मला-तुला, माझं-तुझं” करणारे “वैयक्तिक हेवेदावे” आपल्या मनाचा तोल व संयम बिघडवतात.

वैयक्तिक हेवेदावे आपल्या मनाला असंतुलित, विचलित आणि वाईट अवस्थेत घेऊन जातात. मनाच्या अशा वाईट अवस्थेत आपण दिलेल्या प्रतिक्रिया सहसा बचावात्मक किंवा आक्रमक असतात. बचावात्मक प्रतिक्रियेत आपण आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न करतो, स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतो व झालेल्या गोष्टीला आपण बिलकुल कारणीभूत नसल्याबद्दल आपलं मत व्यक्त करतो, जे आपल्या समस्या सोडविण्यासाठी अगदीच विघातक असतं. आक्रमक प्रतिक्रियेमध्ये “अटॅक इस द बेस्ट डिफेन्स” या तत्त्वाचा आपण वापर करतो आणि राग, क्रोध व चीड व्यक्त करतो, यामुळे मूळ प्रश्न सोडविला जाण्याऐवजी अजूनच चिघळत जातो.

म्हणूनच या अशा वाईट मनस्थितीतून उद्भवलेल्या आपल्या प्रतिक्रियांवर आपण अंधविश्वास ठेवणे योग्य नाही. आपल्या वाईट मनस्थितीतून उद्भवलेल्या विचारांवर, प्रतिक्रियांवर व क्रुतींवर आपण अविश्वास व्यक्त करणं गरजेचं आहे. चांगल्या मनस्थितीत असताना आपण या सर्वांचा आपल्या वैयक्तिक ध्येयाधिष्ठीत व उद्दिष्ट आधारित फेरविचार करणं खूपच महत्वाचं आहे आणि हेच खरं तर “मोठ्ठं मन” असल्याच प्रथम लक्षण आहे.

ज्या गोष्टी आपल्याला मनापासून आवडतात, त्या आपल्याला आनंद देतात,
ज्या गोष्टींशी आपण मनापासून बांधील असतो, त्या आपल्याला अखंड व अविश्रांत कृतिशील बनवतात,
आवड आणि बांधीलकी एकत्रितपणे आपल्याला कर्तुत्वाच्या खडतर व अशक्यप्राय मार्गाने पुढे पुढे नेत राहतात.